प्रार्थना

न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं नापुनर्भवं । कामये दुःखतप्तानां‌ प्राणिनां आर्तिनाशनम्‌ ॥

न राज्य चाहूँ, न स्वर्ग चाहूँ और न चाहूँ मोक्ष, मैं तो चाहूँ, दुःखियों की पीडा होवै सभी खतम ।

नको राज्य, नको स्वर्ग, नको मोक्षही मला, दुःखितांच्या नष्ट व्हाव्या, आर्ती सार्‍या आजला.

I desire neither kingdom nor heaven nor liberation. I desire end of miseries for all the life on the earth.

२०२०/०६/०२

मुकूटी विषाणू

मुकूटी विषाणू
लेखकः नरेंद्र गोळे २०२००५१५

फार दिवस झाले नाहीत त्याला. एक आटपाट नगर होते. डोंबिवली त्याचे नाव. मुंबईचे उपनगर असले तरी मुंबईची सांस्कृतिक राजधानी म्हणूनही विख्यात होते. लाखो मध्यमवर्गीयांचे निवासस्थान होते. स्थलकालसुसंगत सर्वसुविधांनी युक्त होत्साते तेथील नागरिक, संपन्न जीवन जगत होते. आनंद साजरा करायला त्यांना निमित्तेच काय ती लागत असत. साजरा करण्याचे सर्व उपाय त्यांना उपलब्धही होते आणि अवगतही. अशात मग नववर्षाचा उत्साह तो काय वर्णावा! हिंदू नववर्ष साजरे करण्यासाठी कधीकाळी डोंबिवलीनेच तर पुढाकार घेऊन शोभायात्रा सुरू केलेली होती. दरसाल मोठ्या उत्साहाने, आनंदाने आणि एकच गर्दी उडवून देऊन गुढीपाडवा साजरा केला जात असे. यंदा इंग्रजी नववर्षाचा सण जगभर साजरा झाला. त्यावेळी, गुढीपाडवाही साजरा होऊ नये असे काहीच घडलेले नव्हते. सालाबादाप्रमाणे सर्व तयारी सुरू झालेलीच होती.

मात्र गुढीपाडवा आला आणि गेला. साजरा काही झालाच नाही. कुणी विरोध केला होता का? तर नाही. मग काय असे घडून आले की, डोंबिवलीत गुढीपाडवा निमूटपणे आला आणि गेला. इंग्रजी नववर्षाचा सण जगभर साजरा झाला. त्यावेळीच जगभर एका नवीन पाहुण्याची चर्चा होत होती. इथे मात्र त्यावेळी त्याची गंधवार्ताही नव्हती म्हटले तर फारसे वावगे होणार नाही. त्याचेच निमित्त झाले आणि सोन्यासारख्या गुढीपाडव्याच्या सणाची माती माती झाली. त्याचीच ही गोष्ट आहे. त्या मनुष्यवाहन मुकूटी विषाणूच्या आक्रमणाची. त्यापासूनच्या निवारणाची आणि भावी काळात त्यापासून संसर्गहीनता सिद्ध करण्यासाठी झालेल्या घनघोर संग्रामाची, ही चक्षुर्वैसत्यम्‌ हकीकत आहे.

तो पाहुणा होता चीनमधील वूहान शहरात जन्मलेला नवाविष्कार – मुकूटी विषाणू. सूक्ष्मदर्शकाखाली हा विषाणू मुकूटधारी चेंडूसारखा दिसे. कुणी म्हणत की, तो निसर्गातच स्वाभाविकपणे जन्म पावला. तर कुणी म्हणत की, चीनने विषाणूयुद्धातील नवे अस्त्र म्हणून कृत्रिमरीत्या जन्माला घातला. देवादिक आपापली वाहने घेऊन सज्ज असतात. दरसाल संक्रांत आपल्या नवनव्या वाहनांवर बसून येते. तसा हा विषाणू मात्र ’मनुष्यवाहन’ म्हणूनच ख्यातनाम झाला. त्याची वाहतूक मानवी शरीरच करू शकते आणि मानवी शरीरातच त्याचे अनियंत्रित बेसुमार प्रजननही होऊ शकते. मात्र आधुनिक युगाच्या माणसांतील अमर्यादित परस्परसंपर्कांमुळे, विषाणूने महिन्याभरातच सर्व जग व्यापून टाकले. अगदी जवळून, दक्षिणा ओली करून देतात तसाओला करून दिल्याखेरीज, जो दुसर्‍या मनुष्याप्रत पोहोचूच शकत नाही, त्या विषाणूचा हा अनियंत्रित प्रसार पाहता, मग जगभरच्या लोकांना लक्षात आले की, परस्परसंपर्क मर्यादित ठेवल्याशिवाय, विषाणूचा प्रसार थांबणार नाही. म्हणून मग आली टाळेबंदी!

पाहुणा कधी कधी हवासाही असतो. क्वचित कधी नकोसाही असतो. मात्र ह्या पाहुण्याला तमाम सर्वच देशांनी ताबडतोब नकोसा ठरवला. मग हा पाहुणा नकोसा का ठरवला गेला आणि कसा? तर हा पाहुणा आहे अत्यंत संपर्कप्रिय. मानवी शरीरे परस्परांच्या संपर्कात येण्याचाच अवकाश की, तो एका शरीरावरून दुसर्‍यावर निमिषार्धात झेप घेतो. नाका तोंडातून प्रवेश करतो. फुफ्फुसांत जाऊन बसतो आणि आपल्या अनियंत्रित प्रजननास सुरूवात करतो. त्वरित शेंबडाचा कारखानाच सुरू होतो. फुफ्फुसे, श्वसनमार्ग, नाक, छाती झपाट्याने अवरुद्ध होतात. श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. ज्यांची श्वसनशक्ती आधीच टेकीला आलेली असते, अशी माणसे मग ह्या त्रासाचा प्रतिकारही करू शकत नाहीत. श्वसन बंद पडून किंवा हृदय बंद होऊन ते प्राणही गमावू शकतात. अशा प्रसंगी त्यांना जर कृत्रिम श्वसन मिळाले, प्रतिकारास कार्यान्वित करणारे औषधोपचार मिळाले, तर यथावकाश आठ दहा दिवसात शरीरातील प्रतिकारप्रणाली ह्या विषाणूचा सशक्तपणे सामना करू लागते आणि काही दिवसातच त्यावर विजयही मिळवते. मात्र तशी संधी देईल तर तो मुकूटी विषाणू कसला? ज्या गतीने त्याचा प्रसार होतो आहे ती अभूतपूर्व आहे. कारण आजमितीस मानवाचाच परस्परसंपर्क अभूतपूर्व आहे. ह्या गतीने नकोशा पाहुण्याचे आक्रमण झाले, तर काही लक्षात येण्यापूर्वीच लाखोंच्या संख्येने लोक प्राणांस मुकतील अशी भीती निर्माण झाली.

आक्रमण तर थोपवायचे होते. देशोदेशीच्या सरकारांना काय करावे सुचेना झाले. कृत्रिम श्वसन आणि प्रतिकारास कार्यान्वित करणारे औषधोपचार देण्याची संधी तर मिळायला हवी ना! अर्थात ती मिळाली तरी ह्या अज्ञात साथीच्या रोगाची प्रतिबंधात्मक लस मिळणे तर दूरच राहिले, त्यावरची औषधे तरी कुठे माहीत होती. ती औषधे, लस ह्यांचा युद्धपातळीवर शोध सुरू झाला.

ह्या शोधास पुरेसा वेळ मिळावा म्हणून मग एक नवीच शक्कल निघाली. ह्या ’मनुष्यवाहन’ विषाणूस वाहनच मिळू द्यायचे नाही. मग तो एका शरीरातून दुसर्‍यावर जाईलच कसा? संक्रमण होणारच नाही. प्रजनन होणार नाही. विषाणू आहे तिथेच, ती ती शरीरे त्यास विरोध करून नाहीसा करतील. मग आपण पुन्हा सगळे व्यवहार सुरू करू या! त्याकरता आता मात्र परस्पर संपर्क टाळू या. अगदी निग्रहाने. असा देशोदेशी निर्णय झाला. परिणामी पहिल्याप्रथम विमानसेवा बंद झाल्या. मग रेल्वे बंद झाली. अगदी स्थानिक वाहनांनाही मनाई केली गेली. तेही करून विषाणूला मिळायची ती संपर्कसंधी मिळतेच आहे, म्हटल्यावर टाळेबंदी आली. संचारबंदी झाली. सामाजिक अंतरे राखण्याचे उपदेश सारखे दोन्ही कानांत आदळू लागले.

टाळेबंदी आणि संचारबंदीमुळे हातावर पोटे असलेल्या लोकांची उपजीविकाच हरवली. मुकूटी विषाणूच्या हल्ल्यानेही हैराण होऊ नयेत, असे धडधाकट लोक, उपासमारीने मरण्याची शक्यता निर्माण झाली. प्रत्यक्षात मरूही लागले. रोग बरा की औषध बरे असा प्रसंग आला! उपाशी लोकांना रोगच बरा वाटू लागला. निदान खाऊन पिऊन सुखाने तरी मरता येईल!

तसाही मुकूटी विषाणू महाभयंकर नसल्याचे हळूहळू लक्षात येऊ लागले. कृत्रिम श्वसनाचा आधार न लागता आणि कोणतेही औषध न घेताही, धडधाकट लोक मुकूटी विषाणूच्या संसर्गातून सहिसलामत बाहेर पडू लागले. ८३% बाधितांना तर फारशी गंभीर लक्षणेही जाणवत नव्हती. मग देशविदेशातील अत्यंत हुशार नेत्यांनी टाळेबंदी आणि संचारबंदीचा मार्ग का बरे पत्करला असावा! तर सुरूवातीस निर्माण झालेली भीती, तोवर अज्ञात असलेल्या मुकूटी-विषाणू-पर्यवसायी रोगाच्या परिणामांचा धाक आणि अनपेक्षित प्रथम हल्ल्यास जगभरात बळी पडत असलेल्या लाखो लोकांची प्राणहानीच ह्या सार्‍यास कारण ठरली होती.

१९७५ साली इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीचे वर्णन विनोबांनी ’अनुशासन पर्व’ असे केले. त्याकाळी सर्वत्र आणीबाणीचे तोटे आणि अत्याचारच चर्चिले जात असतांना, मग लोकांना आणीबाणीचे लाभही जाणवू लागले. कानू घोष ह्यांनी तर एक गाणेच तयार केले. ’हम होंगे कामयाब, एक दिन’. अगदी तसेच, मुकूटी विषाणूकरताच्या टाळेबंदीचे त्रास सर्वत्र वर्णन केले जात असतांनाच, टाळेबंदीचे लाभही नजरेत भरू लागले होते. वाहने जागीच जेर झाल्याने, भूमीगत तेलाची (पेट्रोलियमची) गरजच जवळपास शून्यावर आली. त्यामुळे तेलाच्या समृद्धीवर सम्राट झालेले देश चिंताक्रांत झाले. तेलाच्या किंमती झपाट्याने शून्याखाली जाऊ लागल्या. भांडवली बाजार कोसळू लागले. सार्‍याच अर्थव्यवस्थांतून पार उलथापालथ अनुभवास येऊ लागली. संचारबंदीमुळे प्रदूषण घटले. पंजाब हरयाणातून हिमालयाची शिखरे स्पष्ट दिसू लागली. नदी, तलाव, वन, उपवनांतून मानवेतर प्राण्यांचा वावर प्रच्छन्नपणे होऊ लागला. शहरी लोकांना सत्वर अन्न (फास्ट फूड) आणि जिव्हालौल्यरंजक पदार्थ (जंक फूड) सेवन केल्यावाचून सहजच जीवन जगता येत असल्याचा अमूल्य शोध लागला. परिधाने (कपडे), अलंकरणे (ऍक्सेसरीज), लोभस दर्शनी वस्तू (शो पीसेस), उपाहारगृहांतील मेजवान्या (हॉटेल पार्टीज), समारंभ, प्रदर्शने, व्याख्याने, निरनिराळ्या स्पर्धा, वेगवेगळ्या जत्रा, धार्मिक एकत्रिकरणे, निवडणुका, राजकीय पक्षांचे कार्यक्रम, सभा व बैठका; जीवनास अत्यावश्यक सदरात मोडत नसल्याचा महान साक्षात्कार झाला.

भारत आता जगाकडे मदतीची याचना करणारा असहाय्य देश राहिला नव्हता. तो जगातील छोट्या, गरजवंत देशांना महामारीच्या ह्या संकटात, मदत करू लागला. जगभरात निर्माण झालेल्या औषधटंचाईला समर्थपणे तोंड देऊ लागला. जगास औषधे पुरवू लागला. अमेरिकेसही भारताकडे औषधे मागावी लागली. भारताने चीनमधून आयात केलेले चाचणीसंच (टेस्ट कीटस) खोटे ठरले. त्यामुळे ते परत करण्यात आले. यावरून ह्या वैश्विक संकटाचे पितृत्व चीनकडेच जात असल्याचे सिद्ध झाले. अमेरिकेच्या अध्यक्षांनी, जगभरात महामारी पसरवल्याचा चीनवर आरोप केला.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील लोक तर फारच खूश झाले. सगळ्यांना घरूनच काम (वर्क फ्रॉम होम – उर्फ डब्ल्यू.एफ.एच.) करायला सवलत मिळाली. त्यांच्या मालकांना आपले सेवक; रात्रंदिन, सुटी, सणासुदीविनाच काम करायला सहज तयार होत असल्याचा शोध लागला. कार्यालयांतून होणार्‍या त्या जागेचे भाडे, वाहनव्यवस्था, वातानुकूलन, संगणकसंच, कार्यालयीन साहाय्यक, रक्षक, सेवक, इत्यादींना सांभाळणार्‍या पैशाची आवश्यकताच नाहीशी झाली. उत्पादनखर्च भलताच घटला. सेवकांचे कुटुंबीय ह्याकरता खुश झाले की, आपले माणूस सदैव नजरेसमोर मिळू लागले. अडीअडचणीस हाताशी सापडू लागले. ही उभयपक्षी सोयीची (विन-विन सिच्युएशन) परिस्थिती होती. त्यामुळे मुकूटी विषाणूविरुद्धचे युद्ध संपल्यावर अशाच कार्यप्रणालीस कायमस्वरूपी का अनुसरू नये ह्यावर गांभीर्याने विचार सुरू झाला.

अनेक विकसित देशांत टाळेबंदीपश्चात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा अनुभवास आला. मलनिस्सारकागद (टिशू पेपर) आणि निर्जंतुकीकारक (सॅनिटायझर) रसायनांकरता वादावाद्या, हातापायी आणि मारामार्‍या घडून आल्या. त्यांची जालसंजीवित चलचित्रणे जगभर झाली. त्यामुळे आपल्या देशात टाळेबंदी झाल्यावर असेच होईल की काय? अशी धास्ती निर्माण झाली. मात्र आपल्या देशात असले काहीच झाले नाही. सर्व जीवनावश्यक पदार्थ तुलनेने सहजच मिळत राहिले. हातावर पोट असलेल्या आणि आता रोजगार गमावलेल्या सर्व नागरिकांना शिधावाटप करण्यात कोणत्याही राज्याने कसूर केला नाही. त्यामुळे त्यांच्यात शासकीय व्यवस्थेप्रती काहीसा विश्वास निर्माण झाला. सशक्त नेतृत्वाने परिस्थिती अपूर्व कौशल्याने हाताळली. भारत जगद्गुरू पदास का पात्र आहे ह्याचा जणू काय दावाच दाखल झाला.

टाळेबंदीचे दुसरे सत्र ३ मे रोजी संपत असतांना ’टाळेबंदी बरी की साथीचा रोगच परवडला’ ह्यावर आता जालसंजीवित परिसंवाद झडत होते. टाळेबंदी हा मुकूटी विषाणूच्या महामारीवरील खराखुरा उपाय आहे का? असाही प्रश्न विचारला जाऊ लागला. तो तसा नाहीच. केवळ अनपेक्षित आक्रमणातून सावध होण्याकरता मिळवलेला धर्मवाटेचा कालावधी टाळेबंदीने प्राप्त करून घेता येतो एवढीच टाळेबंदीची महत्ता आता लक्षात आलेली आहे. त्याशिवाय सामुहिक संसर्गहीनता (हर्ड इम्युनिटी) विकसित होण्यानेच महामारीचा खराखुरा सामना होऊ शकणार आहे, हेही आता निष्पन्न झालेले आहेच. त्यामुळे टाळेबंदी सुसूत्रतेने, टप्प्याटप्प्याने आणि क्रमवार उठवल्यास सामुहिक संसर्गहीनता साधणे शक्य होईल असे आता दिसू लागले.

दरम्यान मुकूटी विषाणू विरुद्धच्या युद्धाचे वैद्यकीय पैलू जगासमोर येऊ लागले[1]. एकतर मुकूटी विषाणू म्हणजे मुळात जिवाणूच नसून केवळ एक प्रथिन असल्याची माहिती कळली. त्याशिवाय हेही कळले की, मुकूटी विषाणूची संसर्गकारकता, आम्लतांक[2] ६.० वर सर्वाधिक असल्याचे दिसून येते. १४ दिवसांहून अधिक काळ, २२ अंश सेल्शसहून अधिक तापमानावर उबवले असता ही संसर्गकारकता संपूर्णतः नाहीशी होते. मात्र ४ अंश सेल्शसवर उबवले असता, ती जवळपास जशीच्या तशीच राहते. मानवी शरीर आपले तापमान ३७ अंश सेल्शसवर कायम राखत असते. म्हणून मग विलगीकरणाचा काळ १४ दिवसांचा ठरला. ह्याचा अर्थ असा की, मुकूटी विषाणूचे वाहन झालेल्या शरीरात हा विषाणू १४ दिवस राहिला असता त्याची संसर्गकारकता प्रायः नष्ट होते. म्हणून मग संशयित संसर्गबाधितांना १४ दिवस विलग करण्याचा उपाय राबवला जाऊ लागला. दरम्यान त्यांना स्वतःसही संसर्ग होऊ नये, झाल्यास त्याचा उपसर्ग वाढू नये, वाढल्यास त्याचा श्वसनास अडथळा होऊ नये, रक्तात गुठळ्या होऊ नयेत इत्यादींची काळजी घेणे गरजेचे झाले. पुढे असेही दिसून आले की, संशयित बाधितांपैकी ८३% लोकांना कोणताही त्रास न होता ते सुखेनैव विलगीकरणातून सहिसलामत बाहेर पडतात.

सुरूवातीस (खरे तर अजूनही म्हणजे १५ मे २०२० पर्यंत तरी) मुकूटी विषाणूच्या उपद्रवावर औषधच नव्हते. विषाणूविरोधी औषधे, क-जीवनसत्त्वे इत्यादींचा उपयोग निवारणार्थ केला जाई. अनुभवाने हायड्रोक्सीक्लोरोक्वीन ह्या मलेरीयावरील औषाधाचा उपयोग होतांना दिसू लागला. सुदैवाने ह्या औषधाचा जगातील सर्वात मोठा उत्पादक भारत देशच आहे. ही आपल्या सगळ्यांकरता अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. मग आपण जगभरातील अनेक देशांना हे औषध पुरवूही लागलो. दरम्यान आयुष मंत्रालयाने समचिकित्सा (होमिओपॅथी) आणि आयुर्वेदीक प्रतिबंधक औषधांच्या चाचणीस हिरवा कंदील दाखवला. लवकरच समचिकित्सा पद्धतीच्या वैद्यांनी ’आर्सेनिकम अल्बम-३०’ ह्या औषधाच्या प्रत्येकी दोन गोळ्या तीन दिवस घेतल्यास, मुकूटी विषाणूचा उत्तम प्रतिबंध केला जाऊ शकतो असा दावाही केला. केरळात ह्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोगही केला गेला. तेथील दररोजच्या नव्या रुग्णसंख्येत घटही नोंदवली गेली. इतरत्रही ह्या औषधाचा उपयोग सुरू झाला. आयुर्वेदिक वैद्यांनीही निरनिराळ्या प्रतिबंधक काढ्यांच्या निर्माण व वापराचे विधी, आयुष मंत्रालयाच्या विद्यमाने प्रसृत केले.

