पावसाळा सुरू व्हायचाच
अवकाश की, निसर्गातल्या मोकळ्या पडीक जागांवर आपोआप रुजलेले गोकर्णाचे वेल, गर्द
निळ्या रंगाने नजरेस पडू लागतात. भारतातल्या निरनिराळ्या भाषांत ह्याला निरनिराळी
नावे आहेत. फुलाच्या आकारास अनुलक्षून ती ठेवली गेलेली आहेत.
१ अरेबिक बजरूल्मजारियुन-ए-हिंदी (Bazrulmazariyun-e-hindi)
२ इंग्लिश बटरफ्लाई पी, ब्लू
पी, पिजन विंग्स
३ उडिया ओपोराजिता
४ ऊर्दू माजेरीयुनीहिन्दी (Mazeriyunihindi)
५ कन्नड शंखपुष्पाबल्ली, गिरिकर्णिका, गिरिकर्णीबल्ली
६ कोकणी काजुली
७ गुजराती गर्णी, कोयल
८ तमिळ काककनाम (Kakkanam), तरुगन्नी
(Taruganni)
९ तेलुगू दिन्तेना (Dintena), नल्लावुसिनितिगे
(Nallavusinitige)
१० नेपाळी अपराजिता (Aparajita)
११ पंजाबी धनन्तर (Dhanantar)
१२ फारसी दरख्ते बिखेहयात (Darakhte bikhehayat)
१३ बंगाली गोकरन (Gokaran), अपराजिता
(Aparajita)
१४ मराठी गोकर्णी, काजली, गोकर्ण
१५ मल्याळम अराल (Aral), कक्कनम्कोटि
(Kakkanamkoti), शंखपुष्पम्
१६ संस्कृत गोकर्णी, गिरिकर्णी, योनिपुष्पा, विष्णुक्रान्ता, अपराजिता
१७ हिंदी अपराजिता, कोयल, कालीजार
निसर्गात वेगवेगळ्या रंगांची तसेच वेगवेगळा आकार आणि सुवास असणारी
असंख्य फुले आढळतात. काहींचा आकार आणि रंग आपले लक्ष वेधून घेतात. गोकर्ण हेही असेच
एक सुंदर, नाजूक फूल आहे. प्रकाशचित्रणास हे फूल अत्यंत अनुकूल आहे.
म्हणूनच आंतरजालावर आणि व्यक्तिगत संग्रहांतूनही गोकर्णाच्या फुलांचे असंख्य
आविष्कार आढळून येतात. गोकर्ण ही भारतीय वंशाची वेलवर्गीय सदाहरित वनस्पती आहे. क्लायटोरिया
टरनेशिया हे गोकर्णाचे शास्त्रीय नाव आहे. फुलांचा आकार गायीच्या कानासारखा असतो म्हणून,
मराठीत याला ‘गोकर्ण’ म्हणतात. गोकर्णाच्या फुलांचा रंग गडद निळा असतो. तसेच फिकट
निळा, फिकट गुलाबी, सफेद या रंगांची फुले असलेली गोकर्णदेखील
आढळते. रंग कोणताही असो; गर्द हिरव्या पानांत ही फुले अगदी उठून दिसतात. गोकर्णाची
पाने गर्द हिरव्या रंगाची असून ती संयुक्त प्रकारची असतात. सदाहरित वेल असल्याने बारा
महिने तेरा काळ वेलीवर पाने असतात. पानांची विशिष्ट रचना आणि आकार यामुळे शोभेची वेल
म्हणून उद्यानात हिची लागवड केली जाते. गोकर्णाची वेल बहुवर्षांयू आहे.
पाच पाकळ्यांनी बनलेल्या या फुलात एक पाकळी मोठी असते. तिचाच
आकार गायीच्या कानासारखा असतो. गोकर्णाच्या वेलीला पावसाळ्यात फुले येतात. फुले काय-
अक्षरश: बहर येतो. ही फुले सुकून गेली की शेंगा येतात. शेंगा साधारण फरसबीच्या शेंगेच्या
आकाराच्या; परंतु चपटय़ा असतात. कोवळ्या शेंगांची भाजी केली जाते. गोकर्णाची
लागवड बियांपासून केली जाते. शेंगा पक्व झाल्या की त्यांचा रंग बदलतो आणि त्या तडकतात.
त्यातून साधारण आठ-दहा बिया मिळतात. याच बिया रुजवून आपण गोकर्णाची नवीन रोपे तयार
करू शकतो. पाण्याचा निचरा होणाऱ्या कोणत्याही मातीत या बिया अगदी सहज रुजतात. फार मेहनत
करावी लागत नाही.
गोकर्णाच्या फुलांचे असंख्य औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळेच अनेक
रोग, व्याधी निवारण्यासाठी या फुलांचा वापर केला जातो. निळ्या गोकर्णाच्या
फुलांपासून नैसर्गिक रंगदेखील तयार केला जातो. गोकर्णाची फुले सावलीत वाळवून त्याची
पावडर करतात. या पावडरचा चहा केला जातो. गोकर्णाच्या फुलांचा चहा अत्यंत औषधी असून, तो
मध किंवा गूळ घालून घेतात.
गोकर्णाची फुले, शेंगा, पाने, साल, मुळ्या
या प्रत्येक भागाचा औषधांमध्ये वापर केला जातो. पंचकर्मात या वेलीचा वापर शरीरातील
त्रिदोषांना संतुलित करण्यासाठी, तसेच शरीरातील नको असणारे विषारी
घटक बाहेर काढण्यासाठी केला जातो. सर्दी, खोकला, ताप, दमा
या सगळ्या विकारांवर गोकर्ण औषधी आहे. तसेच त्वचा-विकार आणि रक्तशुद्धीसाठीही गोकर्णाचा
वापर केला जातो. थोडक्यात काय, तुम्ही कोणताही रोग म्हणा. गोकर्णाचा
औषधी म्हणून वापर करायचा विचार करा. गोकर्ण कधीच पराजित होणार नाही.
म्हणजे हरणार नाही. म्हणूनच की काय बंगाली, नेपाळी, उडिया इत्यादी भाषांत गोकर्णाला ‘अपराजिता’असे
सुंदर नावही आहे.
घराची गॅलरी, कमान, शाळेच्या गेटची कमान, मंदिराचे
प्रवेशद्वार. अगदी कुठेही तुम्ही गोकर्णाच्या वेलीची लागवड करून तो परिसर सुशोभित करू
शकता. मग चला तर. लागा तयारीला. गोकर्णाच्या वेलीला आपल्या हरित-धनात सहभागी करून घेण्यासाठी.
संदर्भः
१. फुलांच्या विश्वात: गोकर्ण
भरत गोडांबे, लोकसत्ता टीम | July 30, 2017
२. अपराजिता के हैं कई जादुई लाभ - आचार्य श्री. बालकृष्ण, December 11,2019
ताजा कलमः ह्या लेखाच्या
अगणित वाचकांपैकी हम हिंदुस्थानी ग्रूपवरील सुधीर नाईक ह्यांनी गोकर्णास शंखपुष्पी
म्हणत नाहीत असे सांगितले. थोडा अधिक तपास करता ते खरे आहे असे वाटते. पारंपारिक आयुर्वेदिक
औषधांत समावेश असलेली शंखपुष्पी नावाची वेल निराळीच असून तिला पांढरी फुले येतात. गोकर्णास
शंखपुष्पी म्हणतात. मात्र ते आयुर्वेदिक नामाभिधान नसावे असे मानण्यास वाव आहे. गोकर्णास
अपराजिता म्हणतात हे नक्की. अपराजिता औषधी असते हेही नक्की. मात्र औषध म्हणून वापरायची
असल्यास, कशावर औषध घेता आहात, ते तज्ञ व्यक्तीनेच दिले
आहे ना, ह्याबाबत स्वतः खात्री करूनच वापरावीत. हा लेख सर्वसाधारण माहितीच्या संकलनातूनच
तयार केलेला आहे. मी स्वतः डॉक्टर नाही. वैद्यही नाही. माझी औषध सुचवण्याची पात्रता
नाही. ह्या लेखाचा उद्देश औषध सुचवण्याचा नाही.
1 टिप्पणी:
हे गोकर्ण आहे.त्यामध्ये सुध्दा एककर्णी व डबल गोकर्ण असते.शंखपुष्पी बद्दलचे मत बरोबर आहे पण ती वेल नसून झाड आहे व लहान पांढरी फुले येतात फारच औषधी आहे.
टिप्पणी पोस्ट करा