प्रार्थना

न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं न पुनर्भवं । कामये दुखतप्तानां‌ प्राणिनां आर्तिनाशनम्‌ ॥

न राज्य चाहूँ, न स्वर्ग चाहूँ और न चाहूँ पुनर्जनम, मैं तो चाहूँ, दुःखियों की पीडा होवै सभी खतम ।

नको राज्य, नको स्वर्ग, पुनर्जन्म नको मला, दुःखितांच्या नष्ट व्हाव्या, आर्ती सार्‍या आजला.

I desire neither kingdom nor heaven nor re-birth. I desire end of miseries for all the life on the earth.

2013/11/10

सर्दी

सर्दी समजून घेतल्याशिवाय तिच्यापासून सुटका होत नाही. समजून घेण्यासाठी डॉ.शाम अष्टेकर आणि डॉ.रत्ना अष्टेकर ह्यांनी लिहिलेला खालील लेख अत्यंत उपयुक्त आहे. त्यांच्याच संकेतस्थळावरून त्या लेखातील बराचसा अंश खाली उतरवून घेतलेला आहे. दोन्ही डॉक्टरद्वयांनी अपार श्रम घेऊन "भारतवैद्यक" साकार केले आहे. त्यातील हे वेचे सर्वांनाच कायमस्वरूपी उपयुक्त ठरतील असे वाटल्याने हा खटाटोप करत आहे. सर्दी समजून घेण्यासाठी ह्या लेखाचा मला खूप उपयोग झाला आणि माझी वावड्याची सर्दी नियंत्रणात राहिली. जसा मला उपयोग झाला तसाच इतरांनाही व्हावा हीच सदिच्छा!

श्वसनसंस्थेची रचना आणि कार्य

श्वसनसंस्था म्हणजे बाहेरून हवा घेऊन ती असंख्य सूक्ष्म फुग्यांमध्ये खेळवण्याची व्यवस्था आहे. या सूक्ष्म फुग्यांच्या आजूबाजूला असलेल्या केशवाहिन्यांच्या जाळयातून रक्तप्रवाह खेळता असतो. हवा आणि रक्तप्रवाह या दोन्हींमध्ये वायूरुपी पदार्थांची देवाणघेवाण यामुळे शक्य

होते. या देवाणघेवाणीत रक्तातले काही वायुरूप पदार्थ (कार्बवायू, पाण्याची वाफ व इतर काही पदार्थ) बाहेर टाकले जातात. हवेतून रक्तामध्ये प्राणवायू घेतला जातो. प्राणवायू व कार्बवायूची देवाणघेवाण रक्तातल्या तांबडया पेशींमधील रक्तद्रव्यामुळे (हिमोग्लोबीन) होऊ शकते.

हा 'शुध्द' केलेला रक्तप्रवाह हृदयाच्या डाव्या भागात येतो. तेथून तो रोहिण्यांमार्फत सर्व शरीरात पोहोचवला जातो. याचप्रमाणे 'अशुध्द' रक्त महानीलेमार्फत हृदयाच्या उजव्या भागात येते. तेथून हे रक्त फुप्फुसांमध्ये पोहोचवले जाते. असे हे चक्र सतत चालते. श्वसनसंस्थेला हवेचा पुरवठा करण्यासाठी नाकापासून सुरुवात होते. घशात स्वरयंत्रापासून श्वासनलिका सुरू होते. नाक, घसा व स्वरयंत्र यांना बाह्य श्वसनसंस्था असे नाव देता येईल. त्याखाली श्वासनलिकेपासून फुप्फुसापर्यंत आतली श्वसनसंस्था असते. या विभागणीचे खूप महत्त्व आहे. बाह्य श्वसन संस्थेचे आजार सहसा किरकोळ असतात. तर आतल्या श्वसनसंस्थेचे बहुतेक आजार गंभीर असतात.


फुप्फुसाचे भाग 

छातीत श्वासनलिकेच्या दोन मुख्य शाखा तयार होतात उजवी आणि डावी. या मुख्य शाखेपासून प्रत्येकी तीन तीन फांद्या निघतात. या तीन उपशाखा - (वरची, मधली, खालची) - फुप्फुसाच्या वेगवेगळया भागांना हवा पुरवतात. प्रत्येक फुप्फुसाचे याप्रमाणे तीन भाग पडले आहेत

(वरचा भाग, मधला भाग, खालचा भाग.) मात्र डाव्या बाजूच्या फुप्फुसाचा मधला भाग फार लहान असतो कारण ती जागा हृदयाने व्यापलेली असते. म्हणून डाव्या फुप्फुसाचे वरचा व खालचा असे दोन भाग सांगण्याची पध्दत आहे. ही माहिती घेण्याचे कारण असे, की सहसा

फुप्फुसाच्या आजारांमध्ये यांपैकी एखादाच भाग आजारी होतो. विशेषतः न्यूमोनिया व क्षयरोग हे आजार बहुधा फुप्फुसाच्या एखाद्या भागातच बहुधा वरचा भाग होतात.
वायुकोश व श्वासनलिकांचे जाळे 

फुप्फुसाची एकूण रचना ही एखाद्या झाडासारखी फांद्याफांद्यांची असते; फक्त पानांच्या ऐवजी फुग्यांची कल्पना करा. श्वासनलिकेतून हवा घेतल्यानंतर हे असंख्य सूक्ष्म फुगे (वायुकोश) थोडे फुगतात. हवा सोडून देताना ते लहान होतात. हे सतत लहानमोठे होणे हेच फुप्फुसाचे मुख्य

कामकाज आहे. यासाठी श्वासनलिकांचे सर्व जाळे लवचीक असते. हा लवचीकपणा धूम्रपान, प्रदूषण, इत्यादी कारणांमुळे कमी होतो. धूम्रपानामुळे श्वासनलिकांच्या शाखा-उपशाखा आकुंचित व अरूंद होतात, आणि छातीवर दम्यासारखा परिणाम होतो.

स्राव (पाझर) 

श्वासनलिकेच्या शाखा-उपशाखांमध्ये ओलेपणा राहण्यासाठी पाझर होत असतात. निरोगी अवस्थेत हे पाझर थोडे असल्याने जाणवत नाहीत. पण काही कारणांमुळे हे स्राव वाढले तर खाकरा-बेडका या स्वरूपात ते जाणवतात. काही आजारांमध्ये फुप्फुसात दाह निर्माण होऊन आत पाझर वाढतात. ते श्वासनलिकेत येऊन खाकरा-बेडका या स्वरूपात बाहेर पडतात.


दुपदरी आवरण 

एकात एक अशा दोन प्लॅस्टिक बॅगची कल्पना करा. फुप्फुसाच्या भोवती असे पातळ दुपदरी आवरण असते. या दोन थरात पोकळी असते व त्यात थोडासा द्रव असतो. त्यात हवा येऊ शकत नाही. छातीच्या पिंजर्‍याची भिंत आणि फुप्फुसे या दोन्हींच्या मध्ये हे दुपदरी आवरण असते. निरोगी अवस्थेत यात ओलेपणा असण्याइतकाच द्रव असतो. क्षयरोग व इतर 'पू' कारक जंतुदोषामुळे यात जादा द्रव जमतो. (छातीत पाणी होणे) त्याचा दाब फुप्फुसाच्या तेवढया भागावर येऊन श्वसनाला अडथळा येतो.

श्वसनाची हालचाल

श्वसनाची लयबध्द क्रिया ही मेंदू, चेतासंस्था व श्वसनाचे स्नायू यांच्यामुळे शक्य होते. श्वसनाचे मुख्य स्नायू म्हणजे श्वासपटल (म्हणजे छाती आणि पोट यांच्यामधला घुमटासारखा स्नायु पडदा) आणि बरगडयांचे स्नायू, हे स्नायू इच्छेनुसार हलवता येतात. पण हे स्नायू आपल्याला जाणीव नसते तेव्हा आपोआपही (इच्छेशिवाय) काम करीत असतात. या स्नायूंचे नियंत्रण मूळ मेंदूतील केंद्रे करतात. काही गंभीर आजारांमध्ये या केंद्राचे कामकाज बिघडून श्वसन बंद पडते. यामुळे मृत्यू येऊ शकतो. मेंदूचा रक्तपुरवठा बंद पडणे, सर्पदंश, विषबाधा, इ. यामुळे असे होऊ शकते.

सायनस व कानाघ नळी 

श्वसनसंस्थेच्या या मुख्य रचनेशिवाय आणखी एक भाग म्हणजे सायनस. सायनस म्हणजे नाकाला जोडलेली हाडातली पोकळी. एखाद्या घरात जशा खोल्या असतात तसे नाकाला सायनस असतात. नाकाच्या दोन्ही बाजूंना चार-चार अशा एकूण आठ पोकळया असतात. यात हवा असते. मध्यकर्णातून निघणारी नळीही नाकात उघडते (कानाघ नळी). म्हणूनच सर्दीपडशात सायनसदुखी किंवा कानदुखी होऊ शकते.

श्वासनलिकादाहः श्वासनलिकेची सुरुवात स्वरयंत्रापासून होते. यातून झाडाच्या फांद्यांप्रमाणे क्रमाक्रमाने लहान लहान उपनलिका निघून श्वासनलिकांचे एक जाळे तयार होते.

कारणेः श्वासनलिकादाह म्हणजे कोणत्या तरी कारणाने श्वासनलिकेच्या अंतर्भागातील आवरणाला सूज येणे. श्वासनलिकादाहाची पुढीलप्रमाणे अनेक कारणे असू शकतात. जंतुदोष, जंतखोकला, धूम्रपान, प्रदूषित वातावरण,वावडे, इ. जिवाणूंप्रमाणे विषाणूही श्वासनलिकादाह निर्माण करु शकतात. या आजारात आधी कोरडा खोकला येतो. नंतर नंतर थोडे बेडके पडतात. विशेषतः छातीच्या मधोमध थोडे थोडे दुखते. जंतुदोष असल्यास ताप येतो.

कारणानुसार उपचारः आजाराचे कारण ओळखून उपचार करणे आवश्यक आहे. धूम्रपान, प्रदूषण ही कारणे असल्यास नुसत्या औषधाने आजार बरा होणार नाही. शक्य तर ते कारण दूर करावे लागेल. वावडे (ऍलर्जी) असल्यास सुरुवातीला कारण ओळखणे अवघड असते. एखाद्या पदार्थाचा वारंवार संबंध येऊन दर वेळी असा विशिष्ट त्रास होणे, ही वावडयाची खूण असते. सर्दी-पडसे, घसासूज, फ्लू यांबरोबर (किंवा पाठोपाठ) येणारा श्वासनलिकादाह हा जिवाणू-विषाणू दाहामुळे असतो. विषाणू-जिवाणू यांपैकी कोणते कारण आहे हे ओळखणेही अवघड असते.

जिवाणूदोष टेट्रा किंवा कोझालच्या गोळयांनी बहुधा थांबतो. विषाणुदोषाचा आजार बहुधा आपोआप थांबतो. कोरडा खोकला थांबत नसल्यास कोडीन गोळया द्या. पण बेडके पडत असल्यास कोडीन देऊ नये. कोडीनमुळे बेडके पडून जायला अडचण होईल. व्हिक्स, अमृतांजन, इत्यादी छातीला चोळल्याने काहीही फरक पडत नाही. वाफारा उपचार उपयुक्त आहे. एखाद्या भांडयात (शक्यतो चहाच्या किटलीत) गरम पाणी घेऊन डोक्यावर चादर घेऊन वाफारे छातीत घ्यावेत. असे सुमारे पंधरा मिनिटे करावे. त्यामुळे श्वासनलिकेतील बेडके सुटायला मदत होते. फुप्फुसाच्या इतर काही आजारांतही वाफार्‍यांचा चांगला उपयोग होतो.

धूम्रपान किंवा प्रदूषणामुळे श्वासनलिका व उपनलिका कायमच्या अरुंद होतात. यावर कायमचा उपाय काही नाही, धूम्रपान थांबवल्यास पुढचे नुकसान तेवढे टळेल. श्वासनलिकादाहाचे आणखी एक कारण म्हणजे पोटातले जंत, हत्तीरोगाचे जंत, इत्यादी. जंतांच्या सूक्ष्म अवस्थेतल्या अळयांनी फुप्फुस व श्वासनळीचा सौम्यदाह होतो. या प्रकारात अनेक महिने टिकणारा कोरडा खोकला, थोडासा दम लागणे, कधीकधी बारीक ताप असणे, इत्यादी लक्षणे आढळतात. रक्तातल्या विशिष्ट पांढर्‍या पेशींची संख्या वाढलेली आढळते. आपण याला 'जंतखोकला' असे म्हणू या. यावर बेंडेझोल व डाकाझिनच्या गोळया हा उपायआहे. लहान मुलांमध्ये जंतखोकला जास्त प्रमाणात आढळतो. असा खोकला बेंडेझोल गोळयांनी थांबतो.

खोकला आणि खोकल्याची औषधेः दुकानातील खोकल्यावरची औषधे हा एक गोंधळाचा प्रकार आहे. यातली बरीच औषधे निरुपयोगी व महाग असतात. खोकल्याचे कारण व त्यावर असणार्‍या औषधांची संख्या मर्यादित आहे. आधी आपण खोकल्यावर परिणाम कसा व कोणत्या औषधांनी होऊ शकतो हे पाहू या. खोकल्यावर चार प्रकारचे औषधगट काही प्रमाणात उपयोगी आहेत.

गट-१: घशाची खवखव कमी करणारी औषधे : ज्येष्ठमध, साखर, माल्ट किंवा मधातली औषधे (सिरप), ग्लिसरिन, इ. औषधे घशाचा दाह कमी करतात व खोकला सौम्य करतात. हाच परिणाम खडीसाखर किंवा गूळ चघळल्याने होतो. बाळहिरडा चघळल्यास लाळ सुटून घसा ओला होतो तसेच हिरडा दाह कमी करतो. दुकानात खोकल्यासाठी आणि घशाची खवखव कमी करण्यासाठी अनेक प्रकारच्या गोळया मिळतात. या गोळयांमध्ये साखर आणि मुख्यत: मेंथॉल असतो. ही सर्व औषधे घशाच्या खोकल्यापुरतीच मर्यादित आहेत.

गट-२: कफ, बेडका सुटण्यास मदत करणारी औषधे. यातही दोन उपप्रकार आहेत. एक गट आहे श्वसनलिकांमध्ये पाझर वाढवणारा. अडुळसा या प्रकारचे काम करतो. दुसरा गट आहे कफ पातळ करणारा. यात मुख्यत: ब्रोमेक्झीन हे औषध आहे. अडुळशामध्ये ब्रोमेक्झीन हे एक प्रमुख औषध असते. श्वासनलिका दाहामुळे होणार्‍या खोकल्यासाठी ही औषधे उपयुक्त आहेत. यापैकी अडुळसा तर आपण घरीही लावू व वापरू शकतो. सोडियम पोटॅशियम क्षार ही पाणी सुटावण्याचे काम करतात. म्हणूनच अशा खोकल्यात जास्त मीठ पाणी घेत राहिल्यास उपयोग होतो.

गट-३: खोकला दाबणारी औषधे- मेंदूतील खोकला-केंद्रावर नियंत्रण वाढवून खोकल्याची क्रिया मंदावणारी ही औषधे आहेत. या औषधांमध्ये कोडीन हे एक प्रमुख औषध आहे. याच गटात इतरही काही औषधे आहेत.

गट-४: श्वासनलिका सैलावणारी औषधे - ही औषधे उदा. सालमाल, अमिनो. श्वासनलिका रुंदावून बेडका बाहेर काढायला मदत करतो. इंग्रजीत कफ म्हणजे खोकला, पण मराठीत कफ हा शब्द 'बेडका' या अर्थाने वापरतात.

खोकला आणि आयुर्वेदः सर्वसाधारण खोकल्यासाठी सितोपलादी चूर्ण एक-दीड चमचा द्यावे. कोरडा खोकला असताना हे चूर्ण एक चमचा तुपात द्यावे. खोकल्याची ढास पुष्कळ असल्यास लवंगादी वटी, खदिरादी वटी (१५० मि.ग्रॅ.) तोंडात चघळून चांगला उपयोग होतो.

सर्वसाधारण पुन्हा पुन्हा येणार्‍या खोकल्यासाठी कण्टकारी वनस्पती उपयुक्त आहे. या वनस्पतीपासून तयार केलेला अवलेह किंवा रसापासून तयार केलेले आसव गुणकारी असते. अडुळशापासून केलेली औषधेही उपयुक्त आहेत. कण्टकारी ही वनस्पती जमिनीबरोबर पसरणारी काटेरी वनस्पती आहे. ती मार्च ते मे या काळात भरपूर येते. जांभळट फुले, पिवळी छोटया वांग्यासारखी फळे ह्यावरून ती ओळखू येते. या वनस्पतीचा रस कमी असल्याने आसवापेक्षा अवलेह किंवा साखर करून ठेवता येते. अवलेह एक-एक चमचा सकाळ-संध्याकाळ ७ ते १० दिवस वापरावा. आसव दोन चमचे + पाणी दोन चमचे असे सकाळ-संध्याकाळ ३ ते ७ दिवस वापरावे. खोकल्यासाठी आणखी एक उपचार आहे. बिब्ब्याला खिळा टोचून खिळयाला लागणारे तेल कोमट दुधात मिसळा. असे अर्धा कप दूध दहा दिवस रोज द्यावे.

कोरडा खोकला हा तूप, बाळहिरडा, खडीसाखर, इत्यादी घरगुती उपायांनी आटोक्यात येऊ शकतो. खडीसाखर किंवा बाळहिरडा चघळत राहिल्याने ठसका बर्‍याच प्रमाणात कमी होतो. मध + हळद चाटणानेही कोरडा खोकला आटोक्यात येतो.

सर्दी- पडसेः सर्दी-पडसे ही अगदी सामान्य तक्रार आहे. सर्व वयाच्या, सर्व प्रकारच्या व्यक्तींना सर्दी होऊ शकते. हवामान बदलताना अनेकांना सर्दी-पडशाचा त्रास होतो. सर्दी-पडसे एका जातीच्या विषाणूंमुळे (किंवा काही वेळा वावडयामुळे) होते. हे विषाणू एकापासून श्वासावाटे दुसर्‍याकडे सहज पसरतात. एक-दोन दिवसांत त्यालाही सर्दी सुरू होऊ शकते. या विषाणूंविरूध्द थोडीफार प्रतिकारशक्ती तयार झाली तरी ती अल्पजीवी असते म्हणून, त्याच व्यक्तीला पुन्हापुन्हा सर्दी होऊ शकते.

रोगनिदान 

१. सर्दी-पडशामध्ये नाकाच्या आतल्या आवरणाचा दाह होतो, त्याला सूज येते व त्यातून पाणी वाहते. नाकाचा आतला भाग अशा वेळी  लाल व सुजलेला दिसेल. सुजेमुळे कधीकधी नाकाच्या आतली हवेची वाट अरूंद होऊन श्वासाला त्रास होतो (नाक चोंदणे).
२. सर्दी-पडशात नाकाच्या आतल्या भागाला सूज आल्याने नाकातून कानांत पोचणार्‍या 'कानाघ' नळीचेही तोंड कधीकधी बंद होते. त्यामुळे कानात विचित्र संवेदना होणे, कान गच्च होणे, दडे बसणे, इत्यादी त्रास होतो.
३. सर्दीच्या पहिल्या दोन तीन दिवसांत नाकातले पाणी पांढरे आणि पातळ असते. नंतर हळूहळू ते घट्ट होत जाते. कधीकधी नंतर होणारा जंतुदोष (जिवाणू) हे या घट्टपणाचे कारण असते. सर्दी-पडशात बारीक ताप येतो.
४. डोके जड होते व दुखते.
४. डोळयातून सारखे पाणी येते.
५. वावडयाच्या सर्दीमध्ये खूप शिंका येतात. नाकातून पाणी गळते. नाक व डोळे यांना खाज येते.

सर्वसाधारणपणे सर्दी एका आठवडयात पूर्णपणे बरी होते.

उपचार 

डोकेदुखीवर ऍस्पिरिन किंवा पॅमाल घेण्यापलीकडे विशेष उपचाराची गरज पडत नाही. सीपीएम गोळीने वावडयाची सर्दी कमी व्हायला मदत होते. मात्र या गोळीमुळे गुंगी व झोप येते. पण शरीराला थोडा व्यायाम दिला तरीही नाक आपोआप मोकळे होते.

अजून विषाणूंवर कोणतेही परिणामकारक औषध नसल्याने विषाणूसर्दी 'बरी' होण्यासाठी कसलेही औषध नाही. जाहिरातीत अनेक प्रकारच्या गोळया असल्या तरी सर्दी बरी करणारे औषध त्यात नसते. त्यात फक्त डोकेदुखीसाठी ऍस्पिरिन मात्र असते. 'विक्स', 'रबेक्स' या मलमांमध्ये असलेल्या पाच घटकांपैकी फक्त एक घटक मेंथॉल उपयोगी ठरू शकतो. तोही फक्त चोंदलेले नाक मोकळे करण्यासाठी. बाकी सर्व निरुपयोगी मालमसाला! कसलेही औषध घेतले तरी सर्दी बरी व्हायला आठवडाभर लागू शकतो.

सर्दीचा त्रास वारंवार होत असल्यास कानाघ (कान-नाक-घसा) तज्ज्ञाकडून अंतर्गत तपासणी करून घ्यावी. नाकाच्या अंतर्भागात 'पॉलिप' (लहान द्राक्षघडासारखी वाढ) असल्यास वांरंवार सर्दीचा त्रास होतो. हा विकार सूक्ष्म दर्शकातून शस्त्रक्रियेने (एंडोस्कोपी सर्जरी) पूर्ण बरा करता येतो.

आयुर्वेदः सर्दी- पडसे कमी होण्यासाठी लंघन (उपवास) खूपच उपयुक्त आहे. पंखा, धुरळा किंवा इतर काही विशिष्ट कारण माहीत असल्यास ते टाळण्याचा प्रयत्न करावा. काही लोकांना रात्री झोपण्यापूर्वी खूप पाणी पिण्याची सवय असते, यामुळेही सर्दी-पडसे होऊ  शकते. थंडी, पावसाळा संपून ऊन तापू लागताना बर्‍याचजणांना सर्दी होते. ही सर्दी थांबवण्याचा प्रयत्न करू नये; वाहू द्यावी, म्हणजे श्वसनसंस्थेचे इतर भाग (श्वासनळी, फुप्फुसे) निरोगी राहतात. अशी सर्दी औषधांनी दाबण्याचा प्रयत्न केल्यास श्वसनसंस्थेच्या खालच्या भागात स्राव सुरू होतात असा आयुर्वेदाचा अनुभव आहे. म्हणूनच नाकातून सर्दी वाहून जाऊ देणे महत्त्वाचे आहे. सर्दीवर नागगुटी किंवा त्रिभुवनकिर्ती या औषधांच्या २-२ गोळया दिवसातून ३ वेळा याप्रमाणे ३ दिवस द्या. मसालेदार व तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे श्वसनसंस्थेत पाझर वाढून नाक लवकर मोकळे होते असा अनुभव आहे. या गुणांचा उपयोग करून तिखटाने सर्दीवर थोडा आराम मिळू शकतो.

जलनेतिः सतत व वारंवार सर्दीसाठी हा उपाय करुन पाहावा. नाकातून स्राव वाहून जाण्यास मदत व्हावी म्हणून कोमट मीठपाण्याने नाकाच्या अंतर्भागाची स्वच्छता करावी. या क्रियेला जलनेति म्हणतात. यासाठी मीठ मिसळून अश्रूंच्या चवीचे सुमारे अर्धा लिटर कोमट खारट पाणी तयार करावे. हे पाणी आधी 'चालू' असलेल्या नाकपुडीतून हळूहळू सोडावे. तोंडाने श्वासोच्छ्वास चालू ठेवावा म्हणजे हे पाणी घशात उतरत नाही. ते आपोआप दुसर्‍या नाकपुडीतून वाहते. यानंतर हाच प्रयोग दुसर्‍या नाकपुडीतून करावा. नाकाचा अंतर्भाग, पोकळया, सायनस पोकळयांची तोंडे या क्रियेने स्वच्छ व मोकळी होतात. यामुळे घाण बाहेर पडायला मदत होते. मिठाचे प्रमाण अश्रूंच्या चवीपेक्षा कमी किंवा जास्त झाले असेल तर या पाण्याने नाक चरचरते. शुध्दीक्रिया झाल्यानंतर एकेक नाकपुडी हलकेच शिंकरून साफ करावी. वाकून उभे राहिल्यावर घशात न जाता पाणी सहज बाहेर पडते.

नस्यः यानंतर पाठीखाली दोन उशा घेऊन उताणे झोपावे. (डोक्याखाली नाही) या अवस्थेत नाकात गाईच्या किंवा म्हशीच्या पातळ तुपाचे एक-दोन थेंब टाकावेत. मानेच्या अशा अवस्थेत नाकात टाकलेले थेंब घशात उतरत नाहीत. यासाठी वचादि तेल किंवा खोबरेल तेलही चालते. अणुतैल औषधांचे थेंब नाकात टाकण्याने वारंवार होणारा सर्दीचा त्रास आटोक्यात राहतो. वेखंडयुक्त तेलाचे थेंबही यासाठी चांगले. वैद्यकीय दुकानात ते 'वचादि तेल' या नावाने मिळते.

सर्दीपासून नंतर होणारे आजारः सर्दी - पडशाने नंतर आणखीही काही आजार निघू शकतात. ते म्हणजे कानदुखी, सायनसदुखी, घसासूज, श्वासनलिकादाह, इत्यादी. सर्दी-पडशात विषाणुमूळे दाह असल्याने श्वसनमार्गाची प्रतिकारशक्ती थोडी कमी होते. त्यामुळे जंतुदोष होऊ शकतो.

कानाघ नळीतून सर्दी-पडशाचे पाणी कधीकधी कानात ढकलले जाते. यामुळे मध्यकर्णाला सूज येते. यामुळे कान ठणकतो व नंतर कानाचा पडदा फुटू शकतो.

सर्दीमुळे घसासूज व श्वासनलिका दाह झाला असेल तर खोकला हे प्रमुख लक्षण असते. सायनसदुखीमध्ये कपाळात भुवयांवर, डोळयांच्या खाली जडपणा किंवा ठणका सुरू होतो. या सर्व इतर त्रासांचे कारण बहुधा जंतुदोष असतो. या तीनही आजारांत कोझाल, ऍमॉक्सी किंवा टेट्राच्या गोळयांनी आराम पडतो. सायनसदुखी मात्र कधीकधी टिकून राहते.  सायनसमधला पू काढून टाकण्यासाठी कधीकधी शुध्दीक्रिया करावी लागते.

लेखक परिचय

डॉ. शाम विनायक अष्टेकर, एम्.बी.बी.एस. बी.जे मेडिकल कॉलेज, पुणे, एम.डी. (सामाजिक व रोगप्रतिबंधक वैद्यकशास्त्र), बी.जे. मेडिकल कॉलेज, पुणे.
डॉ. रत्ना पाटणकर अष्टेकर (सहलेखिका), बी.जे मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस. आणि नंतर बालरोग शाखेत डिप्लोमा. १९८८ पासून दिंडोरी येथे ग्रामीण रुग्णालय चालवित आहे.

अभ्यास

१. 'वचन' संस्था, नाशिक यांच्या ३५ आरोग्यरक्षकांच्या कामाचा अभ्यास - अहवाल. (Knowing Health Workers)
२. चीन व फिलिपाईन्स देशांतील आरोग्य-व्यवस्थांचा प्रत्यक्ष अभ्यास.
३. इंग्लंड, जर्मनी, अमेरिका या देशांच्या आरोग्यव्यवस्थांचा अभ्यासदौरा.
४. मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील ग्रामीण आरोग्य सेवांचा अभ्यास.
५. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण डॉक्टर्सचा अभ्यास, २००१.

संदर्भः सर्दी

श्रेय-अव्हेरः वरील लेख माझा नसून अष्टेकर डॉक्टर पती-पत्नींचा आहे.

2013/06/11

रक्तशुद्धीकरणः मल-निस्सारण-आपूर्तीचे माप

पाश्चात्य वैद्यकशास्त्रात, Kt/V ही मितीहीन गुणोत्तर संख्या, रक्तातील यांत्रिक मल-निस्सारण-उपचारांचा पूर्तीस्तर दर्शवत असते. यातः

K - यांत्रिक मल-निस्सारणाची युरिया-स्वच्छता-क्षमता, लीटर/तास
t - यांत्रिक मल-निस्सारण कालावधी, तास
V युरियाचे वितरण क्षेत्र, अदमासे रुग्णाच्या शरीरातील एकूण शारीर पाणी, लीटर

जेव्हा हे गुणोत्तर १ असते तेव्हा, यांत्रिक मल-निस्सारणा-दरम्यान, एकूण शारीर युरियाचे सर्व वितरण क्षेत्र, एकदा युरिया-विहीन झालेले असते.

फ्रँक गॉच आणि जॉन सार्जंट ह्यांनी, नॅशनल को-ऑपरेटिव्ह डायलिसिस स्टडीमधील विद्याचे (माहितीचे) विश्लेषण करत असता, यांत्रिक मल-निस्सारणाच्या पूर्ततेचा स्तर निर्धारित करण्यासाठी, ही गुणोत्तराची संकल्पना विकसित केली. यू.एस. नॅशनल किडनी फौंडेशन मध्ये Kt/V १.३ राखण्याचे लक्ष्य ठरवले जाते, ज्यामुळे किमान १.३ इतके तरी यांत्रिक मल-निस्सारण प्रत्यक्षात प्राप्त होण्याची खात्री बाळगता येते.

आता असे गृहित धरूया की, यांत्रिक मलनिस्सारणानंतर (पोस्ट-डायलिसिस) आणि यांत्रिक मलनिस्सारणापूर्वीच्या (प्रि-डायलिसिस) रक्तद्रावणातील युरियामधील नत्राच्या संहती, अनुक्रमे C मोल/लीटर आणि C मोल/लीटर आहेत.

जेव्हा शरीरातील एखाद्या पदार्थाची संहती, त्या पदार्थाच्या वर्तमान संहतीच्या प्रमाणात घटत असते तेव्हा, अशा प्रकारचा र्‍हास घातधर्मी म्हणवला जातो. अशा घातधर्मी र्‍हासात, शरीरातील त्या पदार्थाच्या र्‍हासाचा दर शरीरातील त्या पदार्थाच्या वर्तमान संहतीच्या प्रमाणात असतो. हेच गणितीय परिभाषेत आपल्याला खालीलप्रमाणे लिहिता येईल.

V(dC/dt) = - KC ...... (१) यात,

C म्हणजे मोल/लीटर एककांत व्यक्त केलेली शरीरातील त्या पदार्थाची वर्तमान संहती,
t म्हणजे तास ह्या एककात व्यक्त केलेला यांत्रिक मलनिस्सारणाचा कालावधी,
K म्हणजे घन मीटर/तास एककांत व्यक्त केलेली यांत्रिक मल-निस्सारणाची युरिया-स्वच्छता-क्षमता,
V म्हणजे लीटर ह्या एककात व्यक्त केलेले शरीरातील युरिया-वितरण-क्षेत्राचे आकारमान होय.

समीकरण (१) ची गणितीय उकल

C = Co e** (-Kt/V)

किंवा

Kt/V = ln (Co/C) ...... (२)

अशी करता येते. ह्यात अनुक्रमे C मोल/लीटर आणि C मोल/लीटर ह्या, यांत्रिक मलनिस्सारणानंतर (पोस्ट-डायलिसिस) आणि यांत्रिक मलनिस्सारणापूर्वीच्या (प्रि-डायलिसिस) रक्तद्रावणातील युरियामधील नत्राच्या संहतींचे प्रत्यक्ष मापन करता येते. म्हणून यांत्रिक-मलनिस्सारण-आपूर्ती (Kt/V) सुद्धा अप्रत्यक्षरीत्या मोजली जाऊ शकते.

ह्यावरून, युरिया-रिडक्शन-रेशो URR = १- C / C

आकडेमोडीचे उदाहरण

असे समजा की एका रुग्णाचे वजन ७० किलोग्रॅम आहे. त्याचे यांत्रिक-मलनिस्सारण चार तास चालले. यांत्रिक मल-निस्सारणाची युरिया-स्वच्छता-क्षमता १२.९ लीटर/तास आहे.

तर Kt/V = (१२.९ x ४) / (७० किलोग्रॅम x ०.६ लीटर पाणी/ किलोग्रॅम शरीर-वस्तुमान) = १.२३
याचा अर्थ असा होतो की जर रुग्णास Kt/V = १.२३ होईपर्यंत यांत्रिक-मलनिस्सारण पुरवले, आणि रक्तातील युरिया-नत्राची (मलनिस्सारणा नंतरची पातळी/मलनिस्सारणापूर्वीची पातळी), हे गुणोत्तरही १.२३ हेच असायला हवे.

संदर्भ
१.      http://en.wikipedia.org/wiki/Kt/V विकिपेडियावरील संबंधित माहिती.

२.      http://kidney.niddk.nih.gov/kudiseases/pubs/hemodialysisdose/#kt/v
नॅशनल किडनी अँड युरोलॉजिक डिसिजेस इन्फॉर्मेशन क्लिअरिंग हाऊस, यू.एस.डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेस ह्यांचे अधिकृत संकेतस्थळ.

2013/05/29

निरंतर, चालनानुकूल, पोटातून-रक्तशुद्धी व रक्तगाळप

निरंतर, चालनानुकूल, पोटातून-रक्तशुद्धी रक्तगाळप (नि.चा.पो..)
(कंटिन्युअस अँब्युलेटरी पेरिटोनिअल डायलिसीस- सी..पी.डी.)

इथे दिलेली माहिती ही केवळ मार्गदर्शक म्हणून दिलेली आहे आणि आणखी माहिती रुग्णांनी त्यांच्या डॉक्टरांकडूनच मिळवावी.

नि.चा.पो.. प्रक्रियेची तोंडओळख

निरंतर, चालनानुकूल, पोटातून-रक्तशुद्धी रक्तगाळप (नि.चा.पो..) शरीरातच, पोटाच्या नैसर्गिक अस्तराचा वापर करून होत असते. पोटाचे आवरण, रक्तशुद्धी रक्तगाळप यांकरता गाळणी म्हणून काम करत असते. ह्या तंत्राने रक्तशुद्धी रक्तगाळप करण्यासाठी तुमच्या पोटात प्रवेशक (कॅथेटर) बसवण्याकरता एका लहानशा शल्यक्रियेची आवश्यकता असते (जी स्थानिक अथवा सार्वदेहिक भूल देऊन केली जाते).

ही प्रक्रिया घरीच, दिवसातून साधारणपणे चार वेळा पार पाडली जाते. प्रत्येक वेळी ह्याकरता सुमारे ३० मिनिटांहूनही कमी वेळ लागत असतो आणि प्रक्रिया खूप सोपी दुःखहीन असते. प्रक्रिया घरीच केली जात असल्याने, रुग्णाने त्यांच्या उपचारांबाबतची मुख्य जबाबदारी सांभाळण्यास सक्षम आणि सिद्ध असावे लागते. याकरता लागणारे सारे उपस्कर तुम्हाला घरपोच दिले जातात. यात रक्तशुद्धी पिशव्यां (बॅग्ज) चाही समावेश होतो, ज्या डब्यात बंद करून पाठविल्या जातात. त्यांच्या साठवणाकरता तुमच्यापाशी जागा असायला हवी असते. एखादे कोरडे कोठीघर (गॅरेज) किंवा तत्सम बाह्य बांधकाम ह्याकरता आदर्श ठरते, पर्यायाने तुमच्या घरातीलच वापरात नसलेली खोलीही तुम्ही ह्याकरता वापरू शकता.

जर तुमचेपाशी मर्यादित जागा असेल तर, तुमच्या नि.चा.पो..-परिचारकाशी ह्याबाबत चर्चा करणे श्रेयस्कर ठरेल. खालील आकृती अशा रक्तगाळपाचे सर्व महत्त्वाचे भाग दर्शवत आहे. जेव्हा तुम्ही ही प्रक्रिया अवलंबत असता तेव्हा, प्रथमतः तुम्हाला खालील पिशवीत विसर्ग उत्सर्जित करावा लागेल. त्यानंतर वरच्या पिशवीतून शुद्धकद्रव (डायलेसेट) पोटाच्या पोकळीत उतरवावा लागेल. ह्यालाचविनिमयकरणे म्हणतात. ह्यात वापरलेल्या शुद्धकद्रवाच्या जागी ताजा शुद्धकद्रव भरला जात असतो. शुद्धिकरणार्थचे द्रावण, ज्याला शुद्धकद्रव असे संबोधले जात असते, ते तुमच्या शरीरात तास राहू दिले जाते. ह्या काळात ते द्रव तुमची मूत्रपिंडे जे काम पूर्वी करत असत, ते काम करते. पाच तासांनंतर हीच पद्धत परत अंमलात आणा. तुम्ही तुमची रक्तशुद्धी करण्याच्या वेळा तुमच्या दैनंदिन व्यवहारांशी जुळवून घेऊ शकता. तुम्ही घड्याळाशी बांधलेले आहात असे वाटून घेण्याचे काहीच कारण नाही.

तुमच्या नि.चा.पो.. तज्ञ परिचारकाकडून तुम्हाला प्रशिक्षण दिले जाईल, ज्यामुळे तुम्हाला सुखाने स्वतंत्र होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व कसब (एक्सपर्टीज) आणि आत्मविश्वास प्राप्त होईल. अर्थातच, आवश्यक तेव्हा तुम्हाला आवश्यक आधार आणि डॉक्टरी सल्लाही मिळेलच. नि.चा.पो.. करत असता मधल्या काळात तुम्ही सामान्य सक्रिय कार्यशील आयुष्य जगू शकता.


निरंतर चालनानुकूल पोटातून रक्तशुद्धी व गाळप प्रक्रिया

नि.चा.पो.. प्रक्रिया का अवलंबिली जाते?

गंभीर स्वरूपाच्या मूत्रपिंड बिघाड झालेल्या रुग्णांत, उत्सर्जित पदार्थ साचत जातात, ज्यामुळे रुग्णास आजारी आहोत असे वाटू लागते. अशा रुग्णांत, रक्तातील उत्सर्जित पदार्थ निष्कासित करण्यासाठी रक्तशुद्धीकरणाची आवश्यकता असते.

नि.चा.पो.. प्रक्रियेकरता आवश्यक असलेली पूर्वतयारी

एक लहानशी मऊ अप्रत्यास्थ पदार्थाची (प्लास्टिकची) नळी जिला प्रवेशक म्हटले जात असते, ती पोटाच्या पोकळीत बसवली जावी लागते. प्रवेशक नळी त्रासदायक नसते, आणि एकदा का तिची छोटीशी जखम भरली की मग, ती घट्ट बसून राहते. शुद्धीकरण ताबडतोब हवे असल्यास, प्रवेशक नळी लगेचही वापरली जाऊ शकते. सामान्यतः प्रवेशक नळी बसवल्यानंतर दोन सप्ताहांपर्यंत वापरली जात नाही. त्यामुळे त्वचेतील जखम भरून बरी होऊ शकते. ज्यामुळे तिच्या पोटाच्या त्वचेशी असलेल्या जोडातून शुद्धकद्रवाची गळती होण्याची खात्री होते. प्रवेशक नळी बसविल्यावर तुम्हाला ते सप्ताह शुश्रुषालयातच राहण्यास सांगितले जाते, ज्यादरम्यान पिशव्या कशा बदलाव्यात ते तुम्ही शिकून घेऊ शकता. एकदा का ह्या तंत्राविषयी आत्मविश्वास वाटू लागला की मग तुम्ही घरी परतू शकता. थोड्याच काळात हे पिशवी-बदल तुमच्या दैनंदिन व्यवहारांत सहजच सामावले जातात.

नि.चा.पो../स्व.पो..(स्वयंचलित-पोटातून-रक्तशुद्धी गाळप) प्रक्रियेदरम्यान काय होत असते

पोटात घालायच्या प्रवेशकाचे संकल्पनाचित्र
पोटातून-रक्तशुद्धी गाळप, ही, रक्त शरीराबाहेर जाऊ देता, रक्तशुद्धी गाळप साधणारी एक पद्धत आहे. शुद्धकद्रव एका नळीद्वारे पोटाच्या पोकळीत उतरवले जाते. पोटाच्या आत एक पातळ आवरण असते ज्यास अस्तर म्हणतात. अस्तरास सूक्ष्म छिद्रे असतात ज्यावाटे उत्सर्जित विसर्ग-उत्पादने रक्तप्रवाहातून शुद्धकद्रवात पार होऊ शकतात. जेव्हा शुद्धकद्रव नळीतून बाहेर काढले जाते तेव्हा विसर्ग-उत्पादने त्याच वेळी शरीरातून बाहेर पडत असतात. पोटातून-रक्तशुद्धी व गाळप करण्याचे दोन प्रकार आहेत. एकनिचापोरआणि दुसरीस्वपोरपद्धत. ’निचापोरपद्धत मनुष्याकरवीच पार पाडली जाते तर, ’स्वपोरपद्धतीकरता यंत्राचा वापर केला जात असतो. दोन्हीही प्रकारांत शुद्धकद्रव उच्च-दर्जा-वैद्यकीय-अप्रत्यास्थ (प्लास्टिकच्या)पिशवीतून येत असते, जी रुग्णाच्या घरातच साठवली जात असते. हे द्रव पोटाच्या पोकळीत उतरवले जाते आणि काही काळ तिथे राहिल्यानंतर एका रिकाम्या पिशवीत ते उतरवून घेतले जात असते. ’निचापोरपद्धतीत २४ तासात चार पिशव्या वापरल्या जातात. तीन दिवसा आणि एक रात्री. द्रवास पोटात उतरण्यास ते १० मिनिटे लागतात आणि पोटातून बाहेर पडण्यास २० ते ३० मिनिटे लागू शकतात. पिशवीबदल घरीच अथवा कार्यालयीन जागेतही केले जाऊ शकतात. दोन पिशवीबदलांदरम्यानच्या काळात, आयुष्यातील दैनंदिन व्यवहार करण्यास संपूर्ण स्वातंत्र्य मिळत असते. ’स्वपोरपद्धत रात्री अवलंबिली जात असते.
रक्तशुद्धीकरण व गाळप प्रक्रिया

रुग्ण एका यंत्राशी जोडला जातो. ते यंत्र, रुग्ण सुप्तावस्थेत असता शुद्धकद्रवाचे, पोटाच्या आत आणि बाहेर चक्रण करत राहते. बहुधा ते तासांहून अधिक कालावधीत हे आवर्तन पूर्ण होत असते. दिवसा अनेकदा द्रव पोटातच राहून जाते. ह्या प्रकारचे शुद्धीकरण आणि गाळप, दिवसा विनिमय-प्रक्रिया करत राहण्यापासून मुक्ती मिळवून देते. वापरली जाणारी यंत्रे बहुधा व्हिडिओ-रेकॉर्डर इतक्या आकाराची असतात आणि पलंगा-लगतच्या मोढ्यावर बसू शकतात. ’स्वपोरबहुतांशी अशा रुग्णांकरता वापरले जाते, ज्यांना काही कारणांकरता दिवसा पिशवीबदल करणे शक्य होत नाही.

निचापोरदरम्यानच्या संभाव्य गुंतागुंती

काही वेळेस, प्रवेशक अथवा निकासस्थान संसर्ग घडून येऊ शकतो. रोज निकासस्थानाची स्वच्छता करून ह्याचा उत्तम प्रतिबंध करता येऊ शकतो. सौम्य संसर्ग, प्रतिजैव औषधांचे साहाय्याने उपचारिला जाऊ शकतो. तर गंभीर स्वरूपाच्या पू-निर्माण करणार्या संसर्गाच्या प्रकरणात, प्रवेशक काढून टाकावा लागत असतो. अशा वेळी संसर्ग नाहीसा होईपर्यंत, ते सप्ताहांकरता यांत्रिक रक्तशुद्धी गाळप करणे प्रचलित आहे. जर तुम्ही प्रशिक्षणाबरहुकूम विनिमय करत राहिलात तर, तुम्ही संसर्गाची शक्यता घटवू शकता.

प्रक्रियेतील जोडणी आणि उपस्करातील भागांची नावे
जरनिचापोरपद्धत अवलंबली नाही तर काय होते?

पोटातून रक्तशुद्धी गाळप प्रक्रिया ही आयुष्यरक्षक प्रक्रिया आहे. जर रुग्ण दरदिवशी करावयाचे पिशवी-बदल कमी वेळा करत असेल तर, विसर्ग-उत्पादने साचतील आणि आजारपण येईल. जर पोटातून रक्तशुद्धी गाळप प्रक्रिया, उपरोल्लेखित कुठल्याही कारणानी शक्य राहिली नसेल तर, यांत्रिक रक्तशुद्धी गाळप प्रक्रियेचा वापर केला जाऊ शकतो.

पोटातून रक्तशुद्धी गाळप प्रक्रियेचे लाभ तिच्या उणीवा

पोटातून रक्तशुद्धी गाळप प्रक्रियेचा प्रमुख लाभ हा आहे की घरीच केली जाऊ शकते. ती प्रवास सुलभही असते. पिशव्या जगातील अनेक भागांत (सध्या फक्त भारतात) घरीच पोहोचविल्या जाऊ शकतात. पोटातून रक्तशुद्धी गाळप करणारे रुग्ण म्हणूनच खूपच स्वतंत्र असतात आणि शुश्रुषालयात त्यांना केवळ महिन्यातून एकदाच तपासणीकरता जावे लागत असते. शुद्धीकरण गाळप निरंतर होत असल्याने, आहारातील आणि पेयपानाबाबतची पथ्ये, यांत्रिक शुद्धीकरण गाळपाचे मानाने कमी असतात.

निचापोरप्रक्रियेचे कुटुंबावर होणारे परिणाम

जरी पोटातून रक्तशुद्धी गाळप तुम्ही स्वतःचे स्वतः करू शकता तरी, पिशवीबदलाचे दैनंदिन व्यवहार कुटुंबातील इतर सदस्यांनीही जाणून घेणे संस्तुत असते. जर तुम्ही वयस्कर, आंधळे किंवा इतर कारणांनी बरे नसाल तर हे विशेषत्वाने महत्त्वाचे ठरते.

शुद्धकद्रव पिशव्यांचे वजन द्रव संतुलन आकारमान

शुद्धकद्रव पिशव्यांतून पुरवले जाते. ह्या पिशव्या ,५०० मिलीलीटर, ,००० मिलीलीटर किंवा ,५०० मिलीलीटर आकारमानाच्या असतात. तुमच्या शरीरास किती शुद्धीकरण गाळपाची आवश्यकता आहे त्याबरहुकूम, कुठली पिशवी वापरावी त्याबाबत तुम्हाला सल्ला दिला जाईल आणि त्यानुसार ती तुम्हाला पुरवली जाईल.

जर शरीरातून द्रवहानी अथवा द्रवलाभ झाला तर तुमच्या शरीराचे वजन बदलेल (अनुक्रमे घटेल किंवा वाढेल). पुढील विनिमयात अथवा विनिमय मालिकेत, वापरल्या जाणार्‍या शुद्धकद्रव-पिशवीतील द्रवाची तीव्रता (स्ट्रेंग्थ) बदलून हे दुरूस्त केले जाऊ शकते.

तुमच्या शरीराचे वजन आदर्श राखण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असायला हवे. तुमच्या शरीराचे वजन उच्चतर असेल तेव्हाची अवस्था ’अतिभारित (ओव्हरलोडेड)’, तर ते सामान्य वजनापेक्षा कमी असेल तेव्हाची अवस्था ’निर्जल’ म्हटली जाते. ह्या अवस्था अनुक्रमे, जर तुमच्या शरीराने अती द्रव सेवन केले असेल किंवा अती द्रव र्‍हास सोसला असेल तर, उद्‌भवू शकतात. 

शुद्धकद्रवाच्या संहता

शुद्धकद्रवाच्या (लॅक्टेट/ ग्लुकोज) तीन संहता उपलब्ध असतात. निम्न संहता-१.५%, मध्यम संहता- २.५% आणि उच्चतर संहता-४.२५%. स्थिरपद शारीरिक वजन सांभाळण्यासाठी निरनिराळ्या संहता आणि पिशव्यांचे संयोग वापरले जात असतात.

अतिभारिततेची चिन्हेः वजनवाढ, घोट्यांवर सूज, श्वसनकमतरता, डोळ्यांखाली फुगीरता आणि उच्च रक्तदाब. ह्याची कारणे खूप पेयपान, सूप्त द्रव असलेल्या अन्नाचे सेवन आणि पुरेसे द्रव-निष्कासन न होणे, ही असू शकतात. तुम्ही अतिभारित असाल तर डॉक्टरला किंवा मूत्रपिंड-एककास सल्ल्याकरता फोन करा, त्याचवेळी कमी प्या, अधिक संहत पिशवी वापरा आणि तुम्हाला बद्धकोष्ठता नाही ह्याची खात्री करून घ्या.

निर्जलतेची चिन्हेः वजनघट, भोवळ येणे, आजारी वाटणे, बद्धकोष्ठता आणि कमी रक्तदाब. ह्याची कारणे, अपुरे पेयपान आणि बर्‍याच ’संहत’ पिशव्या वापरणे ही असू शकतात. असे झाल्यास डॉक्टर किंवा मूत्रपिंड-एककास सल्ल्यासाठी फोन करा, त्याच वेळी अधिक पेयपान करा आणि निम्न-संहत पिशव्या वापरा.

प्रत्येक सकाळी काय करावेः तुमचे वजन मोजा आणि नोंदवून ठेवा. पेयपान नियंत्रणात ठेवा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार निम्न, मध्यम किंवा उच्च संहत पिशवी वापरा. तुमच्या आदर्श वजनावर राहण्याचा प्रयास करा. द्रव-निष्कासन समस्या उद्‌भवू शकतील, बद्धकोष्ठतेकडे लक्ष न दिल्यास समस्या उद्‌भवू शकतील, नियमितपणे रेचके घ्या. उच्च प्रमाणात चघळचोथा असलेला आहार घ्या आणि समस्या उद्‌भवल्यास डॉक्टरला किंवा मूत्रपिंड-एककास माहिती द्या.

फिब्रीन, जे विसर्ग-उत्पादनांच्या पिशवीत तरंगत असलेल्या लोकरीप्रमाणे दिसते, ते नैसर्गिकरीत्या उत्पन्न होणारे प्रथिन असते. त्यामुळे निस्सारण समस्या निर्माण होऊ शकतात.

विसर्ग-उत्पादनांच्या पिशवीत रक्ताचा नारिंगी किंवा लाल रंग आढळल्यास चिंतित होऊ नका. अस्तराच्या ओढाताणीमुळे किंवा स्त्रियांत मासिकधर्मामुळे असे घडून येऊ शकते. त्यामुळे कदाचित निस्सारण समस्या उद्‌भवू शकतात. दोन्हीही प्रकरणांत आवश्यक असल्यास तुमचे डॉक्टर किंवा मूत्रपिंड-एकक आवश्यक असेल तो सल्ला देतीलच.

संदर्भ

मूळ इंग्रजी शब्दांचे पर्यायी मराठी शब्द

अक्र
मूळ इंग्रजी शब्द
पर्यायी मराठी शब्दAmbulatory
चालण्यास अनुकूल, चालनानुकूल
Ankle
पायाचा घोटा
Breathlessness
श्वसनकमतरता
Continuous
निरंतर
Dehydration
निर्जलीभवन
Dialysate
शुद्धकद्रव
Dialysis
रक्तशुद्धी रक्तगाळप
Disposable
विल्हेवाट लावता येण्याजोगा, निस्सारक्षम
Dizzy
भोवळ येणे, अस्वस्थ वाटणे
१०
Drainage
निस्सारण
११
Expertise
कसब
१२
High grade Medical plastic bags
उच्च-दर्जा वैद्यकीय अप्रत्यास्थ-पिशव्या
१३
Laxatives
रेचक
१४
Membrane
आवरण
१५
Peritoneal
पोटातील
१६
Peritoneum
द्रवस्त्रावी, पातळ, अर्ध-पारदर्शक, सर्व आतडी सामावणारी, पोटाची पिशवी
१७
Puffiness
फुगीरता
१८
Serous
द्रवरूप, द्रवस्त्रावी, रसरूप, रसस्त्रावी
१९
Strength
संहता, तीव्रता
२०
Tugging
ओढाताण
२१
Viscera
आतडी