शरीर दैनंदिन जीवनात अनंत ताणतणावांचा सामना करते. त्यांच्यातून मुक्ती मिळविते. न जमल्यास त्यांना शरण जाते. तेव्हा ते ताण, मान, खांदा, पाठ, कमर, गुडघे, घोटे इत्यादी आणि इतरही सर्व अवयवांमधून अवघडून राहतात. त्यांना मुक्तीची अपेक्षा असते. विशेषतः जे निदानित हृदयरुग्ण असतात त्यांच्यात तर ताणतणावांना शरण जाण्याची प्रवृत्ती घडत जाते. म्हणून रोगग्रस्त, अस्वस्थ, अवघडलेल्या स्थितीत कुठलेही इतर व्यायाम, प्राणायामादी प्रकार करण्याआधी शरीर पूर्णतः सैलावण्याची गरज असते. हे साधण्याच्या प्रक्रियेस प्रगतीशील शिथिलीकरण उपयोगी ठरते.
प्रगतीशील शिथिलीकरण म्हणजे एकेका अवयवास मार्गदर्शनाखाली तणावमुक्त करत, सावकाश संपूर्णरीत्या सैलावणे. यासाठी शवासनाच्या स्थितीत उताणे पडून राहून सांगितलेल्या अवयवास ताण देऊन सैल सोडणे असे पायाच्या बोटांपासून कपाळावरील आठ्यांपर्यंत करत गेले की शरीर सैलावते. ह्यामध्ये जाणीवपूर्वक ताणून सैल सोडण्याने आखडलेले सांधे मोकळे होण्यास मदत होते.
डॉ. बालाजी तांबेंनी काढली आहे तशाप्रकारच्या योगनिद्रा सीड़ींचाही उपयोग होऊ शकतो. डॉ.राजेंद्र बर्वे ह्यांचे एक पुस्तक आहे, 'तुमची झोप तुमच्या हाती'. त्यामध्येही मार्गदर्शनासह आणि स्वतःहून केलेल्या शिथिलीकरणाच्या प्रक्रिया दिलेल्या आहेत.
अवघडलेल्या शरीरभागाकडे मनाचे लक्ष वेधून, जाणीवपूर्वक तेथे साखळलेले तणाव शिथिल करणे हाच ह्या सर्व प्रक्रियांचा उद्देश असतो. असावा. मात्र, हे साधल्यानंतरच इतर आरोग्यसाधनेचे शारीरिक कार्यक्रम अंमलात आणावेत. तर ते यशस्वी होऊ शकतात.
रात्रीची झोप व्यवस्थित लागणे हेही संपूर्ण शिथिलीकरण साधण्याकरता आवश्यक असते. “निद्रेची चिरफाड” हा डॉ.श्रीराम दिवटे यांनी मिसळपाव डॉट कॉम वर लिहीलेला एक लेख यासंदर्भात वाचनीय आहे. त्याचा दुवा http://www.misalpav.com/node/14053 हा आहे. डॉक्टर साहेब म्हणतात, “निद्रादेवी एकटी नसून त्या दोन जुळ्या बहिणी असतात. भिन्न स्वभावाच्या, विरोधी आचरणाच्या. रात्रभर त्या फेर धरुन कधी झिम्मा, कधी लपाछपी, तर कधी खोखो खेळतात. एकीनं व्यक्ती झोपवली की दुसरी त्या व्यक्तिला उठवण्याचा, जागते ठेवण्याचा प्रयत्न करते. एकीचं नाव शांता. ती नावाप्रमाणेच शांत झोपेचं वरदान देते. तिला शास्त्रीय परिभाषेत नॉन-रॅपीड-आय-मूव्हमेंट स्लीप (नॉनरेम) म्हणायचं. तर दुसरीला रॅपीड-आय-मूव्हमेंट स्लीप (रेम) अर्थात परखड भाषेत 'चळमुंगळी' म्हणायचं. ही बयाच फार त्रासदायक असते. हीच व्यक्तीला 'जागते रहो'ची साद घालत सतावते. नॉनरेम निद्रेच्या १, २, ३, ४ अशा उत्तरोत्तर गडद होणार्या प्रत्येकी ९० मिनिटांच्या पायर्या असतात. म्हणजे शांतेची चौथी स्टेज ही प्रगाढ वा साखरझोप असते. वाढत्या टप्प्याप्रमाणे चौथ्या स्टेजला एकदम परब्रह्म समाधीच लागते, इतकी की काही कोवळ्या नवजात बालकांना किंवा मृत्युशय्येवरील वयस्कांना याचवेळी स्वर्गाची द्वारे खुली होतात! हू नाही की चू नाही, डायरेक्ट मुक्तीच. अशा 'शांते'चं गुणवर्णन करावं तितकं कमीच. असो. तर, या नॉनरेमच्या चारही स्टेजमध्ये हटकून व्यत्यय आणते ती रेमनिद्रा. ती साधारणतः ५ ते ३० मिनिटे (व्यक्तिपरत्वे) प्रत्येकाला सतावते. याच काळात डोळे गरागरा फिरुन व्यक्ती चाळवली जाते. रेम मध्ये पडलेली वाईट स्वप्ने दिवसाही आठवून भिववतात. हिच्यामुळेच व्यक्ती झोपेत बावचळतात. एकंदर हिचं वर्तनच हानिकारक आणि म्हणूनच जेव्हा या बयेचा ताल बेताल होतो (३० मिनिटांपेक्षा अधिक) तेव्हा आपल्याला नीटशी झोप लागत नसते, आपण अनिद्रेची तक्रार करतो.”
तुमचे लक्ष अचानक वेधून घेतले जाणार नाही, तुम्हाला कोणी अवचित पुकारणार नाही, ध्यानात व्यवधान आणणार नाही असा किमान तास/अर्धा तास प्रत्येक व्यक्तीस दररोज उपलब्ध असावा. अशा वेळेस शक्य झाल्यास एकांतवासात, शवासनात पडावे. घड्याळ, मोबाईल, दरवाजाची घंटी इत्यादी वस्तू बंद/उपद्रवहीन कराव्या. सार्या शरीरास, मनास एका स्थिरपद अवस्थेत आणून निष्पंदभाव प्राप्त करावा. विचारांची आवर्तने शांत करावी. आजूबाजूच्या जगाकडे केवळ साक्षीभावाने पाहावे. त्याच्या व्यवहारात सहभागी होऊ नये. त्यात दखल-अंदाजी करू नये. ध्यान करावे. जप करावा. चिंतन करावे किंवा नुसतेच निष्पंद व्हावे. रोज किमान एकदा, काही काळ तरी, असा विश्राम मिळाला तर, शरीर/ मनास शिथिल होण्याची संधी मिळते आणि स्वस्थतेची किमान एक पायरी तरी गाठली जाते.
.
आरोग्य आणि स्वस्थता, ह्या गुणवत्तापूर्ण नागरी जीवनाच्या किमान आवश्यकता आहेत. आजच्या गतीमान आयुष्यात, आरोग्य आणि स्वस्थता यांबाबत पुरेसे प्रशिक्षण सहजी उपलब्ध नाही. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे आणि समाजाचे आरोग्य आणि स्वस्थता यांचा समर्थ सांभाळ करता यावा याकरता आवश्यक त्या सर्व अद्ययावत माहितीचे संदर्भसाधन, मराठीतून निर्माण करणे, हा या अनुदिनीचा उद्देश आहे.
प्रार्थना
न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं नापुनर्भवं । कामये दुःखतप्तानां प्राणिनां आर्तिनाशनम् ॥
न राज्य चाहूँ, न स्वर्ग चाहूँ और न चाहूँ मोक्ष, मैं तो चाहूँ, दुःखियों की पीडा होवै सभी खतम ।
नको राज्य, नको स्वर्ग, नको मोक्षही मला, दुःखितांच्या नष्ट व्हाव्या, आर्ती सार्या आजला.
I desire neither kingdom nor heaven nor liberation. I desire end of miseries for all the life on the earth.
न राज्य चाहूँ, न स्वर्ग चाहूँ और न चाहूँ मोक्ष, मैं तो चाहूँ, दुःखियों की पीडा होवै सभी खतम ।
नको राज्य, नको स्वर्ग, नको मोक्षही मला, दुःखितांच्या नष्ट व्हाव्या, आर्ती सार्या आजला.
I desire neither kingdom nor heaven nor liberation. I desire end of miseries for all the life on the earth.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा