प्रार्थना

न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं नापुनर्भवं । कामये दुःखतप्तानां‌ प्राणिनां आर्तिनाशनम्‌ ॥

न राज्य चाहूँ, न स्वर्ग चाहूँ और न चाहूँ मोक्ष, मैं तो चाहूँ, दुःखियों की पीडा होवै सभी खतम ।

नको राज्य, नको स्वर्ग, नको मोक्षही मला, दुःखितांच्या नष्ट व्हाव्या, आर्ती सार्‍या आजला.

I desire neither kingdom nor heaven nor liberation. I desire end of miseries for all the life on the earth.

२०२२/१२/१५

शारीरिक स्वायत्तता

शरीर हवं तस वळू शकतं. मूल रांगू लागते तेव्हा तर अनेक बाळांना पायाचा अंगठा तोंडात घालून चोखण्याची सवय असते. जन्मानंतर, वसुदेवाच्या डोक्यावरील टोपलीतून यमुना पार करणारा बालकृष्ण आठवा. मात्र वयाच्या पन्नाशीनंतर, हेच साधता आले तर स्वास्थ्य उत्तम आहे असे समजावे. सांगायचे काय आहे की, वयपरत्वे मनुष्याच्या स्वायत्तता कमी कमी होत जातात. स्नायूकाठिण्य, धमनीकाठिण्य, वृत्तीकाठिण्य अशा सर्व प्रकारच्या कठिणतांमुळे मानवी कुडी आखडत आखडतच जात असते. मुळात लाभलेल्या शारीरिक लवचिकतेचा, वयपरत्वे र्‍हास होतो आणि एक एक स्वायत्तता आपण गमावत जातो. शारीरिक स्वायत्तता सहजी गमवू नये, ह्याकरता काहीतरी केले पाहिजे, म्हणून वाचकांना सतर्क करणे, हाच ह्या लेखाचा उद्देश आहे. 

चौथीच्या वर्गात शिकणारी काही मुलेही, हल्ली दीर्घकाळ (अगदी पंधरा वीस मिनिटेही) मांडी घालून बसू शकत नाहीत. टेबलावर जेवण, शाळांतून बाकड्यांवर बसणे, अगदी शौच्यालाही विलायती कमोडांचा वापर करणे, ह्यामुळे एवढ्या अल्प वयांत मुले मांडी घालण्याची क्षमताच गमावत आहेत. तीशीतल्या बाबांना बुटाचे मोजे चढवायला खाली पौच्यांवर बसणे जड जाते. ते खुर्चीवर बसून मोजे चढवू लागतात. हल्ली कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमांत खाली जमिनीवर बैठकीची सोय केलेली असली, तरी काही प्रमाणात तरी खुर्च्या मांडाव्याच लागतात. मी शाळेत होतो तेव्हा अशी परिस्थिती नव्हती. लहान मुलेच काय पण सर्व वयांतील प्रौढ लोक, तास अन्‍ तास जमिनीवर बसून गणपती उत्सवाचे कार्यक्रम आनंदाने पाहत असत. आपण काही गमावत आहोत काय? काय आहे ते? त्याचाच इथे वेध घेतलेला आहे!

आता मी काही वरकरणी अत्यंत सोप्या वाटणार्‍या शारीरिक कृती सांगणार आहे. करून पाहा.

१.    पायाचे अंगठे जुळवून ताठ उभे राहा. हात शरीरासोबत जमिनीकडे खेचून धरलेले. मग डोळे मिटून घ्या. बघा हं! सांभाळा. तोल का बरे ढळतोय? संतुलन साधणे ही शरीराची अनमोल शक्ती असते. ती गमावणे परवडणारे नसते.

२.    डोळे मिटून घ्या. म्हणजे गच्च नाही. अर्धोन्मिलित. म्हणजे समोरील दृश्य बघायचे नाही म्हणून. सहज. मधून मधून उघडूनही पाहू नका. असे जास्तीत जास्त किती काळ राहता येईल? मिनिटभर, दोन, तीन, किती मिनिटे? कारण सर्व जगाला केवळ नेत्ररंध्रांनी आकळून घेण्याची सवय लागल्याने, आपल्या इतर संवेदनाही सक्षम आहेत, ह्याचे भानच आपल्याला राहिलेले नसते. ते येण्याकरता हे आवश्यक असते. मग आपल्याला निरनिराळे आवाज ऐकू येऊ लागतात. वास येतात. स्पर्श जाणवतात. चाहूल लागते आणि केवळ नेत्रावलंबी झालेल्या आपल्या संवेदना, अष्टपैलू होण्यास मदत होते.

३.    मारूतीला करतो तसा नमस्कार करा. म्हणजे दोन्ही हात जमिनीला समांतर धरून. फक्त हे हात पाठीमागे जोडून पाठच्या व्यक्तीला नमस्कार करायचा आहे. छे! हे हात एकमेकांशी जुळत का नाहीत बरे? हातापायांची निसर्गदत्त लवचीकता चिरजीवी नसते. टिकवली तरच टिकत असते. रोज प्रयत्न करा. हळूहळू साधू लागेल. वस्तुतः हे सगळ्यांनाच साधू शकते.

