प्रार्थना

न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं नापुनर्भवं । कामये दुःखतप्तानां‌ प्राणिनां आर्तिनाशनम्‌ ॥

न राज्य चाहूँ, न स्वर्ग चाहूँ और न चाहूँ मोक्ष, मैं तो चाहूँ, दुःखियों की पीडा होवै सभी खतम ।

नको राज्य, नको स्वर्ग, नको मोक्षही मला, दुःखितांच्या नष्ट व्हाव्या, आर्ती सार्‍या आजला.

I desire neither kingdom nor heaven nor liberation. I desire end of miseries for all the life on the earth.

२०२६/०९/२६

’आरोग्य आणि स्वस्थता’- वाचनसंख्या- १-लाख-पार

’आरोग्य आणि स्वस्थता https://aarogyasvasthata.blogspot.com/’ हा १ लाख वाचनसंख्या पार करणारा माझा तिसरा ब्लॉग आहे. ’नरेंद्र गोळे https://nvgole.blogspot.com/’ आणि ’अनुवाद रंजन https://anuvad-ranjan.blogspot.com/’ या अन्य दोन ब्लॉग्जनी नुकतीच प्रत्येकी अडीच लाख वाचनसंख्याही पार केलेली आहे.


 

’आरोग्य आणि स्वस्थता’ या अनुदिनीत प्रामुख्याने मला ग्रासलेल्या आरोग्यसमस्यांवर मी कसे उपाय शोधले त्याच्या हकिकती आहेत. इतरांनाही वेळीच जागे करणारे खूप लिखाण त्यात असल्याने ते जगभरातील खूप वाचक सदोदित वाचत असतात. आरोग्य आणि स्वस्थतेप्रती सर्वसामान्य माणसाने जेवढे जागरूक असायला हवे तेवढे जागरूक आपण नसतो. त्यामुळे प्रसंगविशेषी आपण अस्वस्थतेने, अनारोग्याने ग्रासले जातो. मग त्याच्या निवारणार्थ खूपच खटपट करावी लागते. दैनंदिन जीवनात काही सवयी अंगी रुजवल्यास अशा ’अग्निशमना’ची बहुधा आवश्यकताच राहत नाही. काय आहेत अशा सवयी? त्यांचा आढावा या दैनंदिनीत घेतलेला आहे.

भारतीय संस्कृतीची खरी शिकवण ’अष्टांगयोग’ अंगी बाणवण्याची आहे. दैनंदिन जीवनात यम (सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह), नियम (शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान), आसन (किमान ६ मिनिटे कोणत्याही अवस्थेत स्थिर राहता येणे, स्थिरसुखाअसनम्‌), प्राणायाम (पूरक, कुंभक आणि रेचक या श्वासोच्छवासचक्रात कुंभक धरण्याचा अभ्यास करून छातीचा भाता अधिक फुगवता येण्याचे सामर्थ्य मिळवणे. आपण हा भाता त्याच्या संपूर्ण क्षमतेच्या केवळ १५%च वापरत असतो.), प्रत्याहार (स्वस्थचित्त, सावधचित्त आणि दत्तचित्त होण्याची सवय), धारणा (उद्दिष्ट, ध्येय), ध्यान (चिंतन) आणि समाधी (हवे ते साधणे, मोक्ष, मुक्ती) अंगी रुजवण्याची आहे. तो जर अंगी रुजलेला असेल तर अस्वस्थता, अनारोग्य दूरच राहतात. क्वचित त्यांचा सामना करावाही लागला तरी तो सोपा ठरतो. त्याकरताची एकूण १९४ ’पातंजल सूत्रेही’ या अनुदिनीत अर्थासह तपशीलाने चर्चिली आहेत.

आजवर हे सर्व वाचत असलेल्या देशविदेशातील माझ्या सर्व वाचकांना माझा सादर नमस्कार आणि मनःपूर्वक धन्यवाद. असेच वाचत राहा.

चला आपण सारे मिळून उन्नत जीवनशैलीचा शोध घेऊ या!
चला आपण ’आरोग्य आणि स्वस्थता’ यांचे पाईक होऊ या!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: