प्रार्थना

न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं नापुनर्भवं । कामये दुःखतप्तानां‌ प्राणिनां आर्तिनाशनम्‌ ॥

न राज्य चाहूँ, न स्वर्ग चाहूँ और न चाहूँ मोक्ष, मैं तो चाहूँ, दुःखियों की पीडा होवै सभी खतम ।

नको राज्य, नको स्वर्ग, नको मोक्षही मला, दुःखितांच्या नष्ट व्हाव्या, आर्ती सार्‍या आजला.

I desire neither kingdom nor heaven nor liberation. I desire end of miseries for all the life on the earth.

२००९/१२/०८

परावलंबित्वाचा शोध

शैशवावस्थेत असतांना, मनुष्य जिवंत राहण्यासाठी, भरण-पोषणासाठी, आणि देहविधींसाठीही इतरांवर अवलंबून असतो. ह्या अवलंबित्वापासून, स्वावलंबन शिकत शिकत मनुष्य बाल्य, तारुण्य, प्रौढत्व आणि वृद्धत्वापर्यंत पूर्णपणे स्वावलंबी, स्वतंत्र जीवन जगण्यास सरावतो. मात्र वृद्धत्वासोबत पुन्हा एकदा, क्रमाक्रमाने प्राप्त होत जाणारे अवलंबित्व मनुष्याला मानसिकदृष्ट्या क्लेशकारक असते. एवढे की त्याऐवजी किंवा त्यापेक्षा तो मृत्यूस आनंददायी समजू लागतो. मात्र अवलंबित्वावर मात करणे प्रयत्नसाध्य असू शकते तर मृत्यू स्वीकारण्याची मानसिक तयारी होऊनही तो आपल्या हातात नसतो. म्हणून वृद्धावस्थेतील किंबहुना साऱ्या आयुष्यभरातीलच परावलंबित्व कमी राखण्यासाठी, सुसह्य राखण्यासाठी तरूणपणातच काही पथ्ये, काही सवयी जडवून घेतल्यास, तसे साधेल का? हा स्थूलमानाने ह्या लेखाचा विषयभाग आहे.

याच लेखाच्या अनुषंगाने ही चर्चा मनोगत डॉट कॉम वर मागे झालेली होती. त्या चर्चेचा हा सारांश इथे देत आहे.

नव्याने नोकरीस लागलेला नव्या गावात जाऊन राहिलेला तरूण सुरूवातीस बऱ्यापैकी स्वावलंबी असतो. आपले कपडे स्वत: धुतो, इस्त्री करून आणतो, जेवणाची व्यवस्था स्वत: करतो, इतर बिले भरणे, खरेदी, जनरहाटी सगळे स्वत: सांभाळतो. तोच इसम लग्न होताच श्रमविभागणी करून पुष्कळशी कामे अंगाबाहेर टाकतो. कालांतराने तो त्या त्या कामाचेबाबतीत हळूहळू पण निश्चितस्वरूपाने परावलंबी होत जातो.

नोकरी-व्यवसायात ज्येष्ठता, अनुभव वाढत जातो तसातसा माणसाचा स्वत:ची वैयक्तिक कामे स्वत: करण्याकडील कल नाममात्रच काय तो उरतो. अती महत्त्वाची, अती उत्पादक कामे केवळ तोच करू शकत असल्याने, इतर वैयक्तिक कामे श्रमविभागणीच्या तत्त्वांनुसार इतरांकडे सुपूर्द केली जातात. कालवशात, अवकाशप्राप्त केल्यावर अशा अनैसर्गिक विभागणीची गरज राहत नाही पण प्रथा सुरूच राहते. परावलंबित्व दृढमूल होते.

देहधर्म, गृहकृत्य, उपजीविकाअर्जन, मनोरंजन, विचार आणि अनुभवांकन स्वत:चे स्वत: करायचे ठरविल्यास आपण नेहमी जी कामे सामान्यत: इतरांकरीता करीत असतो ती करणे आपल्याला शक्य तरी होईल का? सर्वसाधारणपणे नाही. मात्र वयपरत्वे अशा इतरांसाठी करावयाच्या कामापेक्षाही स्वावलंबनास अधिकाधिक महत्त्व प्राप्त होत जाते. वैयक्तिक कामांकरता इतरांच्या सेवा विकत घेण्याचे प्रमाण भारतीय समाजात जरा जास्तच आहे. ह्यामुळे परावलंबित्व वाढते. पाश्चात्य देशांमध्ये परिस्थिती जास्त चांगली असावी. म्हणून तरूण वयातच वैयक्तिक बाबतींमध्ये इतरांच्या सेवा विकत घेण्याचे प्रमाण कमीतकमी ठेवल्यास वयपरत्वे अडचणी निर्माण होणार नाहीत.

मुबलक वीज, पाणी, दूरसंचार, दूरश्रवण, दूरदर्शन आणि परिवहन सुविधा यांवरचे आपले अवलंबित्व आज घडीला अफाटच वाढले आहे. ह्या सुविधा उपलब्ध नसतांना आपल्याला कसे दिवस काढता येतील? तरीही काय काय आपण करू शकू? यांचा शोध घेण्यासाठी अशा परिस्थिती निर्माण करून त्यांमध्ये काही मर्यादित काळपर्यंत राहण्याचा प्रयासही प्रत्येकाने उदाहरणार्थ करायला हवा. पदभ्रमण सहलींमध्ये हे सारेच खूपशा प्रमाणात साधता येते.

व्यक्तिगत क्षमता/सामर्थ्ये आणि उपलब्ध सुविधा घटत जातील तसतसे आयुष्य विपन्नावस्थेकडे चालू लागते. वार्धक्याची ही वाटचाल सुसह्य व्हावी, समाधानी व्हावी आणि त्यादृष्टीने मानसिकता तयार व्हावी, ह्यासाठी अवलंबित्वाचा सतत शोध घेत राहायला हवा. तरच शेवटल्या श्वासापर्यंत सर्व शारीरिक क्षमतांसह समाधानाचे मार्गक्रमण शक्य होईलसे वाटते.

तुम्हाला ह्याबाबतीत काय वाटते? काय म्हणायचे आहे?

मानसिक दौर्बल्य प्रे. आनंदघन (गुरु., २२/०३/२००७ - १७:००).

अवलंबित्व हे शारीरिक व मानसिक अशा दोन्ही पातळीवर वेगवेगळ्या प्रकाराने असते. शारीरिक क्षमता निसर्गनियमानुसार वयाप्रमाणे आधी वाढत आणि नंतर घटत जाते. व्यायाम आहार आदि गोष्टी शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी किंवा टिकवून ठेवण्यासाठी कांही प्रमाणात उपयुक्त असतात. पण अनेक वेळा अनेक लोकांना अकस्मातपणे कुठल्यातरी रोगाने गाठलेले पहायला मिळते.

मानसिक अवलंबित्व हे बर्‍याच वेळा आत्मविश्वासाचा अभाव किंवा निव्वळ आळसापोटी येते. कधी कधी संस्कारसुद्धा माणसाला मानसिक रीत्या परावलंबी बनवतात. एका माझ्याहून वयाने ज्येष्ठ माणसाने एकदा "मला साधा चहासुद्धा करता येत नाही" असे फुशारकीने सांगितले. मी त्यांना नम्रपणे सांगितले की " जी गोष्ट एक अशिक्षित लहान मुलगी करू शकते ती करायला मला येत नाही असे सांगायला मला लाज वाटली असती." त्यांचा अहंकार अशा प्रकारे डिवचल्यानंतर त्याचा उपयोग झाला. पुढच्या वेळेस त्यांच्याकडे गेल्यावेळेस त्यांनी मला खायलासुद्धा करून दिले.

आम्हाला अशी शिकवण दिली गेली होती की घरातील प्रत्येक काम हे सर्वांचेच असते. हे काम पुरुषाचे, ते बाईचे, आणखी कुठले नोकराचे वगैरे घरातील कामाची वाटणी ही फक्त एक सोय असते, व्यक्ती हजर नसेल तर दुसर्‍या कुणीतरी ते आपणहून केले पाहिजे. त्याला ते करता आले पाहिजे. अशा प्रकारे आपल्यासाठी दुसरा करीत असलेले काम आपले मानणे ही मानसिक स्वावलंबित्वाची पहिली पायरी आहे असे मला वाटते.

छान प्रे. हॅम्लेट (गुरु., २२/०३/२००७ - २०:५४).

वेगळ्या विषयावरचा लेख आहे. आनंदघन यांनी म्हटल्याप्रमाणे यात मानसिकतेचा भागही आहे. मानसिक परावलंबित्व झुगारून देणे निश्चितच अवघड असते. यासाठी कठोर आत्मपरीक्षणाची गरज असते.

छान प्रे. लिखाळ (शुक्र., २३/०३/२००७ - १६:०२).

लेखाचा विषय आणि लेख आवडला. आपल्या मतांशी सहमत आहे. - लिखाळ.

सहमत प्रे. कारकून (शनि., २४/०३/२००७ - ०१:१९).

परावलंबित्व वाढत जाते हे खरे आहे, तसे होऊ नये म्हणून प्रत्येकाने जागरूक प्रयत्न केले पाहिजेत. ह्याची सुरुवात लहानपणापासूनच करायला हरकत नाही. आजकाल स्त्री आर्थिक दृष्ट्या स्वतःच्या पायावर उभी आहे, उभी राहू शकते. अशावेळी पती पत्नी दोघांनी घरकामात वाटा उचलण्यास हरकत नाही

चांगला विषय. प्रे. द्वारकानाथ कलंत्री (शुक्र., २३/०३/२००७ - १६:५२).

विषय चांगलाच निवडला आहे. मी याच्या कडे वेगळ्या पद्धतीने पाहू इच्छितो. प्रत्येकामध्ये बरीच कौशल्ये विकसीत झाली पाहिजे. उदा. पांडवाचे उदाहरण घेता येईल. विराटाकडे विजनवासात असताना धर्मराज विदूषकाचे, भीम स्वंयपाक्याचे, अर्जुन नर्तकीचे आणि सहदेव घोड्याच्या खरार्‍याचे काम करत असत. ज्यांना आयुष्यात काही साध्य करायचे असेल त्याने बर्‍याच कला अवगत करून घेतल्या पाहिजे.

नमस्कार लोकहो. प्रतिसादाखातर सगळ्यांना मन: पूर्वक धन्यवाद! प्रे. नरेंद्र गोळे (शनि., २४/०३/२००७ - ११:१९).

आनंदघन साहेब, अगदी खरे आहे आपले म्हणणे. आपल्या आजूबाजूची माणसे नित्यनियमाने करीत असलेली (क्षुल्लक का असेनात) कामे आपल्याला यायला हवीत. नसल्यास त्याला परावलंबित्व मानावे. ही प्रवृत्ती कर्त्या वयातच बाणविल्यास वार्धक्य पेलवणे सहज साधेल असे वाटते.

हॅम्लेट महोदय आत्मपरीक्षणाची गरज प्राकर्षाने जाणविल्यामुळेच मी हे लिहीले आहे. मात्र, आत्मपरीक्षणाचा आधार सद्यस्थितीची माहिती हा असायला हवा. त्याचाच सतत शोध घ्यायला हवा असे मला सांगायचे आहे.

लिखाळ महाशय आपलीही स्वतंत्रपणे अस्तित्वात असलेली ह्याबाबतची मतेही आम्हाला अवश्य कळू द्या.

द्वारकानाथजी मला तुमचे नेहमीच कौतुक वाटते. तुम्ही कळीचा मुद्दा नेहमी वेगळ्याच नजरेने बघता. म्हणूनच तुम्हाला हे जाणवले असावे की आपल्या नित्यकर्तव्यांव्यतिरिक्त इतर अनेक कामेही आपण शिकून घेतली तर मावळतीच्या काळात अवश्य उपयोगी पडतील. मी आपल्याशी शतप्रतिशत सहमत आहे.

कारकून महोदय, आपले म्हणणे अगदी खरे आहे. आपण आपल्याच कित्येक क्षमता केवळ वापर न केल्याने यथावकाश गमावत जातो. भारतातही आज भारतीय संडासात बसू न शकणार्‍या ज्येष्ठ नागरिकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. एवढेच काय पण रोज बैठ्या-उभ्या जीवनशैलीत आकंठ बुडालेल्या आमच्यासारख्या अनेकांना तासभर मांडी घालून बसणे जमेनासे होते. तर वज्रासन घालणे अनेकांना शक्य राहिलेले नसते. आपले पूर्वज ८०-९० वयापर्यंतही दूरवरच्या भारतीय संडासात पायी जाऊन व्यवस्थित बसत असलेले मी पाहिलेले आहेत. निस्संशयपणे आपण आपल्या दिनचर्येचा पुनर्विचार करायला हवा आहे. कर्त्या वयातच तो केल्यास सुधारणेला वाव राहून वार्धक्यास सामर्थ्यधार्जिणे करता येईल. एरव्हीही आपण काही कामे नेहमीच स्वत:ची स्वत:च करावीत असा हट्ट कर्त्या काळापासूनच धरायला हवा.

चक्र! प्रे. माधव कुळकर्णी (सोम., २६/०३/२००७ - २१:५५).

नरेंद्र राव, विषय चांगला आहे! पूर्वी गावभर उनाडक्या करताना शेजारच्या काकूंनी सांगीतलेले दळण आणण्याचे कामही केले असल्याचे प्रकर्षाने आठवले. हल्ली दळण आणणे सोडा, सौ. ने खाली जाऊन मिरच्या आणायला सांगीतल्या तरी कपाळावर आठ्या चढतात. कलकत्त्याला मी एकटा राही, लग्नापूर्वीही मी एकटाच मीरा रोडला राहात होतो त्यावेळी कपडे धुण्याचा व घर साफ सफाईचा नित्य कार्यक्रम ठरलेला असे. मीरा रोडला असताना बाहेर जेवण्याचा कंटाळा येतो म्हणून बर्‍याचदा स्वयंपाकही (तोही स्टोव्ह वर) केलेला होता. हल्ली मधूनच डोक सरकल की एखादी भाजी वगैरे करतो पण बायको "नको" म्हणते.... "तयारी करून दिल्यावर फोडणी टाकायचे काम म्हणे मी पण करू शकेन !" काय अरसिक आहे ना? पण माझ्यामते ही सर्व चक्रे असतात व फिरून खाली गेलेला बिंदू कधीना कधी परत वर येतो. काही सेवानिवृत्त मंडळी हातपाय सुरू रहावेत किंवा आवश्यकतः पडली म्हणून हीच कामे स्वतःहून करतात हे ही मी बघितलेले आहे.
.

1 टिप्पणी:

नरेंद्र गोळे म्हणाले...

डी.एन. महोदय, आपण म्हणता त्यात निश्चितच तथ्य आहे. जरामरण टाळणे शक्यच नसते. लांबवण्याने प्रश्न वाढतात असा तुमचा सूर दिसतो. पण "भारतीय मानसशास्त्र किंवा पातंजल योगसूत्रे" या कोल्हटकरांच्या पुस्तकात आमरण तारुण्याचे आराधन कसे करता येईल त्याची इत्थंभूत चर्चा केलेली आहे.

भारतीय ब्रह्मविद्येने, मरेपर्यंतचे आयुष्य यथामती, आरोग्यपूर्ण, स्वयंपूर्ण जगण्याचे उपाय शोधून काढलेले दिसून येतात. नव्या स्थलकालपरिस्थितीत त्यातील किती अनुसरणीय आणि उपयुक्त आहेत ते आपणच शोधून काढायला हवे आहे.

घारेंच्या नावातील चूक लक्षात आणून दिल्याखातर धन्यवाद. आता ती चूक दुरुस्त केलेली आहे.

मीही इंग्रजीत वाचण्यासाठी फारसा उत्सुक नसतो. पण असले आळस काय कामाचे. सुहृदांचे हृद्‌गत समजून घ्यायचे असेल तर गरज पडेल ती भाषा शिकून आत्मसात करायलाच हवी नाही का?

असो. प्रतिसादाखातर पुन्हा एकदा धन्यवाद.