प्रार्थना

न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं नापुनर्भवं । कामये दुःखतप्तानां‌ प्राणिनां आर्तिनाशनम्‌ ॥

न राज्य चाहूँ, न स्वर्ग चाहूँ और न चाहूँ मोक्ष, मैं तो चाहूँ, दुःखियों की पीडा होवै सभी खतम ।

नको राज्य, नको स्वर्ग, नको मोक्षही मला, दुःखितांच्या नष्ट व्हाव्या, आर्ती सार्‍या आजला.

I desire neither kingdom nor heaven nor liberation. I desire end of miseries for all the life on the earth.

२०१३/०३/१७

नागीण

नागीण [१]

नागीण हा आजार कांजिण्यांच्या विषाणूंमुळे होतो. कांजिण्या होऊन गेल्यानंतर काही जणांच्या शरीरात हे विषाणू लपून राहतात. अनेक वर्षांनी विषाणू चेतारज्जूतून एखाद्या नसेमार्फत पसरून त्वचेवर फोड निर्माण करतात. नागिणीची तीव्रता वयाबरोबर वाढते. उतार वयात नागीणीचा जास्त त्रास होतो.

रोगनिदानः हे विषाणू चेतातंतूच्या रेषेवर वाढतात. सुरुवातीस त्या चेतातंतूंच्या मार्गावर खूप दुखते. तीन चार दिवसांत तेथील त्वचेवर लालपणा येतो. पाठोपाठ पाण्याने भरलेले दुसरे फोड येतात. हे फोड छोटे छोटे व एकत्र पुंजक्यामध्ये येतात. पाच ते सहा दिवसांत वर खपली धरून वाळू लागतात. फोड गेले की दुखणे बहुधा थांबते. पण काही वेळा पुढेही काही महिन्यांपर्यंत दुखरेपणा टिकतो.

सामान्यपणे हा आजार बरगडयांमधील चेतातंतूंच्या रेषेवर दिसतो. कधीकधी चेहरा किंवा हातांमधील चेतांवरही परिणाम दिसतो. शरीराच्या एकाच बाजूला बहुतेक करून आजार होतो. शरीराची मध्यरेषा ओलांडून फोड पुढे जात नाहीत. नागीण हा त्रासदायक आजार आहे. पण फारसे गंभीर परिणाम सहसा होत नाहीत. जर डोळयात फोड आले तर मात्र दृष्टी जाऊ शकते.

नागिणीसाठी उपचारः यावर 'असायक्लोव्हिर' हे गुणकारी औषध आहे. पुळया उमटल्याच्या दिवशी हे लगेच सुरु केले तर पुरळ लवकर बरे होतात. पण नंतर जी आग होत राहते ती कमी होत नाही. या गोळया महाग आहेत. याचे मलमही मिळते. याबरोबरच रुग्णाला धीर द्यावा, आणि गैरसमजुती दूर कराव्यात. दुखीसाठी ऍस्पिरिन किंवा पॅमाल द्यावे. हा आजार काही दिवसांत आपोआप बरा होतो. नंतर तीव्र वेदना होतच राहिली तर संबंधित नस मारून टाकण्याचा उपचार करावा लागतो. त्यासाठी तज्ज्ञाला दाखवावे.

आयुर्वेदाचे दृष्टीकोनातून ’नागीण’, महाराष्ट्र-टाईम्समधील वैद्य राजीव कानिटकर ह्यांचा लेख [२]

आजच्या कलियुगात आणि आधुनिक काळातही अगदी सुशिक्षित व्यक्तीही अनेक भ्रामक कथांना बळी पडत असतात. नागीण या रोगाबद्दलही अशाच अनेक कल्पना आहेत. हा विकार कितीही भयंकर असला, तरी योग्य व वेळीच केलेल्या उपचारांनी तो निश्चितच पूर्ण बरा होतो, हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे. आयुर्वेदात 'कक्षा', 'विसर्प', 'अग्निरोहिणी' अशा नावांनी उल्लेख असलेल्या या विकाराला आपण नागीण, धावरे या नावाने ओळखतो.

कारणेः नागीण झालेल्या माणसाचा संपर्क, पित्त वाढविणार्‍या गोष्टींचे अधिक प्रमाणात सेवन, जागरणे, उन्हातान्हातून खूप काम करणे, एप्रिल-मे-ऑक्टोबर या महिन्यांत किंवा पावसाळ्याच्या मध्यावर होणारे अनेक प्रकारचे विषाणू संसर्ग हे नागीण होण्यास कारणीभूत असतात.

स्थानेः डोक्यात, भुवईपासून कपाळावर, कानापासून मानेवर, छातीपासून पाठीवर, पोटापासून पाठीवर, खांद्यापासून हातावर किंवा कंबरेपासून पावलापर्यंत, स्त्री व पुरूषांच्या जननेंद्रियांवर

लक्षणेः सुरुवातील नागिणीच्या जागी फक्त वेदना किंवा आग होते. दोन-चार दिवसांत किंवा कधीकधी एका रात्रीतही भाजल्यावर येतात तसे पाण्याचे बारीक बारीक फोड येतात. हे फोड एकत्र गुच्छाच्या स्वरूपात येतात आणि एका विशिष्ट दिशेने वाढत जातात. नागिणीची प्रमुख तीन लक्षणे म्हणजे आग, वेदना किंवा खाज. नागीण झाल्यावर तो भाग लालसर होतो, आतून दडदडीत होतो. अंगावर कपडे सहन होत नाहीत. त्या बाजूवर झोपतायेत नाही. जरासा धक्का लागला तरी डोळ्यांतून पाणी येते, संपूर्ण अंगाची आग होते, काही वेळा ताप येतो, झोप लागत नाही. काही दिवसांनंतर हे फोड मोठे होतात. शेजारचे छोटे छोटे फोड एकत्र होऊन मोठे फोड तयार होतात. नंतर ते फुटतात. काही वेळा या फोडांमध्ये पूसुद्धा होतो. फुटल्यावर त्यातील पाणी निघून जाते आणि वरची त्वचा निघून जाऊन आतील मांस दिसू लागते. नंतर त्या मांसावर खपली येते, ती सुकून काळी पडते आणि आत नवीन त्वचा आल्यावर ती खपली गळून पडते.

कालः नागीण किती प्रमाणात झाली आहे, त्यावर त्याचा काळ अवलंबून असतो. पण साधारणतः नागिणीला चार आठवडे तरी लागतात. कांजिण्यांप्रमाणेच साधारणतः याचा बरा होण्याचा प्रवास असतो. फक्त त्या एका आठवड्यात कमी होतात, तर नागीण बरी व्हायला वेळ लागतो. नागीण आयुष्यात शक्यतो एकदाच होते. एड्स किंवा जननेंद्रियांच्या सांसर्गिक रोगांमुळे होणारी नागीण मात्र वारंवार होऊ शकते. वेळीच उपचार न केल्यास किंवा पथ्य न केल्यास नागीण बरी व्हायला खूप वेळ लागतो. वृद्धापकाळात झालेली नागीण बरी व्हायलाही खूप वेळ लागतो. अत्यंत वाईट बाब म्हणजे अशी नागीण बरी झाल्यानंतरही त्या जागेवरची आग किंवा वेदना या नंतर कितीही उपाय योजना केल्या तरी जन्मभर पाठ सोडत नाहीत.

उपचारः नागिणीत वेदना, खाज किंवा आग असली तरी प्रमुख चिकित्सा ही पित्तशामक अशीच करावी लागते. पेशंटची तपासणी करून पोटात कामदुधा, गुळवेल सत्त्व, शंखजीरे, गुलकंद, तुळशीचे बी, धने-जिर्‍याचे पाणी, चंदनासव, सारीवाद्यासव यासारखे काढे, मौक्तिकयुक्त कामदुधा, चंदनादी वटी, चंद्रकला रस, संशमनी वटी यासारख्या गोळ्यांची योजना करून दिली जाते. गाईचे १०० वेळा धुऊन शुद्ध केलेले तूप (शतधौतघृत), गेरूची शुद्ध केलेली पावडर आणि दुर्वांचा रस ही तीन औषधे बाहेरून लावण्यासाठी हमखास गुणकारी ठरतात. जोडीला हिरवी मिरची, लसूण चटणी, लोणचे, गरम मसाला, आलं-लसूण- मिरची, तीळ-खोबरं, पंजाबी-चायनीज-चाट, शेंगदाणा-काजू यांसारखे सर्व पित्त वाढवणारे पदार्थ बरे वाटेपर्यंत पूर्ण बंद करणे आवश्यक आहे. पोट साफ ठेवणेही गरजेचे आहे. महत्त्वाचे म्हणजे पहिले आठ-दहा दिवस तरी संपूर्ण घरी राहणे आवश्यक आहे. नागीण काही प्रमाणात संसर्गजन्य आहे. नागीण झालेल्या पेशंटच्या संपर्कात लहान मुले आली तर त्यांना  नागीण नाही, पण कांजिण्या येऊ शकतात. घरी राहून नागिणीची जागा जेवढी उघडी राहील तेवढे चांगले असते.

ह्या रोगाविषयीची विश्वकोशातील माहिती [३]

परिसर्प: (हरपिझ). लाल झालेल्या त्वचेवर उठणार्‍या व खोल जाणार्‍या, द्राक्षघडासारखा पुटिका समूहांना 'परिसर्प' म्हणतात. ही विकृती विषाणूजन्य आणि तीव्र स्वरूपाची असते. तिचे दोन प्रकार आढळतात.

१.       सामान्य परिसर्प आणि
२.      मेखला परिसर्प किंवा 'नागीण' (हरपिझ झॉस्टर)

सामान्य परिसर्प: हा एक प्रकारचा विषाणूजन्य त्वचारोग आहे. ओठ, हनुवटी, नाक, तोंड व बाह्य जननेंद्रिये या शरीरभागांवर तो बहुतकरून आढळतो. स्थानपरत्वे त्याला निरनिराळी नावेही देतात; उदा., ओष्ठ परिसर्प, जननांग परिसर्प वगैरे. परिसर्प, होमिनिस नावाच्या मध्यम आकारमानाच्या (१८० अब्जांश मीटर व्यासाच्या) विषाणूच्या संसर्गामुळे रोग उद्‌‌भवतो. हे विषाणू दोन प्रकाचे असून त्यांपैकी पहिला प्रकार सामान्यतः ओठ, तोंड या ठिकाणी, तर दुसरा प्रकार सामान्यतः (पण नेहमी नव्हे) जननेंद्रियात आढळतो. हा रोग प्रत्यावर्ती स्वरुपाचा म्हणजे वारंवार त्याच जागी उदभवणारा असून त्याच्या प्रथमोद्‌भवाचा परिपाक-काल (विषाणू शरीरात शिरल्यापासून रोग-लक्षणे उत्पन्न होईपर्यंतचा काळ) ४ ते ५ दिवसांचा असतो. रोगाची सुरुवात थंडी, वारा किंवा ऊन यांच्या जादा संपर्कानंतर रोगाच्या जागी आग होण्याने किंवा खाज सुटून होते. नंतर त्वचेवर रंजिका दिसतात व त्यावर टाचणीच्या डोक्याच्या आकाराच्या पुटिकांचे समूह दिसू लागतात. सुरुवातीस पुटिकांत स्वच्छ द्रव असतो; परंतु नंतर तो गढूळ बनतो. या पुटिका फुटतात किंवा सुकतात आणि त्यावर खपल्या धरतात. ७ ते १४ दिवसांत रोग संपूर्ण बरा होतो. पुटिकांमध्ये दुय्यम सूक्ष्मजंतू संक्रमण झाल्यास व्रण तयार होतात. इलाजामध्ये जंतुनाशक आणि स्तंभक (आकुंचन करणारी) औषधे ऑरिओमायसिनाचे मलम वापरतात. दुय्यम संक्रमण झाल्यास योग्य प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधे देतात.

मेखला परिसर्पः पश्चमूल गुच्छिकांच्या शोथामुळे (दाहयुक्त सुजेमुळे), त्या ज्या भागात तंत्रिका (मज्जा) पुरवतात, त्या त्वचा भागापुरत्या मर्यादित असणार्‍या संसर्गजन्य परिसर्पाला मेखला परिसर्प किंवा नागीण म्हणतात. कधीकधी पाचव्या मस्तिष्क तंत्रिकेवरील 'त्रिमूल गुच्छिका' आणि सातव्या मस्तिष्क तंत्रिकेवरील 'आनन गुच्छिका' यांनाही ही विकृती होते (या वर्णनातील निरनिराळ्या गुच्छिकांच्या स्पष्टीकरणासाठी विश्वकोशातील 'तंत्रिका तंत्र' ही नोंद पहावी). मेखला परिसर्पाचे विषाणू आणि कांजिण्यांचे विषाणू यांत अतिशय साम्य आहे. या परिसर्पाच्या रोग्याशी संपर्क आलेल्या व्यक्तीमध्ये कांजिण्या झाल्याचे अनेक वेळा आढळते. याउलट कांजिण्यांच्या रोग्याशी संपर्क आल्यामुळे परिसर्प झाल्याचे सहसा आढळत नाही. या दोन विकृतींमध्ये अन्योन्य प्रतिरक्षा (रोगप्रतिकारक्षमता) नसते. मेखला परिसर्प ही विकृती ’तंत्रिका तंत्रा’च्या विकृतीत मोडते.

मेखला परिसर्पाचे कधीकधी  'प्राथमिक' आणि 'दुय्यम' असे वर्गीकरण करतात. यांशिवाय वर दिलेले मस्तिष्क तंत्रिकांसंबंधीचे प्रकार, विशेष प्रकार म्हणून ओळखतात. पाठीच्या मणक्यांचा क्षयरोग, मेरुरज्जूसंबंधीचे अर्बुद (नवीन पेशींची अत्यधिक वाढ होऊन निर्माण झालेली गाठ) किंवा कर्करोगाचा दुय्यम फैलाव, या विकृतींच्या सोबत आढळणार्‍या परिसर्पाला, दुय्यम परिसर्प म्हणतात. दोन्ही प्रकारांत रोगप्रतिकारशक्तीचा र्‍हास हेच मुख्य कारण असते. कोणत्याही प्रकारात विषाणू संक्रमणामुळे गुच्छिकेत रक्तस्त्राव आणि ऊतकमृत्यू (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहाचा नाश) झाल्याचे आढळते.

मेरुरज्जूत प्रवेश करणार्‍या पश्चमूलांना संसर्ग झाल्यामुळे, त्या पश्चमूलाशी संबंधित असलेल्या त्वचाभागावर प्रथम त्वक-रक्तिमा येतो आणि नंतर पुटिका उमटतात. पाठीच्या मध्यापासून पुढे छातीच्या मध्यापर्यत त्वचेवर पुटिका दिसतात. शरीराच्या एकाच बाजूस वेढल्याप्रमाणे पुटिका उमटत जातात म्हणून त्यास 'नागीण' म्हणतात. रोगाच्या सुरुवातीस पट्ट्यासारखा त्वचाभाग अतिसंवेदनाक्षम बनतो, आग किंवा तीव्र वेदना होतात. दोन चार दिवसांतच पुटिका दिसू लागतात व सुरुवातीस त्यामधील द्रव स्वच्छ असतो. काही काळ पुटिका वेगवेगळ्या असतात; परंतु त्यांत पू होऊन त्यांचा संगम होण्याची शक्यता असते. काही दिवसांनंतर या पूयिका (पूयिका, पूटिका) कोरड्या पडून खपली धरते. खपल्या पडल्यानंतर छोटे छोटे व्रण होतात आणि त्या त्वचाभागाची संवेदना बिघडते. उपद्रवामध्ये मेरुरज्जुशोथ आणि मस्तिष्कशोथ यांचा समावेश होतो. कधीकधी उत्स्फोट (पुरळ) दिसेनासा झाल्यानंतरही तीव्र तंत्रिकाजन्य वेदना चालूच राहतात. अशा वेदना तीन महीन्यांपेक्षा जास्त काळ चालूच राहिल्यास त्या अनि‍श्चित काळपर्यंत चालूच राहण्याची शक्यता असते. रोगकालात मस्तिष्कमेरूद्रव [मेंदू व मेरुरज्जू यांना यांत्रिक आधार म्हणून उपयोगी पडणारा द्रव; ’तंत्रिका तंत्’] तपासल्यास लसीका-कोशिका-वृद्धी [’लसीका तंत्र’] झाल्याचे आढळते.

त्रिमूल गुच्छिका विकारात कपाळ, डोळे, जीभ, टाळू या ठिकाणी पुटिका उमटतात. त्रिमूल तंत्रिकेच्या नेत्रशाखेच्या पुरवठा विभागात हा रोग बहुतकरून आढळतो. डोळ्याचे स्वच्छमंडल (बुबुळाच्या पुढचा पारदर्शक भाग) आणि नेत्रश्लेष्मकला (नेत्रगोलाच्या पुढील भागावरील बुळबुळीत पातळ पटल) या ठिकाणी पुटिका उमटतात. या विकृतीला 'नेत्र परिसर्प' म्हणतात. पुटिकांत दुय्यम सुक्ष्म-जंतु-संक्रमणामुळे पू होऊन स्वच्छमंडल अपारदर्शक होण्याचा संभव असतो.

आनन गुच्छिका विकरात एकाच बाजूच्या बाह्य कर्णद्वार, कानामागील गंडवर्धाचा (कानाच्या पाठीमागे असलेल्या शंखास्थीच्या निमुळत्या वाढीचा) भाग आणि त्याच बाजूच्या घशातील स्तंभावर पुटिका उमटतात. अलीकडे संशोधनानुसार या विकृतीचे मूळ आनन गुच्छिका नसून आनन तंत्रिकेच्या प्रेरक भागाच्या शोथात असल्याचे सिद्ध झाले आहे.

मेखला परिसर्पावर कोणताही विशिष्ट गुणकारी इलाज उपलब्ध नाही. ऑरिओमायसीन (टेट्रासायक्लीन गट) दररोज १ ग्रॅम चार मात्रांतून विभागून देतात. अँस्पिरीन, कोडीन इ. वेदनाशामके देतात. अतिवेदनाशीलता कमी करण्याकरिता त्वचाभागावर सिंकोकेन (न्युपरकेन) सारखे स्थानीय संवेदनाहारक असलेले मलम लावतात. अलीकडे मोठ्या मात्रेत अंतःक्षेपणाने (इंजेक्शनाने) ब-१२ जीवनसत्त्व आणि तोंडाने कॉर्टिकोस्टेरॉइडे देणे उपयुक्त ठरले आहे. रोगनिदान नक्की होताच कॉर्टिकोस्टेरॉइडे अंतःक्षेपणानेही द्यावीत असे काही तंत्राचे मत आहे. सुक्ष्मजंतू संक्रामावर योग्य प्रतिजैव औषधे वापरतात. नेत्र परिसर्पावर नेत्रविशारदाकडूनच इलाज करून घेणे इष्ट असते.

मेखला परिसर्प आणि सामान्य परिसर्प यांमधील प्रमुख फरक पुढील प्रमाणे आहेत.

मेखला परिसर्प
सामान्य परिसर्प
प्रत्यावर्ती नसतो.
प्रत्यावर्ती असतो.
शरीराच्या अर्ध्या भागातच होतो.
दोन्ही बाजूंस होतो
नेहमी तंत्रिका मार्गाने पसरतो
कोठेही पसरतो
प्रतिरक्षा कायम उत्पन्न होते
प्रतिरक्षा उत्पन्न होत नाही
वेदना अती तीव्र असतात
वेदना सौम्य असतात
मस्तिष्क-मेरुद्रवात लसिका-कोशिका-वृद्धी बहुतकरून आढळते
मस्तिष्क-मेरुद्रव नेहमीप्रमाणे असतो

मूळ इंग्रजी शब्दांचे मराठी पर्याय


अक्र
मूळ इंग्रजी शब्द
पर्यायी मराठी शब्दAntibiotic
प्रतिजैव
Blisters
पुटिका, पुयिका, पुळी, पुटकुळी, पुरळ
Cells
कोशिका, पेशी
Herpes 
परिसर्प, विसर्प, नागीण
Infection
संसर्ग
Inflammation
दाह, आग, जळजळ, वेदना
Nerves
तंत्रिका, मज्जातंतू, चेतातंतू
Serum
लसिका, रक्तद्रव्य
Tissue
ऊती
१०
Virus
विषाणू


संदर्भ: 
१.       ’आरोग्यविद्या’ डॉ.शाम अष्टेकर http://www.arogyavidya.net/arogyavi/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=461&Itemid=584
२.      वैद्य राजीव कानिटकर http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9836244.cms
३.      विश्वकोशातील नागीणीसंबंधीची माहिती, वा.रा.ढमढेरे व य.त्र्यं.भालेराव, http://www.marathivishwakosh.in/khandas/khand9/index.php?option=com_content&view=article&id=9340&Itemid=2
४.     आर.बी.स्कॉट संपादित, टेक्स्टबुक ऑफ द प्रॅक्टिस ऑफ मेडिसिन, लंडन, १९७३.
५.     आर.जे वकील संपादित, टेक्स्टबुक ऑफ मेडिसिन, बॉम्बे, १९६९.

1 टिप्पणी:

santubhau म्हणाले...

सर , कॅन्सरवर केमथेरपी चे ऊपचार चालु असताना
डोक्यावरून नागीन झाली. पेशंटचे लय ७५ असुन प्रचंड ेेदना होतात. वेदने मुळे पेशंटचे जोरात ओरडतो.
यावर ऊपचाऱ काय ?