प्रार्थना

न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं नापुनर्भवं । कामये दुःखतप्तानां‌ प्राणिनां आर्तिनाशनम्‌ ॥

न राज्य चाहूँ, न स्वर्ग चाहूँ और न चाहूँ मोक्ष, मैं तो चाहूँ, दुःखियों की पीडा होवै सभी खतम ।

नको राज्य, नको स्वर्ग, नको मोक्षही मला, दुःखितांच्या नष्ट व्हाव्या, आर्ती सार्‍या आजला.

I desire neither kingdom nor heaven nor liberation. I desire end of miseries for all the life on the earth.

२०२४/१२/२५

स्पंदपूरकारोपण म्हणजेच पेसमेकर बसवणे

स्पंदपूरकारोपणः १- हृदयस्पंद अनियमितता (लयहीनता)

वयपरत्वे होणाऱ्या नैसर्गिक ऱ्हासाने हृदयाची नियमित स्पंदपूरणक्षमता घटली आणि माझी शुद्ध हरपली. त्यावेळी मी रस्त्याने चालत होतो. मग थोड्या वेळातच मला पुन्हा भान आले. आजूबाजूला पाच दहा लोकं उभी होती. काय झाले? आता बरे आहात ना? असे मलाच विचारत होती. मी हो म्हणालो. खिसे चाचपडले. मोबाईल, पैसे, पाकीट सर्व व्यवस्थित आहेत ना हे तपासले. ते सर्व यथास्थितच होते. लोकांना त्यात पत्ता शोधण्याची वेळ आलेली नव्हती, म्हणजे मिनिट, अर्धा मिनिटच मधे गेले असावे. मी लोकांना म्हणालो, माझे घर जवळच आहे, मी जातो. पाच मिनिटांत मी चालतच घर गाठले. मग लक्षात आले की पाठीमागून शर्ट पँटला माती लागलेली आहे, म्हणजे जमिनीवर पडलो असणार. मग नेहमीप्रमाणे आंघोळीला गेलो. तेव्हा डोक्याला पाठीमागे मार बसला असावा असे जाणवले. बाहेर आल्यावर नीट पाहिले असता खरचटल्यासारखी जखम दिसली. मात्र डोक्याला मार लागलाय म्हटल्यावर डॉक्टरकडे जाणे क्रमप्राप्तच होते. किंचित काळ शुद्ध हरपण्याच्या अशा घटनेला वैद्यकीयदृष्ट्या ’मूर्च्छा’ (सिन्कोप) असे संबोधले जाते. मेंदूतील रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे, चेतना आणि स्नायूंची ताकद कमी होण्याने हे घडते. जलद सुरुवात, अल्प कालावधी आणि सामर्थ्याची उत्स्फूर्त पुनर्प्राप्ती ही या घटनेची वैशिष्ट्ये असतात.

डॉक्टरांनीही व्यवस्थित तपासले. हृदयालेख काढला (ई.सी.जी.). हृदयाचा ध्वन्यातीतालेख (अल्ट्रासोनोग्राफ किंवा २-डी-इकोकार्डिओग्राफ) काढला. मेंदूचे चित्रांकन (सी.टी. स्कॅन ऑफ ब्रेन) केले. हे सर्व नेहमीसारखेच व्यवस्थित होते. घटना का घडली ते कळलेच नाही. पुन्हा घडू शकेल का? या प्रश्नाचे उत्तर माहीतच नव्हते. घडेल तेव्हा रस्त्यावर वाहनासमोर असेन तर अपघात ठरलेलाच होता. मग एकट्याने घराबाहेर पडण्य़ावरच बंदी आली. तपास पुढे सुरू झाला. ४८ तासपर्यंत होल्टर[१] देखरेख (होल्टर मॉनिटरींग) करायचा निर्णय झाला. हृदयालेखकासारखेच यंत्र (ई.सी.जी.) खिशात बाळगून छातीवर त्याचे १० संवेदक (प्रोब्ज) चिकटवले गेले. घरातल्या घरातच मग मी या सर्व व्यवस्थेला घेऊन फिरत होतो. खात होतो. झोपत होतो. सर्व आह्निके नेहमीप्रमाणेच उरकत होतो. या तपासात हृदयस्पंद नियमितपणे होत आहेत का याची माहिती मिळते. मग अहवाल प्राप्त झाला. डॉक्टरांनी तपासला. लक्षात असे आले की, अधेमधे हृदयाचे ठोकेच चुकत होते. २ सेकंदांहून अधिक काळ निष्पंद होण्याचाही एक काळ येऊन गेलेला होता. म्हणजे ’हृदयस्पंद अनियमिता (लयहीनता, अर्रिहिथमिया व्याधी)’ होती, हे निदान झाले. यावर उपाय काय? तर कायमस्वरूपी ’स्पंदपूरक (पेसमेकर)’ बसवणे.

डॉक्टर म्हणाले जवळात जवळ म्हणजे हे काम ठाण्यालाच होऊ शकेल. मग चौकशी करता ’जुपिटर हॉस्पिटल’चे नाव समोर आले. डॉक्टरांनी निस्संदिग्धपणे स्पंदपूरकारोपणाची गरज आहे असे सांगितले आणि परिणामांबाबत शाश्वतीही दिली. यथावकाश स्पंदपूरकारोपण पार पडले. कसे? ते आपण आता पाहू.

स्पंदपूरकारोपणः २- जुपिटर शुश्रुषालय, ठाणे

डोंबिवलीत राहणाऱ्यांना दवाखाने, शुश्रुषालये, अतिविशेष शुश्रुषालये यांची ओळख करून देण्याची मुळीच आवश्यकता नाही. मात्र शुश्रुषालय कसे असावे याची ओळख मला जुपिटर शुश्रुषालय, ठाणे इथे गेलो तेव्हाच झाली.








प्रशस्त आवार, वाहनतळ (पार्किंग), पदोपदी मार्गदर्शन करणारे कर्मचारी, रुग्ण-प्रथम ब्रीद मिरवणाऱ्या स्वागतिका, रुग्ण-सुहृदाशी (पेशंटस रिलेटिव्हज) सुसंवाद साधणारे तेथील कर्मचारी, हवी तिथे आणि हवी तेवढी, प्रशस्त उद्‌वाहने (लिफ्टस), त्यातील हसतमुख चालक, प्रसन्न रुग्णसेविका (नर्सेस), तत्पर मामा (बॉईज), मावश्या, पुरेसे स्वच्छता कर्मचारी, स्वच्छ आणि प्रसन्न आवार, असंख्य डॉक्टर आणि बरे होऊन परतणारे अनेकानेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक; शुश्रुषालय कसे असावे याचा जणू वस्तुपाठच देतात.



ठायी ठायी असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या आणि प्रसाधनाच्या सुविधा. चोवीस तास चालणारे उपाहारगृह. एका दूरध्वनीवर तत्परतेने खाद्यपदार्थ पुरवण्याची सुविधा. तिथे मिळणारे सर्वच पदार्थ मात्र काळजीपूर्वक आरोग्यकारक म्हणून निवडलेले. संभाव्य रुग्णगर्दीचे सुयोग्य व्यवस्थापन करणारे सुरक्षाकर्मी. प्रतीक्षाकाळ कमीतकमी रहावा याकरता तत्पर असणारे सारेच लोक. हे या शुश्रुषालयाचे व्यवच्छेदक लक्षण आहे.

हृदयशास्त्रविभागाचा स्वागतकक्ष पहिल्या मजल्यावर आहे. तिथे जाताच एक संकेतचित्र (क्यू.आर.कोड) चित्रांकित करावे लागते. मग आपल्या भ्रमणध्वनीवर (मोबाईलवर) एक अर्ज येतो. रुग्णाचे नाव, पत्ता, विषय, संदर्भ इत्यादी माहिती भरून देताच, ती लगेचच शुश्रुषालयास सादर करता येते. आपणच भरून देत असल्याने माहिती अचूक राहते. भरून देण्याच्या कालनिर्देशामुळे रुग्णक्रम आपोआपच निर्धारित होतो. प्रक्रिया (प्रोसिजर) असे लिहिलेल्या कक्षांतून रुग्णांचा पूर्वतपास, आवश्यक त्या चाचण्या केल्या जातात, त्या संगणक प्रणालीत दाखल केल्या जातात आणि डॉक्टरांची प्रतीक्षा सुरू होते. दरम्यान मुख्य डॉक्टरांचे साहाय्यक ही सर्व माहिती तपासतात. रुग्ण व नातेवाईकांना प्रत्यक्ष भेटून रुग्णाचा पूर्वेतिहास माहिती करून घेतात. आधीची सर्व कागदपत्रे तपासतात. रुग्णाशी मुक्तपणे संवाद साधून नेमका काय त्रास आहे तेही नोंदवतात. एवढेच नव्हे तर शुश्रुषालयाच्या संगणक प्रणालीत तो दाखलही करून घेतात. फार प्रतीक्षा अशी करावी लागतच नाही. त्यामुळे एवढी पूर्वतयारी झाल्यावर मुख्य डॉक्टरांनी पाच मिनिटे वेळ दिला तरी, त्यांना रुग्णस्थिती अवगत होते. आपल्या प्रदीर्घ अनुभव आणि ज्ञानाच्या आधारे ते सत्वर निर्णय करतात. पुढील मार्ग आखून देतात. रुग्ण व त्याच्या नातेवाईकांनाही पुढे काय करायचे, कसे करायचे, खर्च किती येणार, त्याची तजवीज कशी करायची ही माहिती मिळते. आमचेही असेच झाले.

स्पंदपूरकारोपणः ३- उपायाची प्रक्रिया

हृदयस्पंदांत अनियमितता (लयहीनता) असल्याने निर्माण झालेला, अवचित शुद्ध हरपण्याचा धोका, कसा निवारता येईल? स्पंद आवर्तनाची वारंवारिता नोंदवून, त्यानुसार स्पंद निर्माण न झाल्यास स्पंदावर्तनाच्या अल्प काळातच हृदयास जर, जवळपास तसाच कृत्रिम स्पंद देता आला, तरच हे साध्य होऊ शकेल. मात्र दर मिनिटास ७२ ठोके[२] दराने एका शतायु आयुष्यभरात (१०० x १२ x २४ x ६० x ७२ = १२,४४,१६,०००) बारा कोटी, चव्वेचाळीस लाख, चारशे सोळा हजार ठोके, अस्खलितपणे देऊ शकणाऱ्या नैसर्गिक हृदयाचे काम; कृत्रिम उपकरण करू शकेल का? डॉक्टर म्हणाले, एवढे नाही, पण किमान पंधरा वर्षे; एक कोटी, शहाऐंशी लाख, बासष्ट हजार, चारशे ठोके, अस्खलितपणे देऊ शकणारी उपकरणे आज उपलब्ध आहेत. विना तक्रार, विना देखभाल, ती निरंतर कार्य करतात असा अनुभव आहे. एवढा प्रदीर्घ काळ शरीराशी जुळवून घेत, ती शरीराच्या आतच, सहकार्य करत, सुखरूप नांदू शकतात. मग तसे उपकरण कायमस्वरूपी शरीरात बसवून घ्यावे असे ठरले.

हे उपकरण म्हणजे एक विजकीय कृत्रिम स्पंदक असतो. हृदयस्पंद संवेदून, मापून, त्यांतील अनियमितता स्पंदावर्तन काळाच्या अल्पांशातच हेरून, पुरक स्पंद तयार करून अनियमिततेची पूर्तता करणे हेच त्याचे कार्य, त्याच्या आयुष्यभरात सुरू राहते. यादरम्यान त्याला लागणारी ऊर्जा पुरवणारी अक्षय्य विजेरीही त्यातच बसवलेली असते. जिच्यातील ऊर्जेचे मापन शरीराबाहेरूनच करता येते. आता प्रश्न राहतो तो, हे कृत्रिमरीत्या निर्मिलेले स्पंद हृदयातील विविक्षित ठिकाणी नेऊन पोहोचवण्याचा.

त्याकरता सुमारे अर्धा मीटर लांबीच्या, शरीरात अक्षर राहू शकणाऱ्या धातूच्या दोन तारा; स्पंदपूरकापासून ऊर्ध्वशिरेला छिद्र करून, उजवे अलिंद / कर्णिका (ऍर्ट्रियम) आणि उजवे निलय / जवनिका (व्हेंट्रिकल) या हृदयातील दोन कप्प्यांतील शिरानाल-अलिंद-ग्रंथी (सायनो-ऍट्रिअल नोड) आणि अलिंद-निलय-ग्रंथी (र्ट्रियो-व्हेंट्रिक्युलर नोड) या दोन स्थानांवर नेऊन तेथे कायमस्वरूपी जोडल्या जातात. स्पंदपूरकही मग गळपट्ट्याच्या अस्थिवर (कॉलरबोनवर) त्वचेखाली शरीरातच बंद केला जातो.

स्पंदपूरकारोपणः ४- हृदयाचे कार्य[३]

हृदय हे स्नायूंनी बनलेले इंद्रिय आहे. याचे सतत स्पंदन म्हणजेच आकुंचन आणि शिथिलन होत असते. हृदयाच्या स्पंदनामुळेच रक्ताभिसरण संस्थेतील रक्तवाहिन्यांतून रक्त, शरीराच्या इतर भागांकडे प्रेरित होत असते. हृदयातून बाहेर पडलेल्या रक्तामधून शरीराकडे प्राणवायू आणि पोषक द्रव्ये, तर फुप्फुसांकडे चयापचय क्रियेत तयार झालेले कर्ब-द्विप्राणिलासारखे टाकाऊ पदार्थ वाहून नेले जातात. सामान्यपणे हृदयाकडे शिरांवाटे कमी प्राणवायुयुक्त रक्त येते. ते रक्त फुप्फुसाकडे पाठवले जाते. फुप्फुसामध्ये या रक्तात प्राणवायू मिसळला जातो आणि हे रक्त परत हृदयाकडे येते. असे फुप्फुसाकडून आलेले प्राणवायूमिश्रित रक्त हृदयाकडून धमन्यांवाटे शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे पाठवले जाते.

हृदय ही एक स्नायूंपासून बनलेली पिशवी आहे. सस्तन प्राणी आणि पक्षी यांच्या हृदयाचे चार कप्पे असतात. हृदयाच्या वरच्या कप्प्यांना अनुक्रमे उजवे अलिंद (ऍर्ट्रियम) व डावे अलिंद (ऍर्ट्रियम), तर खालच्या कप्प्यांना अनुक्रमे उजवे निलय (व्हेंट्रिकल) व डावे निलय (व्हेंट्रिकल) म्हणतात.

हृदयात एकदिश झडपा असल्याने रक्तप्रवाह एकाच दिशेने होतो; उलट दिशेने होत नाही. हृदय एका संरक्षक आवरणात म्हणजेच हृदयावरणात बंद असते. या आवरणाला तीन स्तर असतात; बाहेरचा अधिहृद्स्तर म्हणजेच हृदावरण, मधला स्नायुस्तर म्हणजे हृद्स्नायुस्तर आणि आतला अंत:स्तर.


उजव्या अलिंदाला तीन द्वारे असतात. त्यांपैकी दोन महाशिरांची असून, वरच्या ऊर्ध्वमहाशिरेवाटे शरीराच्या वरच्या भागातील रक्त अलिंदात येते आणि खालच्या अधोमहाशिरेवाटे खालच्या भागांतील रक्त अलिंदात जाते. तिसरे द्वार अलिंद-निलय यांच्या दरम्यान विभाजकपटात असून त्यामार्गाने अलिंदात जमा झालेले रक्त त्याच्या आकुंचनामुळे निलयात उतरते. या द्वाराशी त्रिदली झडपअसते आणि या झडपेमुळे उजव्या निलयात आलेले रक्त अलिंदात परत फिरत नाही.

उजवे निलय हे उजव्या अलिंदाखाली असून त्याला दोन द्वारे असतात; एक, उजवे अलिंद-निलय द्वार आणि दोन, फुप्फुस-धमनी द्वार. या फुप्फुस-धमनी द्वारातून उजव्या निलयातील रक्त फुप्फुसांकडे जाते. या द्वारावर असलेल्या अर्धचंद्राकृती झडपेमुळे फुप्फुस-धमनीत शिरलेले रक्त उजव्या निलयात मागे फिरत नाही.

उजव्या निलयापासून निघणाऱ्या फुप्फुस-धमनीच्या पुढे दोन शाखा होऊन एक उजवी व दुसरी डाव्या फुप्फुसाकडे जाते. जेव्हा उजव्या निलयाचे आकुंचन होते, तेव्हा तेथील रक्त या शाखांमधून दोन्ही फुप्फुसांमध्ये जाते. तेथे या रक्तात हवेतील प्राणवायू शोषला जाऊन रक्त शुद्ध म्हणजेच प्राणयुक्त होते आणि त्यातील कार्ब-द्विप्राणिल बाहेर पडतो. असे शुद्ध झालेले रक्त फुप्फुस शिरांच्याद्वारे हृदयाकडे परत डाव्या अलिंदात येते. प्रत्येक फुप्फुसांतून दोन फुप्फुस शिरा निघून, एकूण चार शिरा डाव्या अलिंदाच्या मागच्या बाजूने चार द्वारांनी रक्त आणतात. या चार द्वारांशिवाय डाव्या अलिंदात आणखी एक द्वार असून त्यावाटे रक्त डाव्या निलयात उतरते. या डाव्या अलिंद-निलय द्वारावर एक द्विदल झडपअसून तिच्यामुळे डाव्या निलयात उतरलेले रक्त परत अलिंदाकडे फिरत नाही.

डाव्या निलयापासून महाधमनी निघते. डाव्या निलयाचे आकुंचन झाले की, तेथील रक्त महाधमनीत शिरते. महाधमनीच्या द्वाराशी अर्धचंद्राकृती महाधमनी झडप असते, ज्यामुळे रक्त निलयाकडे मागे फिरत नाही. महाधमनीतील या झडपेच्या वरच्या भागातून दोन शाखा निघतात. त्यांपैकी एक हृदयाच्या उजव्या बाजूस, तर दुसरी डाव्या बाजूस रक्त पुरविते. हृदयाच्या बाह्यभागावरील खोबणीतून या दोन हृदयधमन्या हृद्स्नायूंना रक्त पुरवतात. या खोबणीतच हृदयाच्या स्नायूतील अशुद्ध (प्राणविरहीत) रक्त नेणाऱ्या हृदयशिरा असतात, ज्यांद्वारे अशुद्ध रक्त महाशिरेत पोहोचते.

डाव्या निलयातील प्राणयुक्त रक्त महाधमनीत जोराने ढकलण्याचे कार्य निलयाच्या आकुंचनामुळे होते. महाधमनीपासून अनेक शाखा व उपशाखा निघून त्यांच्याद्वारे शरीराला प्राणयुक्त रक्त पुरवले जाते. सर्व शरीराला रक्त पोहोचवायचे असल्याने डाव्या निलयाच्या भित्तीतील स्नायू जाड व शक्तिशाली असतात. उजव्या निलयाला मात्र फुप्फुसापर्यंतच रक्त ढकलायचे असल्याने त्याच्या भित्ती त्यामानाने कमी जाड असतात. तसेच दोन्ही अलिंदांना लगतच्या निलयांमध्ये रक्त ढकलायचे असल्याने त्यांच्या भित्तींची जाडी कमी असते.

स्पंदपूरकारोपणः ५- हृदयाची विद्युत प्रणाली[४]

हृदयाची प्रेरक क्रिया म्हणजेच स्पंदन एका ठरावीक लयीत होत असते. हृदयाचे स्पंदन म्हणजे आकुंचन आणि शिथिलन (रिलॅक्सेशन) यांचे चक्र. या स्पंदनाची लय राखण्याचे काम शिरानाल-अलिंद गाठ (सायनो-ऍट्रिअल नोड) करत असते. ही गाठ म्हणजे गतिकारक पेशींचा गुच्छ असतो. हृदयाच्या मागच्या भागात, जेथे ऊर्ध्वमहाशीर उजव्या अलिंदात शिरते, तेथे ही गाठ असते. ती शरीराच्या विश्रांत अवस्थेत मिनिटाला ७०८० या दराने नियमित विद्युतस्पंद निर्माण करीत असते आणि हे स्पंद हृदावरणातील गतिकारक पेशींपासून बनलेल्या विद्युतसंवाहकी तंतूंच्या जाळ्यात आणि तेथून हृदयाच्या स्नायुपेशींत पसरत असतात आणि हृदयाचे आकुंचन घडवून आणतात.

शिरानाल-अलिंद गाठीत (सायनो-ऍट्रिअल नोड मध्ये) निर्माण झालेला स्पंद प्रथम दोन्ही अलिंदांच्या स्नायूंमध्ये पोहोचतो. त्यामुळे दोन्ही अलिंद आकुंचित होतात. पुढे ही विद्युतसंवेदना अलिंदस्नायूमधून अलिंद-निलय ग्रंथी(र्ट्रियो-व्हेंट्रिक्युलर नोड मध्ये) एकत्रित होते. ही ग्रंथी (गाठ) उजव्या अलिंदाच्या तळाशी त्रिदली झडपेजवळ असते. ही ग्रंथी ती संवेदना थोड्याशा विलंबाने पुढे विद्युतसंवाहकी तंतूंच्या अलिंद-निलय-स्नायू-समूह मार्गाकडेपाठवते, जेथून ती दोन्ही निलयांमध्ये पसरते. या समूहातील विद्युतसंवाहकी तंतू आंतरनिलय भित्तींमध्ये शिरून त्यांच्या दोन शाखा होतात आणि उजव्या तसेच डाव्या निलयांच्या स्नायूंचे आकुंचन घडवून आणतात. अलिंद-निलय ग्रंथीच्या ठिकाणी विद्युतसंवेदनेला जो विलंब होतो, त्याचमुळे अलिंद व निलय यांचे आकुंचन एकावेळी न होता आधी अलिंदांचे नंतर निलयांचे असे होते.

अलिंदातून निलयात रक्त जाण्याची क्रिया सर्वस्वी त्याच्या आंकुचनावर अवलंबून नसते. आकुंचन सुरू होण्याआधी त्यातील जवळजवळ ७५% क्रिया घडून येते आणि आकुंचनामुळे ती पूर्ण होते. अलिंदाच्या आकुंचनाची उपयुक्तता, विशेषत: हृदय जेव्हा अतिरिक्त क्षमतेचा वापर (उदा., व्यायाम करीत असताना) करीत असते, तेव्हा दिसून येते. ही क्षमता विश्रांत स्थितीच्या ३-४ पट असू शकते. विश्रांत अवस्थेत हृदयातून महाधमनीमध्ये दर मिनिटाला ५-६ लिटर (स्त्रियांमध्ये १०२०% कमी) रक्त प्रवेश करते.

हृदयचक्र: हृदय साधारणपणे दर मिनिटाला ७०८० वेळा आकुंचन-शिथिलन (स्पंदन) पावते आणि प्रत्येक आकुंचनाबरोबर डाव्या निलयातील रक्त महाधमनीतून प्रेरित केले जाते. महाधमनीतून रक्त पुढेपुढे त्या धमनीच्या लहानलहान शाखांपर्यंत जाते, तेव्हा त्या-त्या धमन्या प्रसरण पावतात. या प्रसरणालाच नाडीम्हणतात. धमनीच्या खाली जेथे हाड असते तेथे तिचे प्रसरण सुलभपणे समजू शकते. उदाहरणार्थ मनगटामध्ये धमनी त्वचेलगत असून तिच्याखाली हाड असल्याने त्या धमनीचे स्पंदन सहज कळते.

 

हृदयाचे स्पंदन सतत चालू असते. स्नायूंचे आकुंचन होऊन गेल्यावर प्रसरण (शिथिलन) होते, तेवढा वेळच त्यांना विश्रांती मिळू शकते. हृदयाच्या स्पंदनाचा दर जेव्हा मिनिटाला ७०८० असतो, तेव्हा एक चक्र पुरे होण्यास ०.८ सेकंद लागतात. त्यापैकी आकुंचनाला ०.३ सेकंद आणि प्रसरणाला ०.५ सेकंद लागतात. हृदयस्पंदनाचा वेग वाढला की, आकुंचनकाल तेवढाच राहून प्रसरणकाल मात्र कमी होतो. जसे व्यायाम, ज्वर, भीती, राग इत्यादींमुळे स्पंदनाचा वेग वाढतो. स्पंदनाचा वेग मिनिटामागे १०० झाला तर हृदय चक्र ०.६ सेकंदांत पुरे होते. त्यापैकी ०.३ सेकंद आकुंचनकाल वगळल्यास प्रसरणाला ०.३ सेकंदच वेळ मिळतो, म्हणजेच हृदयाच्या स्नायूंचा विश्रांतिकाल कमी होतो. व्यायामाने हृदयाच्या स्पंदनाचा दर तात्कालिक वाढला तरी नियमित व्यायाम केल्याने तो कालांतराने कमी होतो आणि असे होणे आरोग्यासाठी चांगले असते.

मेंदू आणि मेरुरज्जू (स्पायनल कॉर्ड) यांपासून निघणाऱ्या चेतांद्वारे शरीरांतील सर्व इंद्रियांचे क्रियानियंत्रण होते; परंतु हृदय असे एकमेव इंद्रिय आहे ज्याची आकुंचन-शिथिलन क्रिया हृदयाच्या स्नायूंमध्ये असलेल्या गतिकारक पेशींद्वारे होते. हृदयस्पंदनाचा वेग मात्र मेंदूपासून निघालेल्या दोन बाजूंच्या दोनही दहाव्या भ्रमण चेतांकडून आणि अनुकंपी चेताजालाकडून नियंत्रित होतो. अनुकंपी चेताजालामुळे हृदयस्पंदन जास्त वेगाने होते, तर दहाव्या चेतामुळे हा वेग कमी होतो.

हृदयातील स्नायुपेशींची आकुंचन क्रिया ही, चेतापेशींच्या आकुंचन क्रियेसारखी रक्तातील कॅल्शियम मूलकांच्या प्रमाणावर अवलंबून असते. पेशीमध्ये कॅल्शियम मूलक शिरून पेशीचे आकुंचन घडवून आणतात. त्यानंतर थोड्या विलंबाने पेशीत पोटॅशियम मूलक शिरून विरुद्ध परिणाम म्हणजेच पेशीचे शिथिलन घडवून आणतात. शरीराचे तापमान वाढले की (उदा. ज्वर) स्पंदनाचा वेग वाढतो. याउलट परिणाम, शरीराचे तापमान कमी झाले असता दिसतो. हे सर्व बदल हृदयालेखात (इलेक्ट्रोकार्डिओग्रॅम) प्रतिबिंबित होतात. हृदयालेख म्हणजे हृदयाचे स्पंदन होत असताना विद्युत संवेदनेत कालानुक्रमे कसे बदल होतात, हे दाखवणारा विद्युतविभव-कालाचा आलेख असतो.

हृदयध्वनी: स्पंदश्रावकाने (स्टेथॉस्कोपने) छातीची तपासणी केल्यास हृदयाच्या आकुंचन-शिथिलनामुळे उत्पन्न होणारे आवाज ऐकू येतात. हे आवाज डाव्या स्तनाजवळ चौथ्या व पाचव्या बरगड्यांच्या मध्यभागी आणि उजव्या बाजूच्या तिसऱ्या बरगडीजवळ उरोस्थीपाशी ऐकू येतात. निरोगी माणसांत दोन स्पष्ट आवाज ऐकू येतात. त्यांचा उल्लेख ल्ल्ब्ब्बआणि डब्बअसा केला जातो. पहिला ल्ल्ब्ब्बहा आवाज तुलनेने लांब, तर दुसरा आखूड व खटकेदार असतो. पहिला आवाज निलयस्नायूंच्या जोरदार आकुंचनामुळे आणि झडपांच्या दलांच्या कंपनामुळे उत्पन्न होतो, तर दुसरा महाधमनी आणि फुप्फुस-धमनी यांच्या उगमांपाशी असलेल्या अर्धचंद्राकृती झडपा एकदम बंद होताना झालेल्या कंपनांमुळे होतो. परंतु हृदयविकारांमुळे (उदा. हृदयाच्या झडपांच्या रोगामुळे) हृदयाचा आवाज वेगळा ऐकू येतो किंवा हृदयाची घरघर ऐकू येते. हृदयातील बिघाड किंवा हृदयविकार यांच्या निदानासाठी वापरली जाणारी प्राथमिक साधने स्पंदश्रावक (स्टेथॉस्कोप) आणि विद्युत हृदयालेखक (इलेक्ट्रोकार्डिओग्रॅम) ही आहेत.

स्पंदपूरकारोपणः ६- हृदयधमनी आलेखन (वाहिनीदर्शन, कॉरोनरी अँजिओग्राफी)

विद्युत-शारीरिक तपास आणि हृदयधमनी आलेखन (इलेक्ट्रो-फिजिओलॉजिकल स्टडी अँड कॉरोनरी अँजिओग्राफी, वाहिनीदर्शन) करण्यासाठी डॉक्टरांनी आम्हाला पत्र दिले होते. तपास याकरता करावा लागतो की, हृदयात स्पंद नेमके कुठे निर्माण होतात, कुठून कुठे जातात आणि कुठे व नेमके काय कार्य घडवून  आणतात हे कळावे. मात्र शुश्रुषालयातील डॉक्टर म्हणाले की, ही माहिती ’होल्टर देखरेख’ अहवालात आधीच उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे आम्हाला हृदयधमनी आलेखन आणि स्पंदपूरकारोपण (कॉरोनरी अँजिओग्राफी अँड पेसमेकर इम्प्लांट) या दोन शस्त्रक्रिया कराव्या लागतील. दुसऱ्या शस्त्रक्रियेची नेमकी आवश्यकता आणि प्रक्रिया समजून घेण्याकरता, पहिले हृदयधमनी आलेखन करावे लागेल. दोन्ही मिळून सुमारे तासभर लागू शकेल.

उजव्या मनगटातील मुख्य धमनीतून हृद्नालप्रवेशक (कॅथेटर) आत शिरवून धमनीच्या आतूनच तो हृदयापर्यंत निरनिराळ्या ठिकाणी फिरवला जातो. त्याच्या टोकातून कसलेसे प्रारक द्रव्य बाहेर स्रवत ठेवतात. ते छातीवर बाहेरून केंद्रित केलेल्या प्रारण चित्रकास दिसत असल्याने आसपासच्या भागाची चित्रे बाहेर संगणकाच्या पडद्यावर तयार होत राहतात. ती वास्तवकालीन चित्रे पाहतच डॉक्टर हृद्नालप्रवेशक आत सरकवत वा फिरवत राहतात. स्पंदपूरक कुठे बसणार, त्यातून निघणाऱ्या दोन तारा कोणत्या धमनीतून, कुठून रक्ताभिसरण प्रणालीत प्रवेश करणार, हृदयात नेमक्या कोणत्या स्थानी त्या अडकवल्या जाणार याचे मार्गदर्शन, याची माहिती, या आलेखनातून प्राप्त केले जाते.

स्पंदपूरकारोपणः ७- स्पंदपूरक आरोपण प्रक्रिया

डाव्या बाजूच्या गळ्याच्या अस्थिवरील त्वचेला सुमारे ४ से.मी. आडवा छेद घेऊन कापलेल्या त्वचेची वरची कडा तात्पुरती वर आणि खालची कडा तात्पुरती खाली खेचून ठेवतात. कापातून उर्ध्वशिरेस छेद करून हृद्नालप्रवेशक बसवतात. त्यातून स्पंदपूरकाच्या तारा एक एक करून आत शिरवून ईप्सित जागी अडकवून टाकतात. मग हृद्नालप्रवेशक काढून टाकतात. दोन्ही तारा स्पंदपूरक उपकरणास जोडतात. उपकरण कापातून खालच्या त्वचेच्या आत डाव्या बाजूच्या गळ्याच्या अस्थिच्या वर शिरवतात. पुरते आत सारले गेल्यावर काप शिवून टाकतात. त्यावर पट्टी चिकटवतात. जी सात दिवसांनीच काढायची असते. तोवर तिला पाणी लागू द्यायचे नसते. अशाप्रकारे स्पंदपूरक उपकरण शरीरात बसवले जाते. वरतून दिसतही नाही आणि बाहेरून त्याची चिंताही करावी लागत नाही. ते गुपचुप कार्य करत राहते.

मात्र उपकरण शरीराबाहेर आणि तारा यथासांग शरीरात शिरवून हृदयात बसवलेल्या असतांना, तारा उपकरणास जोडल्या जातात. त्याचे संपूर्ण विद्युत कार्य तपासले जाते. मग उपकरण गळ्याच्या हाडावर त्वचेखाली शिरवून ईप्सित स्थळी स्थापन केल्यावरही त्याचे संपूर्ण विद्युत कार्य तपासले जाते. नंतरच सुमारे चार सेंटीमीटर लांबीची त्वचेतली ती शिवण शिवून प्रक्रिया पूर्ण केली जाते.

उपकरणाचे विद्युत कार्य मग पुन्हा एकवार तपासले जाते. तपासाची ही प्रक्रिया एका कड्याच्या साहाय्याने केली जाते. उपकरणाच्या बरोबर वरती, त्वचेवरच हे कडे फक्त ठेवले जाते. त्याला जोडलेल्या तारांचा गुच्छ एका संगणक-सदृश यंत्रास जोडलेला असतो. त्यातूनच विद्युत संकेत पाठवून कड्यातूनच मिळणाऱ्या प्रतिसादांचे मूल्यमापन केले जाते आणि उपकरण ईप्सित पद्धतीने कार्य करत असल्याची खात्री करवून घेतली जाते. शिलाईचे टाके त्वचेत विरघळणारे असतात. एखादा रेशमाचा टाका असतो, तो सात दिवसांनी काढून टाकतात. पट्टीही निघून जाते.

स्पंदपूरक उपकरण मात्र शरीरासोबत आता कायमचे राहणार असते. हृदयाचे ठोकेच चुकतात, तेव्हा स्पंद पुरवणारे एक सुरक्षा कवच असते ते.

आता हे सर्व उपचार पुरवणारी शुश्रुषालये, विशेषज्ञ, अनुभवी डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सेस, अनुभवी आरोग्यकर्मी, सशक्त प्रशासकीय व्यवस्था, आपल्या घराच्या जवळात जवळ उपलब्ध असावी. स्वस्तात स्वस्त उपचार तिथे मिळावेत. ’रुग्ण प्रथम’ ब्रीद त्यांनी मिरवावे. हे सारे खरे तर स्वप्नवतच आहे. मी मात्र असा सुदैवी आहे की, मला हे सर्व लाभले. माझ्यावर ओढवलेल्या लयहीनतेचे यथातथ्य उपचार झाले. माझ्या उर्वरित आयुष्याची गुणवत्ता अपार वाढली. ज्या व्यवस्थेने मला हे सर्व दिले त्या व्यवस्थेप्रती मी कृतज्ञ आहे. ती समर्थपणे उभी करून, अव्याहत सांभाळणाऱ्यांना सादर प्रणाम!



[१] नॉर्मन जे. होल्टर हे हेलेना मोन्टाना येथील एक अमेरिकन जैव-भौतिकी-तज्ञ होते. १९४९ साली त्यांनी ’परिधानक्षम हृदयालेखन उपकरणा’चा शोध लावला. १९६२ साली हे उपकरण बाजारात उपलब्ध झाले. होल्टर देखरेख उपकरण (मॉनिटरिंग डिव्हाईस) म्हणून ते नावारूपास आले.

[२]  सरासरीने पुरुषांचे दर मिनिटास ७२ ठोके पडत असतात तर स्त्रियांचे ८४.

[३]  हृदय https://marathivishwakosh.org/56770/ - हे. चिं. प्रधान

[४] हृदयाची विद्युत प्रणाली https://my.clevelandclinic.org/health/body/21648-heart-conduction-system

२०२२/१२/१५

शारीरिक स्वायत्तता

शरीर हवं तस वळू शकतं. मूल रांगू लागते तेव्हा तर अनेक बाळांना पायाचा अंगठा तोंडात घालून चोखण्याची सवय असते. जन्मानंतर, वसुदेवाच्या डोक्यावरील टोपलीतून यमुना पार करणारा बालकृष्ण आठवा. मात्र वयाच्या पन्नाशीनंतर, हेच साधता आले तर स्वास्थ्य उत्तम आहे असे समजावे. सांगायचे काय आहे की, वयपरत्वे मनुष्याच्या स्वायत्तता कमी कमी होत जातात. स्नायूकाठिण्य, धमनीकाठिण्य, वृत्तीकाठिण्य अशा सर्व प्रकारच्या कठिणतांमुळे मानवी कुडी आखडत आखडतच जात असते. मुळात लाभलेल्या शारीरिक लवचिकतेचा, वयपरत्वे र्‍हास होतो आणि एक एक स्वायत्तता आपण गमावत जातो. शारीरिक स्वायत्तता सहजी गमवू नये, ह्याकरता काहीतरी केले पाहिजे, म्हणून वाचकांना सतर्क करणे, हाच ह्या लेखाचा उद्देश आहे. 

चौथीच्या वर्गात शिकणारी काही मुलेही, हल्ली दीर्घकाळ (अगदी पंधरा वीस मिनिटेही) मांडी घालून बसू शकत नाहीत. टेबलावर जेवण, शाळांतून बाकड्यांवर बसणे, अगदी शौच्यालाही विलायती कमोडांचा वापर करणे, ह्यामुळे एवढ्या अल्प वयांत मुले मांडी घालण्याची क्षमताच गमावत आहेत. तीशीतल्या बाबांना बुटाचे मोजे चढवायला खाली पौच्यांवर बसणे जड जाते. ते खुर्चीवर बसून मोजे चढवू लागतात. हल्ली कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमांत खाली जमिनीवर बैठकीची सोय केलेली असली, तरी काही प्रमाणात तरी खुर्च्या मांडाव्याच लागतात. मी शाळेत होतो तेव्हा अशी परिस्थिती नव्हती. लहान मुलेच काय पण सर्व वयांतील प्रौढ लोक, तास अन्‍ तास जमिनीवर बसून गणपती उत्सवाचे कार्यक्रम आनंदाने पाहत असत. आपण काही गमावत आहोत काय? काय आहे ते? त्याचाच इथे वेध घेतलेला आहे!

आता मी काही वरकरणी अत्यंत सोप्या वाटणार्‍या शारीरिक कृती सांगणार आहे. करून पाहा.

१.    पायाचे अंगठे जुळवून ताठ उभे राहा. हात शरीरासोबत जमिनीकडे खेचून धरलेले. मग डोळे मिटून घ्या. बघा हं! सांभाळा. तोल का बरे ढळतोय? संतुलन साधणे ही शरीराची अनमोल शक्ती असते. ती गमावणे परवडणारे नसते.

२.    डोळे मिटून घ्या. म्हणजे गच्च नाही. अर्धोन्मिलित. म्हणजे समोरील दृश्य बघायचे नाही म्हणून. सहज. मधून मधून उघडूनही पाहू नका. असे जास्तीत जास्त किती काळ राहता येईल? मिनिटभर, दोन, तीन, किती मिनिटे? कारण सर्व जगाला केवळ नेत्ररंध्रांनी आकळून घेण्याची सवय लागल्याने, आपल्या इतर संवेदनाही सक्षम आहेत, ह्याचे भानच आपल्याला राहिलेले नसते. ते येण्याकरता हे आवश्यक असते. मग आपल्याला निरनिराळे आवाज ऐकू येऊ लागतात. वास येतात. स्पर्श जाणवतात. चाहूल लागते आणि केवळ नेत्रावलंबी झालेल्या आपल्या संवेदना, अष्टपैलू होण्यास मदत होते.

३.    मारूतीला करतो तसा नमस्कार करा. म्हणजे दोन्ही हात जमिनीला समांतर धरून. फक्त हे हात पाठीमागे जोडून पाठच्या व्यक्तीला नमस्कार करायचा आहे. छे! हे हात एकमेकांशी जुळत का नाहीत बरे? हातापायांची निसर्गदत्त लवचीकता चिरजीवी नसते. टिकवली तरच टिकत असते. रोज प्रयत्न करा. हळूहळू साधू लागेल. वस्तुतः हे सगळ्यांनाच साधू शकते.

४.    उंच स्टुलावर चढून उभे राहा. हे विशेषतः चाळीसीपुढच्या स्त्रियांना जड जाते. संतुलन, समन्वय आणि सावधानता ह्यांच्यायोगेच हे साधले जाऊ शकते. शरीरास मुळातच प्राप्त झालेल्या ह्या शक्ती नाहीशा होऊ देऊ नका. त्यांचा अभ्यास करा. स्वाध्याय करा. सवयीने त्यांना शाश्वत करा.

५.    दोरीवरच्या उड्या मारता येणे हे स्वस्थतेच्या एका वांछनीय स्तराचे द्योतक आहे. आबालवृद्ध सगळ्यांनीच त्याचा जमेल तसा सराव ठेवावा. किमान आठवून तर बघा, आपण अखेरच्या दोरीवरच्या उड्या कधी मारल्या होत्या ते!

मला जेव्हा हृदयविकाराने गाठले तेव्हा पुनर्वसनाकरता, मी योगवर्गाला जाऊ लागलो. प्रार्थनेदरम्यान डोळे मिटून घेऊन, पावलांचे अंगठे जुळवून ताठ उभे राहणे किती कठीण आहे ते मला तेव्हा कळले. सवय नसेल तर तोल जातो. हळूहळू सवयीने मला ते साधले. समोर छातीशी हात जोडून आपण नमस्कार करतो तसा पाठीशी हात जुळवून नमस्कार केल्यास हातांच्या मोठ्या स्नायुंना कार्यरत राखण्यास मदत होते, हेही मला तेव्हाच कळले. टाचांवर चालणे, पौच्यांवर चालणे, पर्वतासन, उभे राहून समोर हात जमिनीला समांतर धरून पाय ताठ ठेवत कमरेत वाकवत हातास टेकवणे इत्यादी लवचिकतेसाठीचे व्यायाम मी तिथे शिकलो.

बैठ्या जीवनशैलीमुळे आखडलेल्या स्नायूंना मोकळे करण्यासाठी / कार्यरत राखण्यासाठी लवचिकतेसाठीचे व्यायाम दिवसातून १०-२० मिनिटे तरी करणे आवश्यक असते. बैठी आसने (खुर्चीवर, दिवाणावर, पलंगावर) घालून तासंतास बसणार्‍यांनी, वारंवार आसन मोडून थोडेसे चालून घ्यावे. एकाच स्थितीत अवघडून राहणे टाळावे. कमी करता येईल तेवढे कमी करावे. शरीराचे किमान मोठे स्नायू (हात, पाय वगैरे) दिवसातून एकदा तरी त्यांच्या संपूर्ण क्षमतेने ताणले जायला हवे असतात. तरच ते शाबूत राहतात. माणसाला पूर्वी शेपूट होती. ती न वापरल्याने नष्ट झाली असे म्हणतात. तेव्हा जे अवयव वापरात राहत नाहीत ते नष्ट होण्याची भीती असतेच. 'वापरा अथवा गमवा' (यूज इट ऑर लूज इट).

श्वसनशक्ती वाढविण्यासाठी १० मिनिटे तरी प्राणायाम करायलाच हवा. कपालभाती, उदरश्वसन आणि अनुलोमविलोम यांचा उपयोग सर्वाधिक होतो. खरे तर श्वसन कायमच चालू असते. पण आपण फारच थोड्या श्वसनशक्तीचा उपयोग करत असतो. तेव्हा नेहमीच दीर्घश्वसन करावे. संथ श्वसन करावे. योगासने आणि प्राणायाम यांना मिळून 'योगसाधना' असेही म्हणतात. त्याचा उपयोग आरोग्यसाधनेत अपार आहे.

शारीरिक ताणांना मोकळे करण्यासाठी शिथिलीकरण जरूर असते. आपण दिवसातला बराचसा काळ कशाच्या तरी प्रतीक्षेत, अवघडत बसून, उभे राहून, वा थांबून घालवत असतो. ह्या काळात आपण निरनिराळे शारीरिक तणाव गोळा करत असतो. सुखासन, शवासन ही आसने दररोज करावीतच. एरव्हीही हातपाय ताणणे, फिरविणे, त्यातील ताण मोकळे करणे, हे करतच राहावे. त्यामुळे ते ताण वेळीच निरस्त होऊ शकतात.

आपल्यासोबत कायमच मानसिक तणाव असतात. न सुटणारे प्रश्न, न आवडणारी माणसे, गोंधळ, गडबड, प्रदूषण, ह्यांचे तणाव एकापाठोपाठ एक आपल्यावर आक्रमण करत असतात. शरीराचा व मनाचाही प्रतिसाद 'लढा वा पळा' (फाईट ऑर फ्लाईट) स्वरूपाचा असतो. म्हणजे झेपत असेल त्याच्याशी लढा आणि झेपत नसेल त्यापासून पळ काढा. मात्र सार्‍याच तणावांनी एकदम हल्ला बोलताच, शरीर वा मन प्रत्येक बाबतीत लढायचे वा पळायचे ह्याचा निर्णय करण्याआधीच, ती समस्या येऊन ठेपते आणि मग आपण तिचा सामना करू शकत नाही. तेव्हा एका वेळी एकच समस्या हाताळणे आणि 'लढा वा पळा' चा निर्णय त्वरित घेणे, ह्यामुळे तणावांचे व्यवस्थापन सोपे होते.

मानवी शरीराच्या सापळ्यात होणार्‍या निरंतर विकासाचे प्रतीक म्हणजे वाढती उंची. हल्ली बरीच मुले सामान्य मानवी उंचीपेक्षा खूप अधिक उंच वाढतात. हे खरे तर मानवी शरीराच्या उन्नतीचेच लक्षण आहे. मात्र वर्तमान जगात त्यांना अपार अडथळ्यांचा सामना करावा लागतो. गादीत पाय दुमडून झोपावे लागते. दारांतून जातांना मान वाकवायची सवय लावून घ्यावी लागते. बसमधे बसणे दुरापास्तच असते, कारण दोन बैठकींमधले अंतर त्यांच्याकरता अभिकल्पितच नसते. लोकलमध्ये हाती धरायच्या कड्यांचा मार खातच समोर सरकता येते. सगळ्यात अवघड म्हणजे मांडी घालून बसणे. ह्यांनी अडीच-तीन फुटांची मांडी घातली की, शेजारी फारशी मंडळी मावतच नाहीत. मग अशा मुलांना अंग चोरून बसण्याची, पाय गुडघ्यात मुडपण्याची सवय लावून घ्यावी लागते. अर्थातच ह्यामुळे त्यांच्या स्वाभाविक स्वायत्ततेचा र्‍हास होणे अटळ होते. त्यांच्या आकारास अनुरूप घरे, बस, गाड्या, खुर्च्या, टेबले, पलंग होतील तो सुदिन! मात्र स्वतःकरता हव्या तशा सोयींची निर्मिती करणेही त्यांच्या हाती नसते, हा खरोखरीच दैवदुर्विलास म्हणावा लागेल. म्हणूनच, किमान आपल्या शरीरानुकूल सुखसोयींची संकल्पना करणेच आपल्या हिताचे आहे, हे सर्व उंच मुलांना, माणसांना उमगेल, तर ह्या लेखाचे सार्थक झाले असे होईल.

जन्ममृत्यू अटळ सत्य हे, नियम हा निसर्गाचा । 
सुखदुःख रंग जीवनाचे, मार्ग धरा कर्माचा ॥ 

जन्म माणसाहाती नसतो. मृत्यूही त्याचे हाती नसतो. दरम्यानचे जीवन मात्र त्याचे कर्मानेच फुलत जात असते. त्याच्या कर्मामुळेच त्याच्या जीवनात सुखदुःखाचे रंग भरत जातात. जन्मापासून तर मृत्यूपर्यंत, मनुष्याला जर स्वावलंबी राहायचे असेल, तर निसर्गदत्त शारीरिक स्वायत्ततेस प्राणपणाने जपलेच पाहिजे. जगातील मानवेतर कुठलाच प्राणी प्रामुख्याने परावलंबी होत नाही. होऊच शकत नाही. त्याची उपजीविकाच त्याला आपल्या पायावर उभी ठेवते. आपल्याच पंखांवर उडत ठेवते. आपल्याच कल्ल्यांनी तरते ठेवते. त्याचे परिजन, आप्त-स्वकीय, मित्र-बांधव त्याचे अनावश्यक लाड करून त्याला परावलंबी होऊ देत नाहीत. पाखरू, न उडत्या पिल्लांना दूरवरून आणून घास जरूर भरवेल, पण पंख-तुटक्या सहकार्‍यास अन्न भरवत नाही. परावलंबी होऊ देत नाही.

चला तर मग, आपण आपल्या निसर्गदत्त शारीरिक स्वायत्ततेची कदर करू या. तिचा सांभाळ करू या. तिचे उन्नयन करू या, आणि आपल्याच स्वस्थतेला, स्वायत्ततेच्या आकाशात उंच विहरत ठेवू या! रोज लवचिकतेकरताचे व्यायाम करू या. शिथिलतेकरता योगासने करू या. सशक्त श्वसनशक्तीकरता प्राणायाम करू या. प्रत्येक बाबतीत लढायचे वा पळायचे ह्याचा निर्णय ताबडतोब करू या. शरीरास धार्जिण्या सुख-सवलती निर्माण करू या. केवळ एवढेच धोरण मनाशी जपल्यास, शरीर सतेज होईल, चेहरा कांतीमान होईल, हालचाली चपळ होतील आणि आपण आपले आपल्यालाच आवडू लागू!!

पूर्वप्रसिद्धीः शारीरिक स्वायत्तता, ठाण्यातील विद्याप्रसारक मंडळाच्या ’दिशा’ मासिकाचा २०१५ सालच्या जुलैचा अंक.


२०२०/०७/०५

आरोग्यवर्धिनी अपराजिता

पावसाळा सुरू व्हायचाच अवकाश की, निसर्गातल्या मोकळ्या पडीक जागांवर आपोआप रुजलेले गोकर्णाचे वेल, गर्द निळ्या रंगाने नजरेस पडू लागतात. भारतातल्या निरनिराळ्या भाषांत ह्याला निरनिराळी नावे आहेत. फुलाच्या आकारास अनुलक्षून ती ठेवली गेलेली आहेत.

     अरेबिक      बजरूल्मजारियुन-ए-हिंदी (Bazrulmazariyun-e-hindi)
     इंग्लिश      बटरफ्लाई पी, ब्लू पी, पिजन विंग्स
     उडिया       ओपोराजिता
     ऊर्दू         माजेरीयुनीहिन्दी (Mazeriyunihindi)
     कन्नड       शंखपुष्पाबल्ली, गिरिकर्णिका, गिरिकर्णीबल्ली
     कोकणी      काजुली
     गुजराती      गर्णी, कोयल
     तमिळ       काककनाम (Kakkanam), तरुगन्नी (Taruganni)
     तेलुगू        दिन्तेना (Dintena), नल्लावुसिनितिगे (Nallavusinitige)
१०    नेपाळी       अपराजिता (Aparajita)
११    पंजाबी       धनन्तर (Dhanantar)
१२    फारसी       दरख्ते बिखेहयात (Darakhte bikhehayat)
१३    बंगाली       गोकरन (Gokaran), अपराजिता (Aparajita)
१४    मराठी       गोकर्णी, काजली, गोकर्ण
१५    मल्याळम    अराल (Aral), कक्कनम्कोटि (Kakkanamkoti), शंखपुष्पम्
१६    संस्कृत      गोकर्णी, गिरिकर्णी, योनिपुष्पा, विष्णुक्रान्ता, अपराजिता
१७    हिंदी        अपराजिता, कोयल, कालीजार

निसर्गात वेगवेगळ्या रंगांची तसेच वेगवेगळा आकार आणि सुवास असणारी असंख्य फुले आढळतात. काहींचा आकार आणि रंग आपले लक्ष वेधून घेतात. गोकर्ण हेही असेच एक सुंदर, नाजूक फूल आहे. प्रकाशचित्रणास हे फूल अत्यंत अनुकूल आहे. म्हणूनच आंतरजालावर आणि व्यक्तिगत संग्रहांतूनही गोकर्णाच्या फुलांचे असंख्य आविष्कार आढळून येतात. गोकर्ण ही भारतीय वंशाची वेलवर्गीय सदाहरित वनस्पती आहे. क्लायटोरिया टरनेशिया हे गोकर्णाचे शास्त्रीय नाव आहे. फुलांचा आकार गायीच्या कानासारखा असतो म्हणून, मराठीत याला गोकर्णम्हणतात. गोकर्णाच्या फुलांचा रंग गडद निळा असतो. तसेच फिकट निळा, फिकट गुलाबी, सफेद या रंगांची फुले असलेली गोकर्णदेखील आढळते. रंग कोणताही असो; गर्द हिरव्या पानांत ही फुले अगदी उठून दिसतात. गोकर्णाची पाने गर्द हिरव्या रंगाची असून ती संयुक्त प्रकारची असतात. सदाहरित वेल असल्याने बारा महिने तेरा काळ वेलीवर पाने असतात. पानांची विशिष्ट रचना आणि आकार यामुळे शोभेची वेल म्हणून उद्यानात हिची लागवड केली जाते. गोकर्णाची वेल बहुवर्षांयू आहे.

पाच पाकळ्यांनी बनलेल्या या फुलात एक पाकळी मोठी असते. तिचाच आकार गायीच्या कानासारखा असतो. गोकर्णाच्या वेलीला पावसाळ्यात फुले येतात. फुले काय- अक्षरश: बहर येतो. ही फुले सुकून गेली की शेंगा येतात. शेंगा साधारण फरसबीच्या शेंगेच्या आकाराच्या; परंतु चपटय़ा असतात. कोवळ्या शेंगांची भाजी केली जाते. गोकर्णाची लागवड बियांपासून केली जाते. शेंगा पक्व झाल्या की त्यांचा रंग बदलतो आणि त्या तडकतात. त्यातून साधारण आठ-दहा बिया मिळतात. याच बिया रुजवून आपण गोकर्णाची नवीन रोपे तयार करू शकतो. पाण्याचा निचरा होणाऱ्या कोणत्याही मातीत या बिया अगदी सहज रुजतात. फार मेहनत करावी लागत नाही.

गोकर्णाच्या फुलांचे असंख्य औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळेच अनेक रोग, व्याधी निवारण्यासाठी या फुलांचा वापर केला जातो. निळ्या गोकर्णाच्या फुलांपासून नैसर्गिक रंगदेखील तयार केला जातो. गोकर्णाची फुले सावलीत वाळवून त्याची पावडर करतात. या पावडरचा चहा केला जातो. गोकर्णाच्या फुलांचा चहा अत्यंत औषधी असून, तो मध किंवा गूळ घालून घेतात.

गोकर्णाची फुले, शेंगा, पाने, साल, मुळ्या या प्रत्येक भागाचा औषधांमध्ये वापर केला जातो. पंचकर्मात या वेलीचा वापर शरीरातील त्रिदोषांना संतुलित करण्यासाठी, तसेच शरीरातील नको असणारे विषारी घटक बाहेर काढण्यासाठी केला जातो. सर्दी, खोकला, ताप, दमा या सगळ्या विकारांवर गोकर्ण औषधी आहे. तसेच त्वचा-विकार आणि रक्तशुद्धीसाठीही गोकर्णाचा वापर केला जातो. थोडक्यात काय, तुम्ही कोणताही रोग म्हणा. गोकर्णाचा औषधी म्हणून वापर करायचा विचार करा. गोकर्ण कधीच पराजित होणार नाही. म्हणजे हरणार नाही. म्हणूनच की काय बंगाली, नेपाळी, उडिया इत्यादी भाषांत गोकर्णाला अपराजिताअसे सुंदर नावही आहे.

घराची गॅलरी, कमान, शाळेच्या गेटची कमान, मंदिराचे प्रवेशद्वार. अगदी कुठेही तुम्ही गोकर्णाच्या वेलीची लागवड करून तो परिसर सुशोभित करू शकता. मग चला तर. लागा तयारीला. गोकर्णाच्या वेलीला आपल्या हरित-धनात सहभागी करून घेण्यासाठी.

संदर्भः

१. फुलांच्या विश्वात: गोकर्ण
भरत गोडांबे, लोकसत्ता टीम | July 30, 2017

२. अपराजिता के हैं कई जादुई लाभ - आचार्य श्री. बालकृष्ण, December 11,2019

ताजा कलमः ह्या लेखाच्या अगणित वाचकांपैकी हम हिंदुस्थानी ग्रूपवरील सुधीर नाईक ह्यांनी गोकर्णास शंखपुष्पी म्हणत नाहीत असे सांगितले. थोडा अधिक तपास करता ते खरे आहे असे वाटते. पारंपारिक आयुर्वेदिक औषधांत समावेश असलेली शंखपुष्पी नावाची वेल निराळीच असून तिला पांढरी फुले येतात. गोकर्णास शंखपुष्पी म्हणतात. मात्र ते आयुर्वेदिक नामाभिधान नसावे असे मानण्यास वाव आहे. गोकर्णास अपराजिता म्हणतात हे नक्की. अपराजिता औषधी असते हेही नक्की. मात्र औषध म्हणून वापरायची असल्यास, कशावर औषध घेता आहात, ते तज्ञ व्यक्तीनेच दिले आहे ना, ह्याबाबत स्वतः खात्री करूनच वापरावीत. हा लेख सर्वसाधारण माहितीच्या संकलनातूनच तयार केलेला आहे. मी स्वतः डॉक्टर नाही. वैद्यही नाही. माझी औषध सुचवण्याची पात्रता नाही. ह्या लेखाचा उद्देश औषध सुचवण्याचा नाही.