४.    उंच स्टुलावर चढून उभे राहा. हे विशेषतः चाळीसीपुढच्या स्त्रियांना जड जाते. संतुलन, समन्वय आणि सावधानता ह्यांच्यायोगेच हे साधले जाऊ शकते. शरीरास मुळातच प्राप्त झालेल्या ह्या शक्ती नाहीशा होऊ देऊ नका. त्यांचा अभ्यास करा. स्वाध्याय करा. सवयीने त्यांना शाश्वत करा.

५.    दोरीवरच्या उड्या मारता येणे हे स्वस्थतेच्या एका वांछनीय स्तराचे द्योतक आहे. आबालवृद्ध सगळ्यांनीच त्याचा जमेल तसा सराव ठेवावा. किमान आठवून तर बघा, आपण अखेरच्या दोरीवरच्या उड्या कधी मारल्या होत्या ते!

मला जेव्हा हृदयविकाराने गाठले तेव्हा पुनर्वसनाकरता, मी योगवर्गाला जाऊ लागलो. प्रार्थनेदरम्यान डोळे मिटून घेऊन, पावलांचे अंगठे जुळवून ताठ उभे राहणे किती कठीण आहे ते मला तेव्हा कळले. सवय नसेल तर तोल जातो. हळूहळू सवयीने मला ते साधले. समोर छातीशी हात जोडून आपण नमस्कार करतो तसा पाठीशी हात जुळवून नमस्कार केल्यास हातांच्या मोठ्या स्नायुंना कार्यरत राखण्यास मदत होते, हेही मला तेव्हाच कळले. टाचांवर चालणे, पौच्यांवर चालणे, पर्वतासन, उभे राहून समोर हात जमिनीला समांतर धरून पाय ताठ ठेवत कमरेत वाकवत हातास टेकवणे इत्यादी लवचिकतेसाठीचे व्यायाम मी तिथे शिकलो.

बैठ्या जीवनशैलीमुळे आखडलेल्या स्नायूंना मोकळे करण्यासाठी / कार्यरत राखण्यासाठी लवचिकतेसाठीचे व्यायाम दिवसातून १०-२० मिनिटे तरी करणे आवश्यक असते. बैठी आसने (खुर्चीवर, दिवाणावर, पलंगावर) घालून तासंतास बसणार्‍यांनी, वारंवार आसन मोडून थोडेसे चालून घ्यावे. एकाच स्थितीत अवघडून राहणे टाळावे. कमी करता येईल तेवढे कमी करावे. शरीराचे किमान मोठे स्नायू (हात, पाय वगैरे) दिवसातून एकदा तरी त्यांच्या संपूर्ण क्षमतेने ताणले जायला हवे असतात. तरच ते शाबूत राहतात. माणसाला पूर्वी शेपूट होती. ती न वापरल्याने नष्ट झाली असे म्हणतात. तेव्हा जे अवयव वापरात राहत नाहीत ते नष्ट होण्याची भीती असतेच. 'वापरा अथवा गमवा' (यूज इट ऑर लूज इट).

श्वसनशक्ती वाढविण्यासाठी १० मिनिटे तरी प्राणायाम करायलाच हवा. कपालभाती, उदरश्वसन आणि अनुलोमविलोम यांचा उपयोग सर्वाधिक होतो. खरे तर श्वसन कायमच चालू असते. पण आपण फारच थोड्या श्वसनशक्तीचा उपयोग करत असतो. तेव्हा नेहमीच दीर्घश्वसन करावे. संथ श्वसन करावे. योगासने आणि प्राणायाम यांना मिळून 'योगसाधना' असेही म्हणतात. त्याचा उपयोग आरोग्यसाधनेत अपार आहे.

शारीरिक ताणांना मोकळे करण्यासाठी शिथिलीकरण जरूर असते. आपण दिवसातला बराचसा काळ कशाच्या तरी प्रतीक्षेत, अवघडत बसून, उभे राहून, वा थांबून घालवत असतो. ह्या काळात आपण निरनिराळे शारीरिक तणाव गोळा करत असतो. सुखासन, शवासन ही आसने दररोज करावीतच. एरव्हीही हातपाय ताणणे, फिरविणे, त्यातील ताण मोकळे करणे, हे करतच राहावे. त्यामुळे ते ताण वेळीच निरस्त होऊ शकतात.

आपल्यासोबत कायमच मानसिक तणाव असतात. न सुटणारे प्रश्न, न आवडणारी माणसे, गोंधळ, गडबड, प्रदूषण, ह्यांचे तणाव एकापाठोपाठ एक आपल्यावर आक्रमण करत असतात. शरीराचा व मनाचाही प्रतिसाद 'लढा वा पळा' (फाईट ऑर फ्लाईट) स्वरूपाचा असतो. म्हणजे झेपत असेल त्याच्याशी लढा आणि झेपत नसेल त्यापासून पळ काढा. मात्र सार्‍याच तणावांनी एकदम हल्ला बोलताच, शरीर वा मन प्रत्येक बाबतीत लढायचे वा पळायचे ह्याचा निर्णय करण्याआधीच, ती समस्या येऊन ठेपते आणि मग आपण तिचा सामना करू शकत नाही. तेव्हा एका वेळी एकच समस्या हाताळणे आणि 'लढा वा पळा' चा निर्णय त्वरित घेणे, ह्यामुळे तणावांचे व्यवस्थापन सोपे होते.

मानवी शरीराच्या सापळ्यात होणार्‍या निरंतर विकासाचे प्रतीक म्हणजे वाढती उंची. हल्ली बरीच मुले सामान्य मानवी उंचीपेक्षा खूप अधिक उंच वाढतात. हे खरे तर मानवी शरीराच्या उन्नतीचेच लक्षण आहे. मात्र वर्तमान जगात त्यांना अपार अडथळ्यांचा सामना करावा लागतो. गादीत पाय दुमडून झोपावे लागते. दारांतून जातांना मान वाकवायची सवय लावून घ्यावी लागते. बसमधे बसणे दुरापास्तच असते, कारण दोन बैठकींमधले अंतर त्यांच्याकरता अभिकल्पितच नसते. लोकलमध्ये हाती धरायच्या कड्यांचा मार खातच समोर सरकता येते. सगळ्यात अवघड म्हणजे मांडी घालून बसणे. ह्यांनी अडीच-तीन फुटांची मांडी घातली की, शेजारी फारशी मंडळी मावतच नाहीत. मग अशा मुलांना अंग चोरून बसण्याची, पाय गुडघ्यात मुडपण्याची सवय लावून घ्यावी लागते. अर्थातच ह्यामुळे त्यांच्या स्वाभाविक स्वायत्ततेचा र्‍हास होणे अटळ होते. त्यांच्या आकारास अनुरूप घरे, बस, गाड्या, खुर्च्या, टेबले, पलंग होतील तो सुदिन! मात्र स्वतःकरता हव्या तशा सोयींची निर्मिती करणेही त्यांच्या हाती नसते, हा खरोखरीच दैवदुर्विलास म्हणावा लागेल. म्हणूनच, किमान आपल्या शरीरानुकूल सुखसोयींची संकल्पना करणेच आपल्या हिताचे आहे, हे सर्व उंच मुलांना, माणसांना उमगेल, तर ह्या लेखाचे सार्थक झाले असे होईल.

जन्ममृत्यू अटळ सत्य हे, नियम हा निसर्गाचा । 
सुखदुःख रंग जीवनाचे, मार्ग धरा कर्माचा ॥ 

जन्म माणसाहाती नसतो. मृत्यूही त्याचे हाती नसतो. दरम्यानचे जीवन मात्र त्याचे कर्मानेच फुलत जात असते. त्याच्या कर्मामुळेच त्याच्या जीवनात सुखदुःखाचे रंग भरत जातात. जन्मापासून तर मृत्यूपर्यंत, मनुष्याला जर स्वावलंबी राहायचे असेल, तर निसर्गदत्त शारीरिक स्वायत्ततेस प्राणपणाने जपलेच पाहिजे. जगातील मानवेतर कुठलाच प्राणी प्रामुख्याने परावलंबी होत नाही. होऊच शकत नाही. त्याची उपजीविकाच त्याला आपल्या पायावर उभी ठेवते. आपल्याच पंखांवर उडत ठेवते. आपल्याच कल्ल्यांनी तरते ठेवते. त्याचे परिजन, आप्त-स्वकीय, मित्र-बांधव त्याचे अनावश्यक लाड करून त्याला परावलंबी होऊ देत नाहीत. पाखरू, न उडत्या पिल्लांना दूरवरून आणून घास जरूर भरवेल, पण पंख-तुटक्या सहकार्‍यास अन्न भरवत नाही. परावलंबी होऊ देत नाही.

चला तर मग, आपण आपल्या निसर्गदत्त शारीरिक स्वायत्ततेची कदर करू या. तिचा सांभाळ करू या. तिचे उन्नयन करू या, आणि आपल्याच स्वस्थतेला, स्वायत्ततेच्या आकाशात उंच विहरत ठेवू या! रोज लवचिकतेकरताचे व्यायाम करू या. शिथिलतेकरता योगासने करू या. सशक्त श्वसनशक्तीकरता प्राणायाम करू या. प्रत्येक बाबतीत लढायचे वा पळायचे ह्याचा निर्णय ताबडतोब करू या. शरीरास धार्जिण्या सुख-सवलती निर्माण करू या. केवळ एवढेच धोरण मनाशी जपल्यास, शरीर सतेज होईल, चेहरा कांतीमान होईल, हालचाली चपळ होतील आणि आपण आपले आपल्यालाच आवडू लागू!!

पूर्वप्रसिद्धीः शारीरिक स्वायत्तता, ठाण्यातील विद्याप्रसारक मंडळाच्या ’दिशा’ मासिकाचा २०१५ सालच्या जुलैचा अंक.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: