निरंतर, चालनानुकूल, पोटातून-रक्तशुद्धी व रक्तगाळप (नि.चा.पो.र.)
(कंटिन्युअस अँब्युलेटरी
पेरिटोनिअल डायलिसीस- सी.ए.पी.डी.)
इथे दिलेली माहिती ही केवळ मार्गदर्शक म्हणून दिलेली आहे आणि आणखी माहिती रुग्णांनी त्यांच्या डॉक्टरांकडूनच मिळवावी.
नि.चा.पो.र. प्रक्रियेची तोंडओळख
निरंतर, चालनानुकूल, पोटातून-रक्तशुद्धी व रक्तगाळप (नि.चा.पो.र.) शरीरातच, पोटाच्या नैसर्गिक अस्तराचा वापर करून होत असते. पोटाचे आवरण, रक्तशुद्धी व रक्तगाळप यांकरता गाळणी म्हणून काम करत असते. ह्या तंत्राने रक्तशुद्धी व रक्तगाळप करण्यासाठी तुमच्या पोटात प्रवेशक (कॅथेटर) बसवण्याकरता एका लहानशा शल्यक्रियेची आवश्यकता असते (जी स्थानिक अथवा सार्वदेहिक भूल देऊन केली जाते).
ही प्रक्रिया घरीच, दिवसातून साधारणपणे चार वेळा पार पाडली जाते. प्रत्येक वेळी ह्याकरता सुमारे ३० मिनिटांहूनही कमी वेळ लागत असतो आणि प्रक्रिया खूप सोपी व दुःखहीन असते. प्रक्रिया घरीच केली जात असल्याने, रुग्णाने त्यांच्या उपचारांबाबतची मुख्य जबाबदारी सांभाळण्यास सक्षम आणि सिद्ध असावे लागते. याकरता लागणारे सारे उपस्कर तुम्हाला घरपोच दिले जातात. यात रक्तशुद्धी पिशव्यां (बॅग्ज) चाही समावेश होतो, ज्या डब्यात बंद करून पाठविल्या जातात. त्यांच्या साठवणाकरता तुमच्यापाशी जागा असायला हवी असते. एखादे कोरडे कोठीघर (गॅरेज) किंवा तत्सम बाह्य बांधकाम ह्याकरता आदर्श ठरते, पर्यायाने तुमच्या घरातीलच वापरात नसलेली खोलीही तुम्ही ह्याकरता वापरू शकता.
जर तुमचेपाशी मर्यादित जागा असेल तर, तुमच्या नि.चा.पो.र.-परिचारकाशी ह्याबाबत चर्चा करणे श्रेयस्कर ठरेल. खालील आकृती अशा रक्तगाळपाचे सर्व महत्त्वाचे भाग दर्शवत आहे. जेव्हा तुम्ही ही प्रक्रिया अवलंबत असता तेव्हा, प्रथमतः तुम्हाला खालील पिशवीत विसर्ग उत्सर्जित करावा लागेल. त्यानंतर वरच्या पिशवीतून शुद्धकद्रव (डायलेसेट) पोटाच्या पोकळीत उतरवावा लागेल. ह्यालाच “विनिमय” करणे म्हणतात. ह्यात वापरलेल्या शुद्धकद्रवाच्या जागी ताजा शुद्धकद्रव भरला जात असतो. शुद्धिकरणार्थचे द्रावण, ज्याला शुद्धकद्रव असे संबोधले जात असते, ते तुमच्या शरीरात ५ तास राहू दिले जाते. ह्या काळात ते द्रव तुमची मूत्रपिंडे जे काम पूर्वी करत असत, ते काम करते. पाच तासांनंतर हीच पद्धत परत अंमलात आणा. तुम्ही तुमची रक्तशुद्धी करण्याच्या वेळा तुमच्या दैनंदिन व्यवहारांशी जुळवून घेऊ शकता. तुम्ही घड्याळाशी बांधलेले आहात असे वाटून घेण्याचे काहीच कारण नाही.
तुमच्या नि.चा.पो.र. तज्ञ परिचारकाकडून तुम्हाला प्रशिक्षण दिले जाईल, ज्यामुळे तुम्हाला सुखाने स्वतंत्र होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व कसब (एक्सपर्टीज) आणि आत्मविश्वास प्राप्त होईल. अर्थातच, आवश्यक तेव्हा तुम्हाला आवश्यक आधार आणि डॉक्टरी सल्लाही मिळेलच. नि.चा.पो.र. करत
असता मधल्या काळात तुम्ही सामान्य सक्रिय कार्यशील आयुष्य जगू शकता.
निरंतर चालनानुकूल पोटातून रक्तशुद्धी व गाळप प्रक्रिया |
नि.चा.पो.र. प्रक्रिया का अवलंबिली जाते?
गंभीर स्वरूपाच्या मूत्रपिंड बिघाड झालेल्या रुग्णांत, उत्सर्जित पदार्थ साचत जातात, ज्यामुळे रुग्णास आजारी आहोत असे वाटू लागते. अशा रुग्णांत, रक्तातील उत्सर्जित पदार्थ निष्कासित करण्यासाठी रक्तशुद्धीकरणाची आवश्यकता असते.
नि.चा.पो.र. प्रक्रियेकरता आवश्यक असलेली पूर्वतयारी
एक लहानशी मऊ अप्रत्यास्थ पदार्थाची (प्लास्टिकची) नळी जिला प्रवेशक म्हटले जात असते, ती पोटाच्या पोकळीत बसवली जावी लागते. प्रवेशक नळी त्रासदायक नसते, आणि एकदा का तिची छोटीशी जखम भरली की मग, ती घट्ट बसून राहते. शुद्धीकरण ताबडतोब हवे असल्यास, प्रवेशक नळी लगेचही वापरली जाऊ शकते. सामान्यतः प्रवेशक नळी बसवल्यानंतर दोन सप्ताहांपर्यंत वापरली जात नाही. त्यामुळे त्वचेतील जखम भरून बरी होऊ शकते. ज्यामुळे तिच्या पोटाच्या त्वचेशी असलेल्या जोडातून शुद्धकद्रवाची गळती न होण्याची खात्री होते. प्रवेशक नळी बसविल्यावर तुम्हाला १ ते २ सप्ताह शुश्रुषालयातच राहण्यास सांगितले जाते, ज्यादरम्यान पिशव्या कशा बदलाव्यात ते तुम्ही शिकून घेऊ शकता. एकदा का ह्या तंत्राविषयी आत्मविश्वास वाटू लागला की मग तुम्ही घरी परतू शकता. थोड्याच काळात हे पिशवी-बदल तुमच्या दैनंदिन व्यवहारांत सहजच सामावले जातात.
नि.चा.पो.र./स्व.पो.र.(स्वयंचलित-पोटातून-रक्तशुद्धी व गाळप) प्रक्रियेदरम्यान काय होत असते
पोटात घालायच्या प्रवेशकाचे संकल्पनाचित्र |
रुग्ण एका यंत्राशी जोडला जातो. ते यंत्र, रुग्ण सुप्तावस्थेत असता शुद्धकद्रवाचे, पोटाच्या आत आणि बाहेर चक्रण करत राहते. बहुधा ८ ते ९ तासांहून अधिक कालावधीत हे आवर्तन पूर्ण होत असते. दिवसा अनेकदा द्रव पोटातच राहून जाते. ह्या प्रकारचे शुद्धीकरण आणि गाळप, दिवसा विनिमय-प्रक्रिया करत राहण्यापासून मुक्ती मिळवून देते. वापरली जाणारी यंत्रे बहुधा व्हिडिओ-रेकॉर्डर इतक्या आकाराची असतात आणि पलंगा-लगतच्या मोढ्यावर बसू शकतात. ’स्वपोर’ बहुतांशी अशा रुग्णांकरता वापरले जाते, ज्यांना काही कारणांकरता दिवसा पिशवीबदल करणे शक्य होत नाही.
’निचापोर’ दरम्यानच्या संभाव्य गुंतागुंती
काही वेळेस, प्रवेशक अथवा निकासस्थान संसर्ग घडून येऊ शकतो. रोज निकासस्थानाची स्वच्छता करून ह्याचा उत्तम प्रतिबंध करता येऊ शकतो. सौम्य संसर्ग, प्रतिजैव औषधांचे साहाय्याने उपचारिला जाऊ शकतो. तर गंभीर स्वरूपाच्या पू-निर्माण करणार्या संसर्गाच्या प्रकरणात, प्रवेशक काढून टाकावा लागत असतो. अशा वेळी संसर्ग नाहीसा होईपर्यंत, २ ते ४ सप्ताहांकरता यांत्रिक रक्तशुद्धी व गाळप करणे प्रचलित आहे. जर तुम्ही प्रशिक्षणाबरहुकूम विनिमय करत राहिलात तर, तुम्ही संसर्गाची शक्यता घटवू शकता.
पोटातून रक्तशुद्धी व गाळप प्रक्रिया ही आयुष्यरक्षक प्रक्रिया आहे. जर रुग्ण दरदिवशी करावयाचे पिशवी-बदल कमी वेळा करत असेल तर, विसर्ग-उत्पादने साचतील आणि आजारपण येईल. जर पोटातून रक्तशुद्धी व गाळप प्रक्रिया, उपरोल्लेखित कुठल्याही कारणानी शक्य राहिली नसेल तर, यांत्रिक रक्तशुद्धी व गाळप प्रक्रियेचा वापर केला जाऊ शकतो.
पोटातून रक्तशुद्धी व गाळप प्रक्रियेचे लाभ व तिच्या उणीवा
पोटातून रक्तशुद्धी व गाळप प्रक्रियेचा प्रमुख लाभ हा आहे की घरीच केली जाऊ शकते. ती प्रवास सुलभही असते. पिशव्या जगातील अनेक भागांत (सध्या फक्त भारतात) घरीच पोहोचविल्या जाऊ शकतात. पोटातून रक्तशुद्धी व गाळप करणारे रुग्ण म्हणूनच खूपच स्वतंत्र असतात आणि शुश्रुषालयात त्यांना केवळ महिन्यातून एकदाच तपासणीकरता जावे लागत असते. शुद्धीकरण व गाळप निरंतर होत असल्याने, आहारातील आणि पेयपानाबाबतची पथ्ये, यांत्रिक शुद्धीकरण व गाळपाचे मानाने कमी असतात.
’निचापोर’ प्रक्रियेचे कुटुंबावर होणारे परिणाम
जरी पोटातून रक्तशुद्धी व गाळप तुम्ही स्वतःचे स्वतः करू शकता तरी, पिशवीबदलाचे दैनंदिन व्यवहार कुटुंबातील इतर सदस्यांनीही जाणून घेणे संस्तुत असते. जर तुम्ही वयस्कर, आंधळे किंवा इतर कारणांनी बरे नसाल तर हे विशेषत्वाने महत्त्वाचे ठरते.
शुद्धकद्रव पिशव्यांचे वजन व द्रव संतुलन आकारमान
शुद्धकद्रव पिशव्यांतून पुरवले जाते. ह्या पिशव्या १,५०० मिलीलीटर, २,००० मिलीलीटर किंवा २,५०० मिलीलीटर आकारमानाच्या असतात. तुमच्या शरीरास किती शुद्धीकरण व गाळपाची आवश्यकता आहे त्याबरहुकूम, कुठली पिशवी वापरावी त्याबाबत तुम्हाला सल्ला दिला जाईल आणि त्यानुसार ती तुम्हाला पुरवली जाईल.
जर शरीरातून द्रवहानी अथवा द्रवलाभ झाला तर तुमच्या शरीराचे
वजन बदलेल (अनुक्रमे घटेल किंवा वाढेल). पुढील विनिमयात अथवा विनिमय मालिकेत,
वापरल्या जाणार्या शुद्धकद्रव-पिशवीतील द्रवाची तीव्रता (स्ट्रेंग्थ) बदलून हे
दुरूस्त केले जाऊ शकते.
तुमच्या शरीराचे वजन आदर्श राखण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील
असायला हवे. तुमच्या शरीराचे वजन उच्चतर असेल तेव्हाची अवस्था ’अतिभारित
(ओव्हरलोडेड)’, तर ते सामान्य वजनापेक्षा कमी असेल तेव्हाची अवस्था ’निर्जल’
म्हटली जाते. ह्या अवस्था अनुक्रमे, जर तुमच्या शरीराने अती द्रव सेवन केले असेल
किंवा अती द्रव र्हास सोसला असेल तर, उद्भवू शकतात.
शुद्धकद्रवाच्या संहता
शुद्धकद्रवाच्या (लॅक्टेट/ ग्लुकोज) तीन संहता उपलब्ध
असतात. निम्न संहता-१.५%, मध्यम संहता- २.५% आणि उच्चतर संहता-४.२५%. स्थिरपद
शारीरिक वजन सांभाळण्यासाठी निरनिराळ्या संहता आणि पिशव्यांचे संयोग वापरले जात
असतात.
अतिभारिततेची चिन्हेः वजनवाढ, घोट्यांवर सूज, श्वसनकमतरता,
डोळ्यांखाली फुगीरता आणि उच्च रक्तदाब. ह्याची कारणे खूप पेयपान, सूप्त द्रव असलेल्या अन्नाचे
सेवन आणि पुरेसे द्रव-निष्कासन न होणे, ही असू शकतात. तुम्ही अतिभारित असाल तर
डॉक्टरला किंवा मूत्रपिंड-एककास सल्ल्याकरता फोन करा, त्याचवेळी कमी प्या, अधिक
संहत पिशवी वापरा आणि तुम्हाला बद्धकोष्ठता नाही ह्याची खात्री करून घ्या.
निर्जलतेची
चिन्हेः वजनघट, भोवळ येणे, आजारी वाटणे, बद्धकोष्ठता आणि कमी रक्तदाब. ह्याची
कारणे, अपुरे पेयपान आणि बर्याच ’संहत’ पिशव्या वापरणे ही असू शकतात. असे झाल्यास
डॉक्टर किंवा मूत्रपिंड-एककास सल्ल्यासाठी फोन करा, त्याच वेळी अधिक पेयपान करा
आणि निम्न-संहत पिशव्या वापरा.
प्रत्येक सकाळी काय करावेः तुमचे वजन मोजा आणि नोंदवून
ठेवा. पेयपान नियंत्रणात ठेवा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार निम्न, मध्यम किंवा उच्च
संहत पिशवी वापरा. तुमच्या आदर्श वजनावर राहण्याचा प्रयास करा. द्रव-निष्कासन
समस्या उद्भवू शकतील, बद्धकोष्ठतेकडे लक्ष न दिल्यास समस्या उद्भवू शकतील,
नियमितपणे रेचके घ्या. उच्च प्रमाणात चघळचोथा असलेला आहार घ्या आणि समस्या उद्भवल्यास
डॉक्टरला किंवा मूत्रपिंड-एककास माहिती द्या.
फिब्रीन, जे विसर्ग-उत्पादनांच्या पिशवीत तरंगत असलेल्या
लोकरीप्रमाणे दिसते, ते नैसर्गिकरीत्या उत्पन्न होणारे प्रथिन असते. त्यामुळे
निस्सारण समस्या निर्माण होऊ शकतात.
विसर्ग-उत्पादनांच्या पिशवीत रक्ताचा नारिंगी किंवा लाल रंग
आढळल्यास चिंतित होऊ नका. अस्तराच्या ओढाताणीमुळे किंवा स्त्रियांत मासिकधर्मामुळे
असे घडून येऊ शकते. त्यामुळे कदाचित निस्सारण समस्या उद्भवू शकतात. दोन्हीही
प्रकरणांत आवश्यक असल्यास तुमचे डॉक्टर किंवा मूत्रपिंड-एकक आवश्यक असेल तो सल्ला
देतीलच.
संदर्भ
मूळ इंग्रजी शब्दांचे पर्यायी मराठी शब्द
अक्र
|
मूळ इंग्रजी शब्द
|
पर्यायी मराठी शब्द
|
१
|
Ambulatory
|
चालण्यास अनुकूल, चालनानुकूल
|
२
|
Ankle
|
पायाचा घोटा
|
३
|
Breathlessness
|
श्वसनकमतरता
|
४
|
Continuous
|
निरंतर
|
५
|
Dehydration
|
निर्जलीभवन
|
६
|
Dialysate
|
शुद्धकद्रव
|
७
|
Dialysis
|
रक्तशुद्धी व रक्तगाळप
|
८
|
Disposable
|
विल्हेवाट लावता येण्याजोगा, निस्सारक्षम
|
९
|
Dizzy
|
भोवळ येणे, अस्वस्थ वाटणे
|
१०
|
Drainage
|
निस्सारण
|
११
|
Expertise
|
कसब
|
१२
|
High grade Medical plastic bags
|
उच्च-दर्जा वैद्यकीय अप्रत्यास्थ-पिशव्या
|
१३
|
Laxatives
|
रेचक
|
१४
|
Membrane
|
आवरण
|
१५
|
Peritoneal
|
पोटातील
|
१६
|
Peritoneum
|
द्रवस्त्रावी, पातळ, अर्ध-पारदर्शक, सर्व आतडी सामावणारी, पोटाची पिशवी
|
१७
|
Puffiness
|
फुगीरता
|
१८
|
Serous
|
द्रवरूप, द्रवस्त्रावी, रसरूप, रसस्त्रावी
|
१९
|
Strength
|
संहता, तीव्रता
|
२०
|
Tugging
|
ओढाताण
|
२१
|
Viscera
|
आतडी
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा