प्रार्थना

न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं नापुनर्भवं । कामये दुःखतप्तानां‌ प्राणिनां आर्तिनाशनम्‌ ॥

न राज्य चाहूँ, न स्वर्ग चाहूँ और न चाहूँ मोक्ष, मैं तो चाहूँ, दुःखियों की पीडा होवै सभी खतम ।

नको राज्य, नको स्वर्ग, नको मोक्षही मला, दुःखितांच्या नष्ट व्हाव्या, आर्ती सार्‍या आजला.

I desire neither kingdom nor heaven nor liberation. I desire end of miseries for all the life on the earth.

२०११/०३/१३

भावनिक ताण

भावनिक ताण हृदयविकाराचे कारण होऊ शकतो या गोष्टीचे महत्त्व हल्लीच सर्वदूर स्वीकारले जात आहे. आजही बव्हंशी, हृदयरूग्ण-पुनर्वसन-कार्यक्रम, तणाव व्यवस्थापन कौशल्य शिकवत नाहीत आणि बव्हंशी डॉक्टर त्यांच्या रुग्णांस ते शिकून घेण्याचा सल्लाही देत नाहीत. भावनिक तणाव मूलत: दोन प्रकारचा असतो. कुशाग्र आणि बद्धमूल. कुशाग्र म्हणजे टोकदार. मात्र शरीराच्या प्रतिसादाने शमू शकणारा. बद्धमूल म्हणजे, अनेक कुशाग्र तणावांच्या साखळीमुळे, शरीराचा प्रतिसाद एका कुशाग्र ताणास शमवू शकण्याच्या आतच दुसरा कुशाग्र तणाव उद्‍भवल्याने अंतिमतः शरीराच्या प्रतिसादक्षमतेबाहेर गेलेला तणाव. आपल्या शरीराची संकल्पना बद्धमूल ताणापेक्षा, कुशाग्र ताणास उत्तम तोंड देता यावे या दृष्टीने केलेली असते.

जरी भावनिक तणाव (भासमान धोका) असेल किंवा भौतिक बदल (तापमानातील टोकाचे बदल किंवा अतिश्रमांचा थकवा) होत असतील तरी, शरीर घडामोडींच्या एका साखळीचे कार्यान्वयन करून त्या ताणास प्रतिसाद देते. ह्या प्रक्रियेस `लढा-वा-पळा' प्रतिसाद म्हणतात आणि तो आपल्याला एकतर लढण्यास किंवा पळण्यास तयार करतो.

शरीर हे कार्य दोन प्रकारे करते. पहिला प्रकार असा, तुमच्या मेंदू आणि हृदयात थेट संपर्क असतो. मज्जातंतू, ज्यांना आनुकंपिक (sympathetic) मज्जातंतू म्हणतात, ते हृदयातील संग्राहकांना उत्तेजित करून हृदयस्पंदने जलद आणि जोराने करवतात आणि हृदयधमनी आकषास कारण ठरतात. दुसरा प्रकार, मेंदू तुमच्या इतर अवयवांना (जशी तुमची अड्रिनल ग्रंथी) ताणविरोधी संप्रेरके (जशी की अड्रेनलिन) आणि स्टिरॉईड (जसे की कॉर्टिसॉल) स्त्रवण्यास कारण ठरतो, जी रक्तात तोवर फिरत राहतात जोवर ती हृदयात पोहोचत नाहीत. कुशाग्र तणावाचा कल अड्रेनलिन आणि त्याचा नातेवाईक नोरॅड्रेनलिन यांच्या निर्मितीत वाढ करण्याचा असतो. मात्र बद्धमूल ताण कॉर्टिसॉल निर्मितीत वाढ करतो. या संप्रेरकांच्या संकेतांनुसार शारीरिक प्रतिक्रियांची एक साखळीच घडून येते.

१. आपले स्नायू आकसू लागतात, ज्यामुळे आपल्या 'शरीराची कवचकुंडले` मजबूत होतात. आपण शारीरिक इजेपासून सुरक्षित होतो.

२. आपला जैविक प्रतिसाद `त्वरित' होतो, ज्यामुळे `लढण्यास वा पळण्यास' जास्त बळ आणि ऊर्जा मिळते. आपला हृदयस्पंदनदर आणि प्रत्येक स्पंदनात उत्क्षेपित रक्ताची मात्रा दोन्हीही वाढतात.

३. आपला श्वसनदर वाढू लागतो, धोक्याच्या प्रतिसादात `लढण्यास वा पळण्यास' जास्त प्राणवायू मिळतो.

४. आपली पचनसंस्था बंद होऊ लागते, ज्यामुळे `लढण्यास वा पळण्यास' उपयुक्त असणार्‍या मोठया स्नायूंकडे रक्त व उर्जा वळवली जाते.

५. आपल्या डोळ्यांची बुबुळे विस्फारू लागतात, ज्यामुळे दृष्टीस मदत होते. श्रवणशक्ती सारख्या इतर संवेदनाही तीव्र होतात.

६. बुडाशी इजा झाल्यास संसर्गाचा धोका कमी व्हावा म्हणून लघवी व शौचाची तीव्र भावना होते.

७. हातापायातल्या धमन्या आकसू लागतात, म्हणजे आपल्याला जखम वा इजा झाल्यास कमी रक्त वाहून जाते. तुम्हाला हे लक्षात आले असेल की ताणाच्या अवस्थेत हात थंड पडतात, हाच `ताणपत्त्यांच्या' कामाचा सिद्धांत आहे. `ताणपत्ता' हातात धरून ठेवला असता तुम्ही शिथिल होत जाता तसतसा `ताणपत्त्याचा' रंग बदलत जातो.

८. आपले रक्त जलद साखळू लागते, जेणेकरून आपणास जखम वा इजा झाली तर कमी रक्त वाहून जाते.


धोक्यातून वाचण्यास मदत करण्यासाठी, शतकानुशतके ह्या घडामोडी उत्क्रांत झाल्या आहेत. जर धोका स्पष्ट, सुनिश्चित व अल्पकालीन असेल तर त्या उत्तम काम करतात. कुशाग्र ताणाचा आलेख सोबतच्या आकृतीत दाखविलेला आहे. असे समजा की तुम्ही घरी जात असता रस्ता ओलांडत आहात (बिंदू-१). अचानक, डोळ्याच्या एका कोपर्‍यातून, तुमच्याकडे एक मोटार वेगाने येतांना तुमच्या लक्षात येते. तुमचे स्नायू ताणले जातात. तुम्हाला ऊर्जेचा आवेग जाणवतो आणि तुम्ही मागे सरकता. एका वस्तुवर धडकता. त्यामुळे हातातील एक धमनी फाटते. तिच्यातील रक्तस्त्राव त्वरित थांबतो (बिंदू-२). ह्या `लढा वा पळा' घडामोडी तुमचा जीव वाचवतात. जेव्हा धोका टळलेला असतो. तुम्हाला एक भरपाई करणारा आनुकंपिक प्रतिसाद जाणवतो (बिदू-३). तुमचे गुडघे थरथरू लागतात. तुम्हाला अशक्त वाटते. तुमचे स्नायू शिथिल होतात. तुमच्या धमन्या रूंदावतात. काही मिनिटांनंतर, तुम्ही पूर्वस्थितीत येता (बिंदू-४).

दुर्दैवाने, आजकालचे भावनिक ताण कुशाग्र असण्यापेक्षा मूलबद्ध असण्याचाच कल आहे. गेल्या काही दशकांत जीवनाचा वेग वाढत्या प्रमाणात जलद होत आहे. आपल्या शरीराचे 'अंतर्गत तंत्रज्ञान` कुशाग्र ताणाच्या सामना करण्यासाठी संकल्पित आहे. आजकालच्या जीवनातील मूलबद्ध ताणासाठी नाही. बहुधा एका कुशाग्र ताणातून सावरण्याआधीच आपणावर दुसरा कुशाग्र ताण येऊन पडतो. तणावस्तर वाढत वाढत जातो. अखेरीस हे प्रकरण बद्धमूल ताणाच्या कक्षेत जाते. सोबतच्या आलेखात हे उलगडून दाखविलेले आहे.


एका व्यक्तीचा दिवस पूर्वीच भरगच्च ठरलेला आहे. घडयाळाचा गजर तिला अंथरूणातून बाहेर खेचतो. कार्यालयातील सकाळच्या महत्त्वाच्या बैठकीला आधीच उशीर झालेला आहे. ती व्यक्ती दाढी करत आहे. रेडिओ सुरू होताच ती ऐकते की 'आणखी एक विमान अपघातग्रस्त झालेले आहे`. त्यातच तिला दुसर्‍या दिवशीच्या विमानाने प्रवास करायचा आहे. ओह! अचानक टॉवेलवर सगळीकडे रक्त दिसू लागते. फार धारदार ब्लेड आहे! नास्त्यासोबत वर्तमानपत्र वाचत असतांना कळतं की तिच्या समभागांचा भाव उतरला आहे. आता तिला कर्जाचे हप्ते कसे फेडावेत आणि मुलाला कॉलेजात कसे घालावे ह्याचाच प्रश्न पडतो. उशीर झाल्याने नाश्ता घेत असतांनाही घरच्यांशी बोलायला वेळ उरलेला नाही. ती भराभर अंडी व टोस्ट खाऊन दोन कप कॉफी ढोसते आणि घराबाहेर पडते. एक अठराचाकी अवजड वाहन अडलेले आहे, मैलभर लांबपर्यंत वाहतूक तुंबलेली आहे. हेही आजच घडायचे होते! कामावर ती एक तास उशीरा पोहोचते. तेव्हा महत्त्वाची बैठक नुकतीच संपत असते. तिचे वरिष्ठ आणि मुख्य स्पर्धक बाहेर निघत असतांना, तिच्याकडे सस्मित पाहत असतात. कार्यालयात शिरताच तिचा सचिव सांगतो की आयकर खात्याचा फोन होता. त्यांच्या गेल्या पाच वर्षातील आयकर-भरण्याची तपासणी करण्यासाठी त्यांनी भेट ठरवावी ह्यासाठी. आणि ही दिवसाची फक्त सुरूवात होती.

जेव्हा आपल्या ताण-घडामोडी बद्धमूलरीत्या कार्यान्वित होतात, तेव्हा जे प्रतिसाद आपल्या रक्षणासाठी अभिकल्पित असतात तेच हानिकारक, एवढेच काय प्राणघातकही ठरू शकतात. फक्त हातापायातीलच नव्हेत तर हृदयातील धमन्याही आकसू लागतात. हृदयधमन्यात रक्तगुठळ्या तयार होणे सहज शक्य होते.

अशाप्रकारे बद्धमूल तीव्र भावनिक ताणात आपले बहुतेक सारेच स्नायू आकसतात. मोठया स्नायूंपासून (ज्यामुळे मानेत, पाठीत, खांद्यात वगैरे दु:ख व ताण निर्माण होतो) तर हृदयधमनी सोबतच्या मुलायम स्नायूंपर्यंत (ज्यामुळे हृदयधमनीआकष होतो).

डॉ.अन्ड्रयू सेल्विन, हॉर्वर्ड मेडिकल स्कूल आणि डॉ.जॉन डिअरफिल्ड, हॅमरस्मिथ हॉस्पिटल, लंडन यांनी हृदयरुग्णांचा रक्तप्रवाह मोजण्यास हृदयाचा पी.ई.टी. स्कॅन वापरला. स्कॅन होत असतांना रुग्णांना साधे अंकगणितीय प्रश्न सोडविण्यास सांगत. मानसिक अंकगणित करण्याच्या भावनिक ताणामुळे त्यांच्या हृदयाकडे होणारा रक्तप्रवाह, मोजण्याइतपत कमी झाला. त्याचप्रमाणे डॉ.ऍलन रोझान्स्की, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, लॉस एंजेलीस, स्कूल ऑफ मेडिसिन यांना आढळले की हृदयधमनीविकार असलेल्या लोकांत मानसिक ताण, हृदयस्पंदन कमी कार्यक्षम करतो.

ताण व हृदयाबाबत बर्‍याच गैरसमजुती आहेत. आरोग्यपूर्ण जीवनात कार्यक्षमतेने कर्तव्ये करण्याचे सामर्थ्य असण्यासाठी, ताणास प्रतिसाद देण्याचे सामर्थ्य आणि सैलावण्याचे सामर्थ्य, ही दोन्हीही सारखीच महत्त्वाची आहेत. उत्तेजित होणे आणि सैलावणे दोन्हीही, शरीरास हितकारकच आहेत. उत्कृष्ट प्रतिसाद म्हणजे आव्हानांना व कठीण प्रसंगांना जलद व कार्यक्षमतेने प्रतिसाद देणे आणि नंतर सैलावणे. अनेक लोक नंतर सैलावत असतात त्यापेक्षा, सत्वर प्रतिसाद देण्यात चांगले असतात. कुशाग्र ताणादरम्यान, अड्रेनलिन व नोरॅड्रेनलिन ही संप्रेरके आपल्याला जास्त ऊर्जा देतात आणि आव्हानास तोंड देण्याचे दृष्टीने सुस्पष्ट विचार करण्यात आपली मदत करतात. पण जेव्हा आपण पूर्वस्थितीत पुन्हा येऊ शकत नाही, सैलावू शकत नाही तेव्हा ताण मूलबद्ध होत जातो. जेव्हा हे घडते, तेव्हा अड्रेनलिन व नोरॅड्रेनलिन यांच्या पातळ्या चढलेल्याच राहतात, ज्यामुळे भीतीयुक्त उत्सुकता व निद्रानाश, हृदयधमनीआकष आणि वाढती रक्तगुठळ्या निर्मिती होते. शिवाय अतिरिक्त कॉर्टिसॉल आणि इतर स्टिरॉईडस तयार होतात, ज्यामुळे हृदयधमनी अडथळे वेगाने वाढतात, भावनिक नैराश्य येते, नपुंसकता येते, मुरूम येतात आणि प्रतिबंधक प्रणालीचा र्‍हास होतो. हे परिणाम आहार व इतर घटकांवर अवलंबून नसतात. पीळदार स्नायू व्हावेत म्हणून स्टिरॉईडस घेणार्‍या कसरतपटूंच्या असे लक्षात येऊ लागते की त्यांच्या हृदयधमन्यांतही अडथळे जमू शकतात.

सारख्याच प्रमाणातील ताण-संप्रेरके, अंशत: अडथळ्यांनी बंद धमन्यांचे, सामान्य धमन्यांचे मानाने जास्तच आकुंचन घडवितात. जेवढी अवरुद्ध झालेली धमनी असेल तेवढे ताण-संप्रेरक कमी तयार होईल म्हणून अडथळ्याच्या जागीच धमनी आक्रसेल. धूम्रपानामुळेही पेशींपासून ताण-संप्रेरक निर्मिती कमी होते.

श्रेयनिर्देश: डॉ.डीन ऑर्निशेस प्रोग्राम फॉर रिव्हर्सिंग हार्ट डिसिज या पुस्तकातील तिसर्‍या प्रकरणातील एका भागाच्या स्वैर मराठी अनुवादाच्या आधारे हा लेख लिहिलेला आहे. माहिती सोपी करण्याच्या नादात कदाचित मूळ माहितीस धक्का पोहोचला असेल तर त्याचे श्रेय मात्र माझेच आहे.

श्रेयअव्हेर: मी “जीवनशैली परिवर्तनां”बद्दल जे लेख हल्ली लिहीत आहे, त्यांना परिपूर्णता येण्यासाठीच केवळ हा लेख लिहिला आहे. ह्या लेखातील ज्ञान माझे स्वतःचे नाही. तशी माझी वैद्यकीय पात्रता नाही. माझ्या हृदयविकारादरम्यान वाचनात आलेल्या चांगल्या माहितीचा लोकांना उपयोग व्हावा म्हणून ही माहिती इथे सारांश रूपात देत आहे. इथली माहिती केवळ सामान्य ज्ञान म्हणूनच वापरावी. फक्त चांगल्या माहितीचा दुवा म्हणून.

1 टिप्पणी:

mannab म्हणाले...

आपण लिहित असलेले जीवन शैलीपरिवर्तनाबद्दलचे लेख मला अत्यंत महत्वाचे आणि उपयुक्त वाटतात. भावनिक ताण हा केवळ हृदयविकाराच्या संबंधी महत्वाचा नसून त्याचा मधुमेहाशीही जवळचा संबंध आहे. रक्त शर्करा ही त्यानुसार बदलते. मी आपले लेख माझ्या काही मित्रांना वाचण्यास सुचवले आहेत. धन्यवाद.
मंगेश नाबर.