लसीकरण विकसनाची अवस्था[3]: लस म्हणजे निरोगी व्यक्तींनी भविष्यात आपल्याला (मुकूटी विषाणूचा) उपद्रव होऊ नये म्हणून एकदाच टोचून घ्यावयाचे, पोलिओ लसीसारखे औषध. राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था पुणे ह्यांनी विलग केलेल्या विषाणूप्रतीवर अशा लसीचे भारतीय संशोधन आधारलेले आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आय.सी.एम.आर.) ही प्रत हाती घेतलेली आहे. भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने ह्या प्रतीवरील लसीचे विकसन, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहयोगाने सुरू केलेले आहे. अमेरिकेतील ’लसी’च्या विकसनात स्वयंसेवकांनी लसीही टोचून घेतल्या आहेत. त्या संशोधनास सप्टेंबर अखेरीस यश लाभेल ह्या विश्वासावर भारतात, जगातील सर्वात मोठी लसनिर्माती असलेल्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ह्या संभाव्य लसीच्या ६ कोटी मात्रा निर्माण करण्याचे काम सुरूही केले आहे. ऑक्टोंबरपर्यंत ही लस प्रत्यक्षात टोचता येऊ शकेल अशी स्थिती आहे.

१३-०५-२०२० रोजी रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रास संबोधित केले. त्यांनी हे सांगितले की, टाळेबंदीस सुरूवात झाली तेव्हा देशात एकही व्यक्तिगत संरक्षक उपस्करसंच (पी.पी.ई.-पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट) उपलब्ध नव्हता. एन-९५ मुखावरणाची (मास्कची) निर्मितीही नगण्यच होती. आज भारत दररोज दोन दोन लाख व्यक्तिगत संरक्षक उपस्करसंच आणि मुखावरणांची निर्मिती करू शकत आहे. करत आहे. त्यांनी देशास ’आत्मनिर्भर’ होण्याचे आवाहन केले. आशा आहे की देशही त्यांचा मान राखेल. त्यांनी १७ मे २०२० पश्चातच्या टाळेबंदी-४ चे सुतोवाचही केले. मात्र चाचणीक्षमतेत जसजशी वाढ होत जाईल, उपचार क्षमतेत जसजशी वाढ होत जाईल, प्रतिबंधक औषधे आणि लसीही जसजशा उपलब्ध होत जातील तसतशी टाळेबंदी हटविली जाईल हेही त्यांनी स्पष्ट केले.

मुकूटी विषाणूच्या अवचित हल्ल्यातून आपण आज सावरलो आहोत. विषाणूसोबतच्या युद्धास आता कुठे सुरूवात झालेली आहे. विषाणू हरेल. भारत जिंकेल!

भविष्यात मग पुढे कधीतरी ’मुकूटी विषाणू’ वरच्या विजयाचा इतिहास लिहिला जाईल. आपण भारतीय, ही लढाई दिमाखात जिंकलेले असू. जगातील आपल्या इतरही सर्व बांधवांची, आपण ’वसुधैव कुटुंबकम’ ह्या आपल्या धोरणानुसार काळजी घेऊ. सारेच सुखाने राहू. सारेच निरामय होऊ. सारेच खुश राहू. कुणीही दुःखी राहणार नाही! तथास्तु ।

मग डोंबिवलीतही पूर्वीसारखाच उत्साह राहील. गुढीपाडव्यास नववर्षाची शोभायात्रा निघेल. भरल्या घरात हिरमुसून बसावे लागणार नाही. मुकूटी विषाणूसाठीच्या टाळेबंदीच्या दास्यातून आपली मुक्तता झालेली असेल. टाळेबंदीत लोकप्रिय होऊ लागलेली लोकभावनाही पुढे, पुढील कवितेतील आशयानुरूप सांगितली जाईल.

पौरुषास अटक
(वृत्त- दिंडी, मात्रा-९,१०)

कवीः नरेंद्र गोळे २०२००५०५

सूर्य उदयाला येत रोज तोची
तेच रस्तेही वस्ती ती जुनीची ।
तीच लोकेही, आन्हिके तशीची
तरी आता हे जग न होय तेची ॥ धृ ॥

एक आला मुकुटातला विषाणू[4]
स्वार होऊनी मनुजतनू सुकाणू[5] ।
वर प्रथीने आतून गर्भकाम्ले[6]
निर्जिवाला लेवून जीव[7] आले ॥ १ ॥

करी हल्ला श्वासात तो शिरून
वंश वाढवतो मिळे ते चरून ।
जणू वणवा, तो आक्रमे शरीरा
बंध श्वासाला भक्ष्य मात्र त्याला ॥ २ ॥

देह थकला तर विजय होय त्याचा
तोच हरला तर विजय शरीराचा ।
अनिश्चित राहे शक्यता जयाची
ह्याच धाकाने विश्व बंद राही ॥ ३ ॥

विश्वबंदीने गांजले गरीबा
जीव ’तो’ घेवो, बंदी घेउ दे वा ।
गरीबाला का, नको जीव झाला
बरा ’तो’ वा ती ’बंदी’ बरी बोला ॥ ४ ॥

पुरे आता ही बंदी, लढू द्या ना
विषाणूशी त्या, युद्ध करू द्या ना ।
जगो तो वा, तो मरू दे सुखाने
जगू द्या वा, मज मरू द्या मनाने ॥ ५ ॥

कवीः नरेंद्र गोळे २०२००५०५[1]  Effect of pH and temperature on the infectivity of human coronavirus 229E.
Lamarre A, Talbot PJ.
[2] आम्लतांकः १ ते १४ अंकांची आम्लता (पी.एच.) मापन पट्टी असते. तीवर ६ इतकी आम्लता असेल तेव्हा मुकूटी विषाणू सर्वाधिक संसर्ग घडवू शकत असतात.
[4] कोरोना व्हायरस म्हणजे मुकूट घातलेला गोल आकार असलेला विषाणू.
[5] मुकूटी विषाणू केवळ मानवी शरीरातच जिवंत राहू शकतो. त्यामुळे तो त्यावर आरूढ होऊन इतर देहांकडे जाण्याची संधी शोधत असतो.
[6] मुकूटी विषाणूचे वरचे आवरण प्रथिनांचे असते. पूर्णतः निर्जीव. मात्र आतमध्ये शर्करा गर्भकाम्ल आणि अपान शर्करा गर्भकाम्ल (आर.एन.ए.-रायबो न्युक्लिक ऍसिड आणि डी.एन.ए.-डि-ऑक्सी रायबो न्युक्लिक ऍसिड) रेणूंच्या मालिका भरलेल्या असतात. प्रथिनांनी मानवी पेशींची आवरणे उघडली की, ह्या मालिका सजीव होऊन आपले पुनरुत्पादन झपाट्याने सुरू करतात. त्याकरता आजूबाजूची पेशीद्रव्ये खाऊन टाकत असतात.
[7] शर्करा गर्भकाम्ल आणि अपान शर्करा गर्भकाम्ल (आर.एन.ए.-रायबो न्युक्लिक ऍसिड आणि डी.एन.ए.-डि-ऑक्सी रायबो न्युक्लिक ऍसिड) रेणूंच्या ह्या मालिका, प्रथिनांनी मानवी पेशींची आवरणे उघडली की, सजीव होऊन आपले पुनरुत्पादन झपाट्याने सुरू करतात. त्याकरता आजूबाजूची पेशीद्रव्ये खाऊन टाकत असतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: