प्रार्थना

न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं नापुनर्भवं । कामये दुःखतप्तानां‌ प्राणिनां आर्तिनाशनम्‌ ॥

न राज्य चाहूँ, न स्वर्ग चाहूँ और न चाहूँ मोक्ष, मैं तो चाहूँ, दुःखियों की पीडा होवै सभी खतम ।

नको राज्य, नको स्वर्ग, नको मोक्षही मला, दुःखितांच्या नष्ट व्हाव्या, आर्ती सार्‍या आजला.

I desire neither kingdom nor heaven nor liberation. I desire end of miseries for all the life on the earth.

२०१२/०४/०७

डॉ.संजय ओक


आज ७ एप्रिल २०१२. जागतिक आरोग्यदिन. ह्या दिवशी आयुर्विज्ञान आणि सार्वजनिक आरोग्यनिगा ह्यांबाबतच्या आपल्या धोरणांची चर्चा होणे क्रमप्राप्तच आहे. आपली अशी धोरणे कोण निश्चित करते? कोण राबवते? ह्याबाबत आपली माहिती कायमच कमी असते. धोरणे निर्धारित करणारे अपात्र आहेत की राबवणारे, त्यांचे प्रभाव आपल्यापर्यंत पोहोचण्या अगोदरच कोण स्वाहा करत आहेत, ह्याविषयी आपण सावध राहणे गरजेचे आहे. आपल्यांत वाखाणण्यासारखे लोक कोण आहेत ह्याचा सगळ्यांनीच शोध घ्यायला हवा. आपली वैद्यक धोरणे ठरवण्यात सहभागी असणार्‍यांत एक नाव आहे डॉ.संजय ओक, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख शुश्रुषालये), राजा एडवर्ड स्मृती शुश्रुषालय, परळ, ह्यांचे. योगायोगानेच परवा सह्याद्री वाहिनीवर त्यांची मुलाखतही मला पाहता आली. त्यांच्या कार्याबाबत वाचकांस किमान पुरेल अशी माहिती करून द्यावी, ह्याच हेतूने हा लेख लिहिला आहे.

जन्मः २४ नोव्हेंबर १९५९, मुंबई
डॉ.संजय ओक, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख शुश्रुषालये) राजा एडवर्ड स्मृती शुश्रुषालय, परळ (१).

व्यावसायिक वैशिष्ट्यः वैद्यकीय, बाल-शल्यचिकित्सा, शुश्रुषालय प्रशासक बाल-शल्यचिकित्सा, आरोग्य आणि शुश्रुषालय सेवा प्रशासक,
संचालक (वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख शुश्रुषालये), अधिष्ठाता आणि प्राध्यापक बाल-शल्यचिकित्सा (२).

डॉ.ओक हे मुंबई, महाराष्ट्र आणि भारतीय वैद्यकशिक्षण व वैद्यक व्यवसायातील एक अग्रगण्य व्यक्ती आहेत. ते उत्तम सर्जन, शल्यचिकित्सक, प्रशासक आणि धोरणात्मक सल्लागार राहिलेले आहेत.

दुःखतप्तांना दिलासा वाटेल असे ते वैद्य आहेत, कामचुकारांना धाक वाटेल असे प्रशासक आहेत आणि शासनकर्त्यांना ज्यांचा शब्द प्रमाण मानावा लागेल अशा वकूबाचे वैद्यक व्यावसायिक आहेत. संवेदनाक्षम मन, प्रगल्भ सामाजिक जाणीवा आणि आयुर्विज्ञानात भारताचेच काय परंतु सार्‍या जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यांच्या रुग्णांत, सहकार्‍यांत, विद्यार्थ्यांत, शासनकर्त्यांत आणि सर्वच समाजात ते लोकप्रिय आहेत. ते उत्तम वक्तेही आहेत.

१९७५ साली शालांत परीक्षेत, ते इंग्रजीत सर्वप्रथम, संस्कृतात द्वितीय, आणि गुणवत्ता यादीत ४९ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली.
                       
१९८३ ते १९८६ दरम्यान त्यांनी वानलेस शुश्रुषालय, मिरज येथे कनिष्ठ, वरिष्ठ आणि मुख्य निवासी पदांवर अनुभव मिळवला. १९८६ मध्ये ते नागरी शुश्रुषालयात मुख्य निवासी पदावर कार्यरत होते. त्यांनी सामान्य शल्यचिकित्सेच्या नाक-कान-घसा, अस्थि आणि बाह्यरूप (cosmetic), तसेच हृदयरोग शल्यचिकित्सेत अनुभव प्राप्त केला. नंतर ऑगस्ट १९८६ मध्ये त्यांनी बाल-शल्यचिकित्सा विषयात एम.सी.एच. पदव्युत्तर पदवीकरता, जी.एस.वैद्यकीय महाविद्यालय, राजा एडवर्ड स्मृती शुश्रुषालय, मुंबई विद्यापीठ येथे नोंदणी केली.

असे म्हणतात की मनुष्य हा कायमच विद्यार्थी असतो. ह्याचे उत्तम उदाहरण डॉ.ओक हे आहेत. १९७५ साली शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यापासून तर २००९ सालापर्यंतच्या उण्यापुर्‍या ३५ वर्षांत, त्यांनी सतत अभ्यास करून प्राप्त केलेल्या तब्बल २० पदव्यांची यादीच आपली खात्री पटवेल. इतका निरंतर विद्याभ्यास, आपल्या व्यावसायिक जबाबदार्‍या सांभाळत ते करत आहेत ही गोष्टच त्यांचा व्यासंग विदीत करते.

विद्यार्थी दशेत असतांनापासून त्यांनी इतकी पारितोषिके मिळवलेली आहेत की त्यांची गणती करणे अवघड आहे. म्हणून इथे डॉ.संजय ओक ह्यांनी प्राप्त केलेली राष्ट्रीय पातळीवरील काही पारितोषिकेच फक्त नमूद करत आहे.

१.       चेतासंस्थात्मक मूत्राशय आणि त्याचे व्यवस्थापन, ह्या जैव-वैद्यकीय संशोधनातील सर्वोत्तम अप्रकाशित कामाकरता डॉ.एस.एस.मिश्रा नॅशनल अकॅडमी अवार्ड, १९९४-९५.
२.      संगणकीय-द्रव-चालिकीय-विश्लेषण पद्धतीने केलेला मूत्रनलिकेच्या अंत्रचालना (३) चा अभ्यास, भारतीय शल्यचिकित्सा नियतकालिकाचे ओ.पी.तनेजा एन्डोवमेंट अवार्ड, नोव्हेंबर १९९७.
३.      डॉ.व्ही.महादेवन-सर्वोत्तम-शोधनिबंध-पारितोषिक, आय.सी.एस.४४-वी वार्षिक परिषद, इंदौर, २४-२७ सप्टेंबर १९९८.
४.     दुहेरी डॉप्लर[१] आणि जलशीर्ष[२], या विषयावरील शोधनिबंधाकरता दिलेले हरि-ओम आश्रम प्रेरित डॉ.एस.रंगाचारी पारितोषिक, ए.एस.आय., डिसेंबर १९९८.
५.     मूत्राशयाकडून मूत्रपिंडाकडे होणार्‍या उलट-मूत्र-प्रवाहाच्या निदानार्थ वापरलेले रंगीत डॉप्लर ध्वनीआलेखन, सर्वोत्तम शोध-व्याख्यान पारितोषिक, आय.ए.पी.एस. (४) ची २४ वी वार्षिक परिषद, कोईंबतूर, ऑक्टोंबर ८-११,१९९८
६.      दुर्बिणीद्वारे केलेल्या शल्यचिकित्सेतील प्रगत प्रशिक्षणा, संदर्भातील कामाकरता बाल-शल्यचिकित्सकांच्या भारतीय संघटनेचे कार्ल-स्टॉर्झ अतिथी सदस्यत्व, २०००.
७.     दुर्बिणीद्वारे केलेली बाल-शल्यचिकित्सा, ह्या वैशिष्ट्याच्या विकसनार्थ बी.सी.रॉय राष्ट्रीय पारितोषिक, २००४.
८.      वैद्यकीय व्यवसायातील उत्कृष्ट कर्तबगारीबद्दल, सामाजिक जाणीवांखातर आणि लेखक म्हणून केलेल्या कामाबद्दल, भवतु-सब्ब-मंगलम्‌ ह्या सरकारमान्य विश्वस्त-संस्थेद्वारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती पारितोषिक, २००५.
९.      वैद्यकीय शिक्षणावर १६ पुस्तके प्रकाशित केल्याखातर आरोग्य ज्ञानेश्वर पारितोषिक, २००५.
१०.   सर्वोत्कृष्ट शल्यचिकित्सा आणि सामाजिक कटिबद्धतेकरता, रक्त-स्वस्तिक-संघटनेतर्फे सुश्रुत पारितोषिक, जानेवारी २००७.

लोकसत्ता दैनिकात लोकप्रिय स्तंभलेखन करत असतांना त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर तज्ञ विचार प्रसृत केलेले आहेत. त्या लेखांचा संग्रह त्यांचे संकेतस्थळावर उपलब्ध आहे (५).


डॉ.संजय ओक ह्यांनी गतिमंद (ऑटिस्ट) मुलांच्या संदर्भात ’एक शोध स्वतःचा’ हे पुस्तकही लिहिले आहे. अशोक चिटणीस यांनी डॉ.संजय ओक ह्यांच्या मुलाखतीवर आधारित एका लेखात (६) त्यांचे ह्याबाबतीतले निवेदन लिहून ठेवलेले आहे. त्यातील एका उतार्‍यात डॉ.ओक म्हणतात, गतिमंद (ऑटिस्ट) मुले म्हणजे बदकांच्या पिल्लांत पोहणारे राजहंस! त्यांचे पंख ओळखता येत नाहीत. आमीरखानने याच गतिमंद मुलांच्या समस्येवर ’तारे जमीनपर’ हा गाजलेला चित्रपट काढला. या चित्रपटाच्या निमित्ताने माझे आमीरखानशी एक गहिरे मैत्रीचे नाते निर्माण झाले.

२३ सप्टेंबर २००६ रोजी त्यांनी भारतातली पहिली, सयामी जुळ्यांना वेगळे करणारी शल्यक्रिया केली होती. साडेसहा तास चाललेल्या त्या शल्यक्रियेने त्या मुली सुट्ट्या झाल्या. आज त्या आपल्या घरी स्वतंत्रपणे वाढत आहेत.

भारतीय वैद्यकशिक्षण आणि आरोग्यनिगा यांबाबत ते म्हणतात, स्वातंत्र्यानंतर सहा दशके उलटल्यावरही प्रत्येक नागरिकाच्या मुलभूत हक्कांत आरोग्यनिगेचा समावेश झालेला नाही हे सांगतांना मला दुःख होते.

प्रशासकास न बोललेल्या शब्दांचा अर्थ समजण्याचे, न टाकलेले सुस्कारे ऐकण्याचे आणि अस्फूट अश्रूंना पुसून टाकण्याचे सामर्थ्य असावे असा त्यांचा प्रशासकीय दृष्टीकोन आहे.

ह्या जागतिक आरोग्यदिनाचे निमित्ताने, आपण डॉ.संजय ओक ह्यांच्या कर्तबगारीवर भरवसा ठेवून, त्यांना आपली धोरणे अधिक लोकाभिमुख करण्याकरता सुयश चिंतू या. तसेच, आपल्या शासनकर्त्यांना, त्यांच्या धोरणविषयक सल्ल्यांना उचित महत्त्व आणि प्राधान्य देण्याची, सुबुद्धी मिळावी अशीही प्रार्थना करू या!

संदर्भवाचनः
१.       http://www.sanjayoak.com/guestbook.htm डॉ.संजय ओक, संचालक (वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख शुश्रुषालये) राजा एडवर्ड स्मृती शुश्रुषालय, परळ यांचे संकेतस्थळ
२.      http://kem.edu/college/director.htm राजा एडवर्ड स्मृती शुश्रुषालय, परळ यांचे संकेतस्थळ
३.      वैद्यकीय शब्दकोश, बेलिअर्स नर्सेस डिक्शनरीच्या विसाव्या आवृत्तीचे डॉ.श्री.वा.जोगळेकर यांनी केलेले मराठी रूपांतर, ओरिएंट लाँगमन, १९९६, पुनर्मुद्रण २००६, किंमत रू.२५०/- फक्त
४.     http://www.iapsonline.org/ बाल-शल्यचिकित्सकांच्या भारतीय संघटनेचे संकेतस्थळ
५.     http://www.sanjayoak.com/Artical1.htm डॉ.संजय ओक यांच्या लोकसत्तातील लेखांचा संग्रह
६.      कीर्तीवंत धन्वंतरी, अशोक चिटणीस, परचुरे प्रकाशन, मूल्य रू.२००/- फक्त.


[१]  ध्वनीस्त्रोत आणि ध्वनीसंवेदक यांच्यातील परस्परसापेक्ष गतीमुळे संवेदकास ऐकू येणार्‍या आवाजाची वारंवारिता बदलते, ह्या प्रभावास, तो शोधून काढणार्‍या डॉप्लर ह्या शास्त्रज्ञाचे नाव देण्यात आलेले आहे.
[२]  म्हातारपणी मेंदूत पाण्याचा दाब वाढून तोल जाणे, मूत्र-नियंत्रण नाहीसे होणे असा त्रास होतो तो रोग. 

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं न पुनर्भवं ।
नको राज्य, नको स्वर्ग, पुनर्जन्म नको मला
---
'मोक्षही मज़ला नको'
मूळ श्लोक 'न स्वर्गं नापुनर्भवम्‌' असा आहे. अ-पुनर्भव म्हणजे मोक्ष, आणि तोहि नको, असा त्याचा अर्थ आहे. मला मोक्षप्राप्ति मिळून माझे चौर्‍यांशीचे फेरे थांबण्यापेक्षा दुरितांचे दु:खतिमिर नाहीसे होणे मला जास्त महत्त्वाचे वाटते, असे कविला सुचवायचे आहे.

- डी एन